मुलांसाठी बाइबलनमुना
ती बाई गोंगाट-गलबल्यातील त्या टेकडीवर उभी होती, तिचे उदास डोळे भयानक दृश्य पाहत होते. तिचा मुलगा मरत होता. ती माता होती मेरी आणि येशूला खिळ्यांनी ठोकलेल्या त्या क्रॉसजवळ ती उभी होती.
हे सर्व कसे घडले? येशू हे सुंदर जीवन असे भयानकपणे कसे संपवू शकतो? ईश्वराने त्याच्या पुत्राला अशाप्रकारे क्रॉसवर खिळ्यांनी ठोकून मरण्याची परवानगी कशी दिली? तो कोण होता याविषयी येशूने काही चूक केली का? ईश्वर अपयशी ठरला का?
नाही! ईश्वर अपयशी ठरला नाही. येशूने कोणतीही चूक केली नव्हती. येशूला नेहमी माहित होते की दुष्ट माणसे त्याला ठार मारतील. येशू जेव्हा लहान बालक होता, शिमोन नावाच्या म्हाता-या माणसाने मेरीला सांगितले होते की पुढे दुः ख आहे.
येशूला ठार मारण्यापूर्वी काही दिवस अगोदर एक बाई आली आणि तिने सुगंधी तेल येशूच्या पायावर ओतले. “ती पैशांचा नाश करत आहे.” शिष्यांनी तक्रार केली. “तिने चांगले काम केले आहे” येशू म्हणाला. “तिने ते माझ्या दफनासाठी केले आहे.” किती चमत्कारिक शब्द!
यानंतर येशूच्या बारा शिष्यांपैकी एक जुदास याने चांदीच्या 30 नाण्यांसाठी प्रमुख पुजा-यांकडे येशूचा विश्वासघात करण्याचे मान्य केले.
यहूद्यांच्या बेखमीर भाकरीच्या सणावेळी, येशूने त्याच्या शिष्यांसमवेत शेवटचे भोजन घेतले. त्याने शिष्यांना ईश्वराबद्दल व त्याच्यावर प्रेम करणा-यांसाठी त्याच्या वचनांच्या अनेक सुंदर गोष्टी सांगितल्या. नंतर येशूने आपसात वाटण्यासाठी त्यांना भाकरी आणि पेला दिला. हे अशासाठी होते की पातकांपासून क्षमा मिळावी म्हणून येशूचे शरीर आणि रक्त देण्यात आले याचे स्मरण त्यांना राहावे.
नंतर येशूने त्याच्या मित्रांना सांगितले की त्याचा विश्वासघात केला जाईल, आणि ते सर्व पळून जातील. “मी पळून जाणार नाही” पीटर हट्टाने म्हणाला. “कोंबडा आरवण्यापूर्वी तीन वेळा तू मला नाकारशील.” येशूने म्हटले.
त्या रात्री नंतर, येशू गेथशेमानेच्या बागेत प्रार्थनेसाठी गेला. त्याच्या समवेत असलेले शिष्य झोपले. “हे परमपिता!” येशूने प्रार्थना केली, “....हा प्याला माझ्यापासून हटव. तथापि, मी केल्याप्रमाणे नाही, तर तू केल्याप्रमाणे.”
अकस्मात जुदासच्या नेतृत्वाखाली एक जमाव बागेत चालून आला. येशूने प्रतिकार केला नाही, पण पीटरने एका माणसाचा कान कापला. शांतपणे येशूने त्या माणसाच्या कानाला स्पर्श केला व त्याच्यावर उपचार केला. येशूला माहित होते की त्याची अटक ही ईश्वराच्या इच्छेचा भाग होता.
जमावाने येशूला प्रमुख पुजा-याच्या घरी नेले. तिथे यहुदी नेत्यांनी सांगितले की येशूने मेले पाहिजे. जवळपास, नोकरांच्या आगीच्या बाजूला उभा राहून पीटर पाहत होता. तीन वेळा लोकांनी पीटरकडे रोखून पाहिले आणि म्हटले, “तू येशूबरोबर होतास!” तिन्ही वेळा पीटरने ते नाकारले, जसे येशूने सांगितले होते, तसेच. पीटरने शापसुद्धा दिले आणि शपथही घेतली.
तेवढ्यात कोंबडा आरवला. पीटरसाठी तो जणू ईश्वराचा आवाज होता. येशूचे शब्द आठवून पीटर दुःखाने रडला.
जुदासलाही पश्चात्ताप झाला होता. त्याला माहित होते की येशू कोणत्याही पापासाठी किंवा गुन्ह्यासाठी अपराधी नाही. जुदासने चांदीची 30नाणी परत केली पण पुजारी ती घेत नव्हते.
जुदासने पैसे खाली फेकले, तो बाहेर गेला – आणि त्याने गळफास घेतला.
पुजा-यांनी येशूला रोमन राज्यपाल पिलातसमोर आणले. पिलात म्हणाला, “मला या माणसात कोणताही दोष आढळला नाही.” पण जमाव ओरडत राहिला, “ह्याला क्रॉसवर ठोका! ह्याला क्रॉसवर ठोका!”
शेवटी पिलातने येशूला क्रॉसवर ठोकून मारण्याचा आदेश दिला. सैनिकांनी येशूला ठोसे लगावले, त्याच्या तोंडावर थुंकले, आणि त्याला चाबकाने फटकारले. त्यांनी लांब काट्यांचा एक मुकुट बनविला व तो येशूच्या डोक्यावर दाबला. नंतर त्यांनी मरण्यासाठी त्याला क्रॉसवर खिळ्यांनी ठोकले.
येशूला माहित होते की त्याला तसे मरण येणार. त्याला हेसुद्धा माहित होते की त्याचे मरण त्याच्यावर विश्वास ठेवणा-यांना त्यांच्या पापांसाठी क्षमा घेऊन येणार. येशूच्या बाजूला दोन अपराध्यांना क्रॉसवर ठोकले होते. एकाने येशूवर विश्वास ठेवला – आणि तो स्वर्गात गेला. दूसरा नाही.
अनेक तासांच्या यातनांनंतर येशू म्हणाला, “हे संपले.” आणि मेला. त्याचे कार्य पूर्ण झाले होते. मित्रांनी त्याला एका खासगी थडग्यात दफन केले.
रोमन सैनिकांनी थडगे सीलबंद केले व ते पहारा देऊ लागले. आता कोणीही आत –किंवा बाहेरही जाऊ शकत नव्हता.
जर हाच कहाणीचा शेवट असता तर ते किती दुः खदायक असते. पण ईश्वराने काही अद्भूत केले.येशू मेलेलाच राहिला नाही.
सप्ताहाच्या पहिल्या दिवशी पहाटे, येशूच्या काही शिष्यांनी पाहिले की थडग्यावरील दगड बाजूला झालेला आहे. जेव्हा त्यांनी आत पाहिले, येशू तिथे नव्हता.
एक बाई थडग्याजवळ रडत बसली होती. येशू तिच्यासमोर प्रकट झाला! ती बाई अन्य शिष्यांना कळविण्यासाठी आनंदाने धावली. “येशू जिवंत आहे!येशू मरणातून परत आला!”
लवकरच येशू आपल्या शिष्यांजवळ आला, आणि त्याने खिळ्यांनी जखम झालेले आपले हात त्यांना दाखवले. ते सत्य होते. येशू परत जिवंत झाला होता! त्याने त्याला नाकारण्यासाठी पीटरला क्षमा केली, आणि त्याच्या शिष्यांना त्याच्याविषयी सर्वांना सांगण्यास सांगितले. नंतर तो स्वर्गात परत गेला जिथून तो त्या पहिल्या ख्रिसमसला आला होता.
समाप्त
पवित्र शास्त्र
या योजनेविषयी
हे सर्व कसे सुरू झाले? आपण कुठून आलात? जगात इतके दुःख का आहे? काही आशा आहे का? मृत्यू नंतर जीवन आहे का? आपण जसजसा जगाचा खरा इतिहास वाचता तसे उत्तरे शोधा.
More
ही योजना प्रदान केल्याबद्दल आम्ही Bible for Children, Inc. चे आभार मानू इच्छितो. अधिक माहितीसाठी, कृपया भेट द्या: https://bibleforchildren.org/languages/marathi/stories.php