मत्तय 16

16
चिन्हासाठी केलेल्या मागणीला नकार
1एकदा काही परुशी व सदूकी लोक येशूकडे आले आणि त्याची परीक्षा पाहण्याकरता त्यांनी त्याच्याजवळ स्वर्गातून चिन्ह मागितले. 2येशूने त्यांना उत्तर दिले, [“तुम्ही संध्याकाळी म्हणता, “उघाड होईल कारण आभाळ तांबूस आहे’ 3आणि पहाटेस म्हणता, “आज पाऊस पडेल कारण आभाळ तांबूस व गडद आहे.’ आकाशाचे रूप तुम्हांला ओळखता येते परंतु काळाची लक्षणे तुम्हांला ओळखता येत नाहीत!] 4ही दुष्ट व व्यभिचारी पिढी चिन्ह मागते, परंतु योनाच्या चिन्हाशिवाय तिला कोणतेही चिन्ह दिले जाणार नाही.” नंतर तो त्यांना सोडून निघून गेला.
असमंजस शिष्य
5शिष्य सरोवराच्या पलीकडे गेले पण ते भाकरी घ्यायला विसरले होते. 6येशू त्यांना म्हणाला, “सांभाळा, परुशी व सदूकी ह्यांच्या खमिराविषयी जपून राहा.”
7ते आपसात चर्चा करून म्हणाले, “आपण भाकरी घेतल्या नाहीत म्हणून येशू असे म्हणतो.”
8येशू हे ओळखून म्हणाला, “अहो अल्पविश्वासी, तुमच्याजवळ भाकरी नाहीत, ह्याविषयी चर्चा का करता? 9तुम्हांला अजून समजत नाही काय? पाच हजारांना पाच भाकरी दिल्यावर तुम्ही किती टोपल्या भरून घेतल्या? 10तसेच चार हजारांना सात भाकरी दिल्यावर किती टोपल्या भरून घेतल्या, ह्याची तुम्हांला आठवण नाही काय? 11मी भाकरींविषयी बोललो नाही, हे तुम्हांला का समजत नाही? परुशी व सदूकी ह्यांच्या खमिराविषयी सावध राहा.”
12तेव्हा त्यांना समजले की, त्याने भाकरीच्या खमिराविषयी नव्हे तर परुशी व सदूकी ह्यांच्या शिकवणीविषयी सावध राहण्यास सांगितले.
येशू हा ख्रिस्त आहे, अशी पेत्राची कबुली
13फिलिप्पै-कैसरियाच्या परिसरातील भागात आल्यावर येशूने त्याच्या शिष्यांना विचारले, “लोक मनुष्याच्या पुत्राला कोण म्हणून ओळखतात?”
14ते म्हणाले, “काही लोक बाप्तिस्मा देणारा योहान, कित्येक एलिया, कित्येक यिर्मया किंवा संदेष्ट्यांतील एक असे म्हणतात.”
15तो त्यांना म्हणाला, “पण मी कोण आहे, असे तुम्ही म्हणता?”
16शिमोन पेत्राने उत्तर दिले, “आपण ख्रिस्त आहात, जिवंत देवाचा पुत्र.”
17येशूने त्याला म्हटले, “शिमोन बार्योना, तू धन्य आहेस; कारण मांस व रक्त ह्यांनी नव्हे तर माझ्या स्वर्गातील पित्याने हे तुला प्रकट केले आहे. 18आणखी मी तुला सांगतो, तू पेत्र आहेस आणि ह्या खडकावर मी माझी मंडळी स्थापन करीन व तिच्यापुढे प्रत्यक्ष मृत्यूलोकाचेदेखील काहीच चालणार नाही. 19मी तुला स्वर्गराज्याच्या किल्ल्या देईन. पृथ्वीवर जे काही तू बांधशील ते स्वर्गात बांधले जाईल व पृथ्वीवर जे काही तू मोकळे करशील ते स्वर्गात मोकळे केले जाईल.”
20नंतर त्याने शिष्यांना निक्षून सांगितले, “मी ख्रिस्त आहे, हे कोणालाही सांगू नका.”
मरण व पुनरुत्थान ह्यांविषयी येशूचे भाकीत
21तेव्हापासून येशू त्याच्या शिष्यांना उघडपणे सांगू लागला, “मी यरुशलेम येथे जाऊन वडीलजन, मुख्य याजक व शास्त्री ह्यांच्याकडून पुष्कळ दुःखे सोसावीत, ठार मारले जावे व तिसऱ्या दिवशी उठवले जावे, ह्याचे अगत्य आहे.”
22पेत्र त्याला बाजूला घेऊन निषेधाच्या स्वरात म्हणाला, “प्रभो, नाही. मुळीच नाही. असे आपल्या बाबतीत घडू नये.”
23परंतु तो वळून पेत्राला म्हणाला, “अरे सैताना, माझ्यापुढून निघून जा, तू मला अडखळण होतोस. तुझा दृष्टिकोन देवाचा नव्हे तर मनुष्याचा आहे.”
आत्मत्यागाचे आमंत्रण
24त्यानंतर येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, “जर कोणी माझा अनुयायी होऊ पाहत असेल, तर त्याने स्वतःला नाकारावे, आपला क्रुस उचलून घ्यावा व माझ्या मागे यावे. 25जो कोणी स्वतःचा जीव वाचवू पाहील, तो त्याच्या जिवाला मुकेल आणि जो कोणी माझ्याकरता स्वतःच्या जिवाला मुकेल तो त्याच्या जिवाला वाचवील. 26कारण मनुष्याने सर्व जग कमावले पण आपला जीव गमावला, तर त्याला काय लाभ? किंवा मनुष्य आपल्या जिवाबद्दल काय मोबदला देऊ शकेल? 27मनुष्याचा पुत्र त्याच्या पित्याच्या वैभवाने त्याच्या दूतांसह येईल त्या वेळी तो प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्यांप्रमाणे फळ देईल. 28मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, येथे उभे असलेल्यांमध्ये काही असे आहेत की, ते मनुष्याच्या पुत्राला त्याच्या राज्यात येताना पाहतील, तोपर्यंत त्यांना मरणाचा अनुभव येणार नाही.”

Currently Selected:

मत्तय 16: MACLBSI

Qaqambisa

Share

Copy

None

Ufuna ukuba iimbalasane zakho zigcinwe kuzo zonke izixhobo zakho? Bhalisela okanye ngena