उत्पत्ती 19
19
सदोम आणि गमोरा ह्या नगरांचा नाश
1मग संध्याकाळी ते दोघे दूत सदोम येथे आले, तेव्हा लोट सदोमाच्या वेशीत बसला होता; त्यांना पाहून लोट उठून सामोरा गेला; आणि भूमीपर्यंत तोंड लववून त्याने त्यांना नमन केले;
2तो त्यांना म्हणाला, “पाहा, महाराज, आपल्या दासाच्या घरी येण्याची कृपा करा; आजची रात्र राहा, पाय धुवा व सकाळी उठून मार्गस्थ व्हा;” पण ते म्हणाले, “नाही, आम्ही रात्रभर रस्त्यातच मुक्काम करू;”
3पण त्याने त्यांना फारच आग्रह केल्यावरून ते त्याच्याबरोबर त्याच्या घरी गेले; त्याने त्यांच्यासाठी भोजन तयार केले; त्याने बेखमीर भाकरी केल्या आणि ते जेवले.
4ते निजण्यापूर्वीच त्या नगराच्या माणसांनी, म्हणजे सदोमाच्या माणसांनी, तरुणापासून ते म्हातार्यापर्यंत, अशा सगळ्या लोकांनी चोहोकडून येऊन त्या घराला गराडा घातला.
5ते लोटाला हाक मारून म्हणाले, “आज रात्री तुझ्याकडे आलेले पुरुष कोठे आहेत? त्यांना बाहेर आण, म्हणजे आम्ही त्यांच्याशी समागम करू.”
6तेव्हा लोट दाराशी त्यांच्याकडे गेला व त्याने आपल्यामागून दार लावून घेतले.
7तो म्हणाला, “बांधवहो, असले दुष्कर्म करू नका.
8हे पाहा, माझ्या दोन मुली आहेत, त्यांनी अद्यापि पुरुष पाहिलेला नाही; मी त्यांना तुमच्याकडे आणू काय? तुमच्या मर्जीस येईल तसे त्यांच्याशी वर्तन करा; पण ह्या पुरुषांना काही करू नका, कारण ते आसर्यासाठी माझ्या छपराखाली आले आहेत.
9तेव्हा ते म्हणाले, “बाजूला हो, हा तर येथे थोडे दिवस राहायला आला आणि आता मोठा न्यायाधीश बनला आहे! तर त्यांच्यापेक्षा तुझीच अधिक खबर घेतो.” असे म्हणून ते लोटाला जोराने ढकलू लागले व दार फोडायला सरसावले,
10पण त्या पुरुषांनी बाहेर हात काढून लोटाला घरात आपल्याकडे ओढून दार लावून घेतले.
11आणि घराच्या दाराशी जी लहानथोर माणसे जमली होती त्यांना त्यांनी आंधळे करून टाकले; मग ती घर शोधून शोधून थकली.
12ते पुरुष लोटाला म्हणाले, “तुझे आणखी कोणी येथे आहेत काय? तुझा जावई, तुझे मुलगे, तुझ्या मुली आणि तुझे दुसरे कोणी ह्या नगरात असेल त्यांना ह्या स्थानातून बाहेर काढ.
13कारण आम्ही ह्या स्थानाचा नाश करणार आहोत. ह्या लोकांविषयी परमेश्वरापुढे फार ओरड झाली आहे आणि ह्या नगराचा नाश करण्यास परमेश्वराने आम्हांला पाठवले आहे.”
14तेव्हा लोट बाहेर जाऊन आपल्या मुलींशी विवाह केलेल्या1 आपल्या जावयांना म्हणाला, “उठा, ह्या स्थानातून बाहेर पडा, कारण परमेश्वर ह्या नगराचा नाश करणार आहे;” परंतु त्याच्या जावयांना तो केवळ गंमत करत आहे असे भासले.
15पहाट होताच दूतांनी लोटाला घाई करून म्हटले, “ऊठ, तुझी बायको व येथे असलेल्या तुझ्या दोन मुली ह्यांना घेऊन नीघ, नाहीतर ह्या नगराच्या शिक्षेत तुझा संहार होईल.”
16पण तो दिरंगाई करू लागला, तेव्हा परमेश्वराची करुणा त्याच्यावर होती म्हणून त्या पुरुषांनी त्याच्या, त्याच्या बायकोच्या आणि दोन्ही मुलींच्या हातांना धरून त्यांना ओढून बाहेर काढले आणि नगराबाहेर आणून सोडले.
17त्यांना बाहेर आणल्यावर दूत त्यांना म्हणाला, “आपला जीव घेऊन पळ; मागे पाहू नकोस व खोर्यात कोठे थांबू नकोस; डोंगराकडे पळ काढ, नाहीतर तुझा संहार होईल.”
18तेव्हा लोट त्यांना म्हणाला, “हे प्रभू, नको! नको!
19पाहा, ह्या तुझ्या दासावर तुझी कृपादृष्टी झाली आहे; माझा जीव वाचवला ही तुझी माझ्यावर अपार दया झाली आहे; मला डोंगराकडे पळून जाववणार नाही, न जाणो, माझ्यावर हे अरिष्ट येऊन मी मरून जाईन.
20तर पाहा, पळून जायला हे नगर जवळ असून लहान आहे; पाहा, ते किती लहान आहे; तिकडे मला पळून जाऊ दे, म्हणजे माझा जीव वाचेल.”
21तेव्हा तो त्याला म्हणाला, “तुझ्या ह्याही गोष्टीला मी मान्य आहे; तू म्हणतोस त्या नगराचा मी नाश करणार नाही.
22त्वरा कर, तिकडे पळून जा; कारण तू तेथे जाऊन पोहचेपर्यंत मला काही करता येत नाही.” ह्यावरून त्या नगराचे नाव सोअर (लहान) असे पडले.
23लोट सोअरात जाऊन पोहचला तेव्हा पृथ्वीवर सूर्योदय झाला होता.
24तेव्हा परमेश्वराने सदोम व गमोरा ह्यांच्यावर गंधक व अग्नी ह्यांचा वर्षाव आकाशातून केला;
25आणि ती नगरे आणि ती सर्व तळवट, त्या नगरातले सर्व रहिवासी आणि तेथे जमिनीत उगवलेले सर्वकाही ह्यांचा त्याने नाश केला;
26पण लोटाची बायको त्याच्यामागून चालली होती ती मागे पाहत राहिली आणि ती मिठाचा खांब झाली.
27इकडे अब्राहाम मोठ्या पहाटेस उठून, जेथे तो परमेश्वरापुढे उभा राहिला होता त्या ठिकाणी गेला.
28त्याने सदोम व गमोरा आणि अवघा तळवटीचा प्रदेश ह्यांच्याकडे नजर फेकली तर पाहा, त्या प्रदेशातून भट्टीच्या धुरासारखा धूर वर चालला होता!
29ह्या प्रकारे देवाने त्या तळवटीतील नगरांचा नाश केला. त्या वेळी देवाने अब्राहामाची आठवण केली, आणि लोट राहत होता तेथल्या नगरांचा नाश करतेवेळी लोटाला त्या नाशातून वाचवले.
मवाबी आणि अम्मोनी ह्यांच्या वंशांचा प्रारंभ
30नंतर लोट आपल्या दोन्ही मुलींसह सोअरातून निघून डोंगरावर जाऊन राहिला; त्याला सोअरात राहण्याची भीती वाटली, आणि तो आपल्या दोन्ही मुलींसह एका गुहेत राहिला.
31एके दिवशी थोरली धाकटीला म्हणाली, “आपला बाप म्हातारा आहे, आणि जगरहाटीप्रमाणे आपल्यापाशी यायला कोणी पुरुष पृथ्वीवर नाही;
32तर चल, आपण आपल्या बापाला द्राक्षारस पाजू आणि त्याच्यापाशी निजू; अशा प्रकारे आपण आपल्या बापाचा वंश चालवू.”
33त्यांनी त्या रात्री आपल्या बापाला द्राक्षारस पाजला आणि थोरली मुलगी त्याच्यापाशी जाऊन निजली; पण ती केव्हा निजली व केव्हा उठली हे त्याला कळले नाही.
34मग दुसर्या दिवशी थोरली धाकटीला म्हणाली, “पाहा, काल रात्री मी बापापाशी निजले, तर आज रात्रीही आपण त्याला द्राक्षारस पाजू आणि तू त्याच्यापाशी जाऊन नीज; अशा प्रकारे आपण आपल्या बापाचा वंश चालवू.”
35त्या रात्रीही त्यांनी बापाला द्राक्षारस पाजला आणि धाकटी उठून जाऊन त्याच्यापाशी निजली; पण ती केव्हा निजली व केव्हा उठली हे त्याला कळले नाही.
36ह्या प्रकारे लोटाच्या दोघी मुली बापापासून गर्भवती झाल्या.
37थोरल्या मुलीला मुलगा झाला, त्याचे नाव तिने मवाब असे ठेवले; आजमितीला जे मवाबी म्हणून आहेत त्यांचा हा मूळ पुरुष.
38धाकटीलाही मुलगा झाला, तिने त्याचे नाव बेनअम्मी असे ठेवले; आजमितीला जे अम्मोनी म्हणून आहेत त्यांचा हा मूळ पुरुष.
Currently Selected:
उत्पत्ती 19: MARVBSI
Qaqambisa
Share
Copy
Ufuna ukuba iimbalasane zakho zigcinwe kuzo zonke izixhobo zakho? Bhalisela okanye ngena
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.