उत्पत्ती 18
18
इसहाकाच्या जन्माविषयी देवाचे वचन
1तो दिवसा भर उन्हाच्या वेळी डेर्याच्या दाराशी बसला असता परमेश्वराने मम्रेच्या एलोन राईत त्याला दर्शन दिले;
2त्याने आपली दृष्टी वर करून पाहिले तेव्हा त्याच्यासमोर तीन पुरुष उभे असलेले त्याला दिसले. त्याने आपल्या डेर्याच्या दारापासून धावत सामोरे जाऊन जमिनीपर्यंत लवून त्यांना नमन केले;
3तो म्हणाला, “हे प्रभू, माझ्यावर तुझी कृपादृष्टी असेल तर ये; तुझ्या दासापासून पुढे जाऊ नकोस;
4थोडे पाणी आणू द्या; तुम्ही आपले पाय धुऊन ह्या झाडाखाली विसावा घ्या.
5मी थोडी भाकर आणतो, तिचा आपल्या जिवास आधार करा, मग पुढे जा; ह्यासाठी तुमचे ह्या आपल्या दासाकडे येणे झाले असावे.” ते म्हणाले, “तू म्हणतोस ते कर.”
6तेव्हा अब्राहाम त्वरेने डेर्यात सारेकडे जाऊन म्हणाला, “तीन मापे सपीठ लवकर घे व ते मळून त्याच्या भाकरी कर.”
7अब्राहाम गुरांकडे धावत गेला व त्याने एक चांगले कोवळे वासरू निवडून चाकराकडे दिले; त्याने ते त्वरेने रांधले.
8नंतर अब्राहामाने दही, दूध व ते रांधलेले वासरू आणून त्याच्यापुढे ठेवले आणि ते जेवत असता तो त्यांच्याजवळ झाडाखाली उभा राहिला.
9मग ते त्याला म्हणाले, “तुझी बायको सारा कोठे आहे?” तो म्हणाला, “ती डेर्यात आहे.”
10मग तो म्हणाला, “पुढल्या वसंत ऋतूत (जीवनाच्या वेळेस) मी तुझ्याकडे खात्रीने परत येईन; तेव्हा तुझी बायको सारा हिला मुलगा होईल.” त्याच्यामागे डेर्याच्या दारी सारा हे ऐकत होती.
11अब्राहाम व सारा हे वृद्ध, वयातीत होते आणि स्त्रियांच्या रीतीप्रमाणे सारेला पाळी येण्याचे बंद झाले होते.
12तेव्हा सारा मनातल्या मनात हसून म्हणाली, “मी जख्ख म्हातारी झाले आहे. माझा धनीही वृद्ध झाला आहे, तर मला आता हे सुख मिळेल काय?”
13परमेश्वर अब्राहामाला म्हणाला, “सारा का हसली? मी आता अशी वृद्ध झाले असता मला खरोखर मुलगा होणार काय, असे ती का म्हणाली?
14परमेश्वराला काही असाध्य आहे काय? नेमलेल्या समयी वसंत ऋतूत मी तुझ्याकडे परत येईन तेव्हा सारेला मुलगा होईल.”
15तेव्हा सारा नाकारून म्हणाली, “मी हसले नाही;” कारण ती घाबरली होती; पण तो म्हणाला, “नाही, तू हसलीसच.”
सदोम नगरासाठी अब्राहामाची मध्यस्थी
16नंतर ते पुरुष तेथून उठून सदोम नगराकडे जाण्यास निघाले आणि अब्राहाम त्यांना वाटेस लावण्यास गेला.
17परमेश्वर म्हणाला, “मी जे करणार आहे ते अब्राहामापासून लपवून ठेवू काय?
18कारण त्याचे मोठे व समर्थ राष्ट्र खात्रीने होणार, आणि त्याच्या द्वारे पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे आशीर्वादित होणार.
19मी त्याची निवड केली आहे ती अशासाठी की त्याने आपल्या लेकरांना व आपल्या पश्चात आपल्या घराण्याला आज्ञा द्यावी आणि त्यांनी न्यायनीतीने वागण्यासाठी परमेश्वराचा मार्ग आचरावा आणि हे अशासाठी की परमेश्वर अब्राहामाविषयी जे बोलला ते त्याने त्याला प्राप्त करून द्यावे.”
20मग परमेश्वर म्हणाला, “सदोम व गमोरा ह्यांच्याविषयीची ओरड फारच झाली आहे व खरोखर त्यांचे पाप फार भारी आहे,
21म्हणून त्यांच्याविषयीची जी ओरड माझ्या कानी आली आहे तशीच त्यांची करणी आहे की काय हे पाहायला मी खाली जातो; तसे नसेल तर मला कळून येईल.”
22तेथून ते पुरुष वळून सदोमाकडे चालते झाले; पण अब्राहाम तसाच परमेश्वरासमोर उभा राहिला.
23अब्राहाम जवळ जाऊन म्हणाला, “तू दुर्जनांबरोबर नीतिमानांचाही संहार खरेच करणार काय?
24त्या नगरात कदाचित पन्नास नीतिमान असतील तर त्यांचा तू खरेच संहार करणार काय? त्याच्यातल्या पन्नास नीतिमानांसाठी त्या नगराची तू गय करणार नाहीस काय?
25ह्या प्रकारची कृती तुझ्यापासून दूर राहो. ज्यामुळे नीतिमानाची आणि दुष्टाची सारखीच गत होईल असा दुर्जनाबरोबर नीतिमानाचा वध करणे तुझ्यापासून दूर राहो; सर्व जगाचा न्यायाधीश योग्य न्याय करणार नाही काय?”
26परमेश्वर म्हणाला, “मला सदोम नगरात पन्नास नीतिमान आढळले तर त्यांच्यासाठी मी त्या सगळ्या स्थलाची गय करीन.”
27अब्राहाम म्हणाला, “पाहा, मी केवळ धूळ व राख असून प्रभूशी बोलण्याचे मी धाडस करत आहे;
28कदाचित पन्नासात पाच कमी नीतिमान असतील तर पाच कमी म्हणून तू सर्व नगराचा नाश करशील काय?” तेव्हा तो म्हणाला, “मला तेथे पंचेचाळीस आढळले तर मी त्याचा नाश करणार नाही.”
29त्याने पुन्हा म्हटले, “तेथे कदाचित चाळीसच आढळले तर?” तो म्हणाला, “त्या चाळिसांकरता मी तसे करणार नाही.”
30मग तो म्हणाला, “मी बोलतो ह्याचा प्रभूला राग न यावा; तेथे कदाचित तीसच आढळले तर?” तो म्हणाला, “मला तीसच आढळले तर मी तसे करणार नाही.”
31मग तो म्हणाला, “पाहा, मी प्रभूशी बोलण्याचे धाडस करत आहे; तेथे कदाचित वीसच आढळले तर?” तो म्हणाला, “त्या विसांकरता मी त्याचा नाश करणार नाही.”
32तो म्हणाला, “प्रभूला राग न यावा; मी आणखी एकदाच बोलतो. तेथे कदाचित दहाच आढळले तर?” तो म्हणाला, “त्या दहांकरता त्याचा नाश करणार नाही.”
33मग अब्राहामाशी बोलणे संपवल्यावर परमेश्वर निघून गेला, आणि अब्राहाम आपल्या ठिकाणी परत आला.
Currently Selected:
उत्पत्ती 18: MARVBSI
Qaqambisa
Share
Copy
Ufuna ukuba iimbalasane zakho zigcinwe kuzo zonke izixhobo zakho? Bhalisela okanye ngena
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.