लूक 23

23
रोमी सुभेदार पिलात याच्यापुढे येशू
मत्त. 27:1, 2; 27:11-14; मार्क 15:1-5; योहा. 18:28-38
1मग त्यांचा सर्व समुदाय उठला व त्यांनी येशूला पिलाताकडे नेले. 2व ते त्याच्यावर आरोप करू लागले. ते म्हणाले, “आम्ही या मनुष्यास लोकांची दिशाभूल करताना पकडले. तो कैसराला कर देण्यासाठी विरोध करतो आणि म्हणतो की, तो स्वतः ख्रिस्त, एक राजा आहे.” 3मग पिलाताने येशूला विचारले, तू यहूद्यांचा राजा आहेस काय? येशू म्हणाला, “आपण म्हणता तसेच.” 4मग पिलात मुख्य याजकांना आणि जमावाला म्हणाला, या मनुष्यावर दोष ठेवण्यास मला काही कारण आढळत नाही. 5पण त्यांनी आग्रह धरला. ते म्हणाले, “यहूदीया प्रांतातील सर्व लोकांस तो आपल्या शिकवणीने चिथावित आहे, त्याने गालील प्रांतापासून सुरुवात केली आणि येथपर्यंत आला आहे.”
हेरोद पुढे येशू
6पिलाताने हे ऐकले, तेव्हा त्याने विचारले की, “हा मनुष्य गालील प्रांताचा आहे काय?” 7जेव्हा त्यास समजले की, येशू हेरोदाच्या अधिकाराखाली येतो, तेव्हा त्याने त्यास हेरोदाकडे पाठवले. तो त्या दिवसात यरूशलेम शहरामध्येच होता. 8हेरोदाने येशूला पाहिले तेव्हा त्यास फार आनंद झाला, कारण त्याने त्याजविषयी ऐकले होते व त्यास असे वाटत होते की, तो एखादा चमत्कार करील व आपल्याला तो बघायला मिळेल अशी आशा त्यास होती. 9त्याने येशूला अनेक प्रश्न विचारले, पण येशूने त्यास उत्तर दिले नाही. 10मुख्य याजक लोक आणि नियमशास्त्राचे शिक्षक तेथे उभे राहून त्याच्याविरुध्द जोरदारपणे आरोप करीत होते. 11हेरोदाने त्याच्या शिपायांसह येशूला अपमानास्पद वागणूक दिली, त्याची थट्टा केली. त्यांनी त्याच्यावर एक तलम झगा घातला व त्यास पिलाताकडे परत पाठवले. 12त्याच दिवशी हेरोद आणि पिलात एकमेकांचे मित्र बनले त्यापुर्वी ते एकमेकांचे वैरी होते.
पिलात, बरब्बा व येशू
मत्त. 27:15-26; मार्क 15:6-15; योहा. 18:38-19:16
13पिलाताने मुख्य याजक लोक, पुढारी आणि लोकांस एकत्र बोलावले. 14“हा मनुष्य लोकांस फितवणारा म्हणून याला तुम्ही माझ्याकडे आणले; आणि पहा, ज्या गोष्टींचा आरोप तुम्ही याच्यावर ठेवता त्यासंबंधी मी तुमच्यासमक्ष चौकशी केल्यावर मला या मनुष्याकडे काहीही दोष सापडला नाही. 15हेरोदालाही आरोपाविषयी काहीही आधार सापडला नाही कारण त्याने त्यास परत आमच्याकडे आणले आहे. तुम्हीही पाहू शकता की, मरणाची शिक्षा देण्यास योग्य असे त्याने काहीही केलेले नाही. 16म्हणून मी याला फटके मारून सोडून देतो.” 17कारण त्यास त्या सणात त्यांच्याकरिता एकाला सोडावे लागत असे.
18पण ते सर्व एकत्र मोठ्याने ओरडले, “या मनुष्यास ठार करा! आणि आम्हासाठी बरब्बाला सोडा!” 19बरब्बाने शहरात खळबळ माजवली होती. त्याने काही लोकांस ठारही केले होते, त्यामुळे त्यास तुरुंगात टाकले होते. 20मग पिलात येशूला सोडण्याची इच्छा धरून फिरून त्यांच्याशी बोलला. 21पण ते ओरडतच राहिले, “त्याला वधस्तंभावर खिळा, त्यास वधस्तंभावर खिळा!” 22पिलात तिसऱ्यांदा त्यांना म्हणाला, “का? या मनुष्याने असा कोणता गुन्हा केला आहे? मरणाची शिक्षा देण्यायोग्य असे मला याच्याविरुद्ध काहीही आढळले नाही. यास्तव मी याला फटक्याची शिक्षा सांगून सोडून देतो.” 23पण याला वधस्तंभावर खिळाच असा त्यांनी मोठ्याने ओरडून आग्रह चालविला आणि त्यांच्या ओरडण्याला यश आले. 24तेव्हा पिलाताने त्यांच्या मागण्याप्रमाणे व्हावे असे ठरवले. 25जो मनुष्य दंगा आणि खून यासाठी तुरुंगात टाकला गेला होता व ज्याची त्यांनी मागणी केली होती त्यास त्याने सोडून दिले. पिलाताने त्यांच्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी येशूला त्यांच्या हाती दिले.
येशूला वधस्तंभावर खिळतात
मत्त. 27:32-44; मार्क 15:21-32; योहा. 19:17-24
26ते त्यास घेऊन जात असताना, कुरेनेकर शिमोन नावाचा कोणीएक शेतावरून येत होता त्यांनी त्यास धरले व त्याने येशूच्या मागे चालून वधस्तंभ वाहावा म्हणून तो त्याच्यावर ठेवला. 27लोकांचा व स्त्रियांचा मोठा समुदाय त्याच्यामागे चालला, त्या स्त्रिया त्याच्यासाठी ऊर बडवून शोक करीत होत्या. 28येशू त्यांच्याकडे वळून म्हणाला, “यरूशलेमच्या कन्यांनो, माझ्यासाठी रडू नका, तर आपल्या स्वतःसाठी आणि आपल्या मुलांबाळांसाठी रडा. 29कारण असे दिवस येत आहेत, जेव्हा लोक म्हणतील, धन्य त्या स्त्रिया ज्या वांझ आहेत आणि धन्य ती गर्भाशये, ज्यांनी जन्मदिले नाहीत व धन्य ती स्तने, ज्यांनी कधी पाजले नाही. 30तेव्हा ‘ते पर्वतास म्हणतील, आम्हावर पडा आणि ते टेकड्यांस म्हणतील. आम्हास झाका’ 31ओल्या झाडाला असे करतात तर वाळलेल्यांचे काय?”
32आणि दुसरे दोघे जण अपराधी होते त्यांनाही त्यांनी त्याच्याबरोबर जिवे मारण्यास नेले. 33आणि जेव्हा ते गुन्हेगारांसमवेत “कवटी” म्हटलेल्या ठिकाणी आले, तेथे त्यांनी त्यास व त्या अपराध्यांस, एकाला त्याच्या उजवीकडे व एकाला डावीकडे असे वधस्तंभावर खिळले. 34नंतर येशू म्हणाला, “हे पित्या, त्यांची क्षमा कर, कारण ते काय करतात हे त्यांना समजत नाही.” त्यांनी चिठ्ठ्या टाकून त्याचे कपडे वाटून घेतले. 35लोक तेथे पाहत उभे होते आणि पुढारी थट्टा करून म्हणाले, त्याने दुसऱ्यांना वाचवले, जर तो ख्रिस्त, देवाचा निवडलेला असेल तर त्याने स्वतःला वाचवावे! 36शिपायांनीही त्याची थट्टा केली. ते त्याच्याकडे आले आणि त्यांनी त्यास आंब दिली. 37आणि ते म्हणाले, “जर तू यहूद्यांचा राजा आहेस तर स्वतःला वाचव!”
38त्याच्यावर असे लिहिले होते “हा यहूदी लोकांचा राजा आहे.”
39तेथे खिळलेल्या एका गुन्हेगाराने त्याची निंदा केली. तो म्हणाला, तू ख्रिस्त नाहीस काय? स्वतःला व आम्हासही वाचव! 40पण दुसऱ्या गुन्हेगाराने त्यास दटावले आणि म्हणाला, “तुला देवाचे भय नाही का? तुलाही तीच शिक्षा झाली आहे. 41पण आपली शिक्षा योग्य आहे कारण आपण जे केले त्याचे योग्य फळ आपणास मिळत आहे. पण या मनुष्याने काहीही अयोग्य केले नाही.” 42नंतर तो म्हणाला, “येशू, तू आपल्या राज्यात येशील तेव्हा माझी आठवण कर.” 43येशू त्यास म्हणाला, “मी तुला खरे सांगतो, आज तू मजबरोबर सुखलोकात असशील.”
येशूचा मृत्यू
मत्त. 27:45-56; मार्क 15:33-41; योहा. 19:25-30
44त्यावेळी जवळ जवळ दुपारचे बारा वाजले होते आणि तीन वाजेपर्यंत सर्व प्रदेशावर अंधार पडला. त्यादरम्यान सूर्य प्रकाशला नाही. 45आणि परमेश्वराच्या भवनातील पडदा मधोमध फाटला आणि त्याचे दोन भाग झाले. 46येशू मोठ्या आवाजात ओरडला, “पित्या, मी आपला आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो.” असे बोलून त्याने प्राण सोडून दिला. 47जेव्हा रोमी शताधीपतीने काय घडले ते पाहिले तेव्हा त्याने देवाचे गौरव केले आणि म्हणाला, “खरोखर हा नीतिमान मनुष्य होता.” 48हे दृष्य पाहण्यासाठी जमलेल्या लोकांनी घडलेल्या गोष्टी पाहिल्या, तेव्हा ते छाती बडवीत परत गेले. 49परंतु त्याच्या ओळखीचे सर्वजण हे पाहण्यासाठी दूर उभे राहिले. त्यामध्ये गालील प्रांताहून त्याच्यामागे आलेल्या स्त्रियाही होत्या.
येशूची उत्तरक्रिया
मत्त. 27:57-61; मार्क 15:42-47; योहा. 19:38-42
50तेथे योसेफ नावाचा एक मनुष्य होता. तो यहूदी सभेचा सभासद व चांगला आणि नीतिमान मनुष्य होता. 51त्याने त्याच्या कामाला व विचारला संमती दिली नव्हती. तो यहूदीया प्रांतातील अरिमथाई नगराचा होता. तो देवाच्या राज्याची वाट पाहत होता. 52हा मनुष्य पिलाताकडे गेला आणि त्याने येशूचे शरीर मागितले. 53ते त्याने वधस्तंभावरुन खाली काढले आणि तागाच्या वस्त्रात गुंडाळले. नंतर ते खडकात खोदलेल्या कबरेत ठेवले. ही कबर अशी होती की, जिच्यात तोपर्यंत कोणालाही ठेवले नव्हते. 54तो तयारीचा दिवस होता आणि शब्बाथ सुरु होणार होता. 55गालील प्रांताहून येशूबरोबर आलेल्या स्त्रिया योसेफाच्या मागे गेल्या. त्यांनी ती कबर व तिच्यामध्ये ते शरीर कसे ठेवले ते पाहिले. 56नंतर त्या घरी गेल्या व त्यांनी सुगंधी मसाले आणि लेप तयार केला. शब्बाथ दिवशी त्यांनी आज्ञेप्रमाणे विसावा घेतला.

Currently Selected:

लूक 23: IRVMar

Qaqambisa

Share

Copy

None

Ufuna ukuba iimbalasane zakho zigcinwe kuzo zonke izixhobo zakho? Bhalisela okanye ngena