Uphawu lweYouVersion
Khetha Uphawu

लूक 16

16
अन्यायी कारभाऱ्याचे शहाणपण
1येशूने त्याच्या शिष्यांना एक दाखला सांगितला, “कोणीएक श्रीमंत मनुष्य असून, त्याचा एक कारभारी होता. हा कारभारी तुमचे पैसे उधळतो, अशी तक्रार त्या श्रीमंत मनुष्याकडे करण्यात आली. 2म्हणून त्या श्रीमंत मनुष्याने कारभाऱ्याला आत बोलावून म्हटले, तुझ्याविषयी मी हे काय ऐकत आहे? तर आता तुझ्या कारभाराचा हिशोब दे, कारण यापुढे तुला कारभार पाहावयचा नाही. 3तेव्हा कारभारी स्वतःशी म्हणाला, माझे मालक माझे कारभाऱ्याचे काम काढून घेत आहेत तर मी आता काय करू? शेतात कष्ट करण्याएवढे बळ माझ्या अंगात नाही व भीक मागण्याची मला लाज वाटते. 4मला कारभाऱ्याच्या कामावरून ते काढून टाकतील तरीही लोकांनी मला त्यांच्या घरात घ्यावे यासाठी मी काय करावे हे मला माहिती आहे. 5मग कारभाऱ्याने त्याच्या मालकाच्या प्रत्येक कर्जदाराला बोलावले. पहिल्याला तो म्हणाला, तू माझ्या मालकाकडून किती कर्ज घेतले आहे जे तुला फेडायचे आहे. 6तो म्हणाला, तीन हजार लिटर तेल. त्याने त्यास म्हटले, ही तुझी हिशोबाची वही घे आणि लवकर बसून यावर दीड हजार मांड 7नंतर दुसऱ्याला म्हटले, तुला किती देणे आहे? तो म्हणाला, वीस हजार किलो गहू तो त्यास म्हणाला, ही तुझी हिशोबाची वही घे व सोळा हजार मांड. 8अन्यायी कारभाऱ्याने शहाणपण केले. यावरुन धन्याने त्याची वाहवा केली; कारण या युगाचे लोक आपल्यासारख्यांविषयी प्रकाशाच्या लोकांपेक्षा शहाणे असतात.
9 मी तुम्हास सांगतो, तुमच्यासाठी, तुमच्या अनीतीच्या धनाने मित्र मिळवा. यासाठी की, जेव्हा हे धन संपेल तेव्हा त्यांनी तुम्हास सार्वकालिक वस्तीत घ्यावे 10एखाद्यावर थोडासा विश्वास टाकणे शक्य असेल तर त्याच्यावर जास्त विश्वास टाकणे शक्य आहे व जो कोणी थोड्या गोष्टींविषयी अन्यायी आहे तो जास्त गोष्टींविषयी अन्यायी राहील. 11म्हणून जर तुम्ही अनीतिकारक धनाविषयी विश्वासू नाही, तर मग खऱ्या धनाविषयी तुमच्यावर कोण विश्वास ठेवील? 12जे दुसऱ्याचे आहे त्याविषयी तुम्ही विश्वासू नसाल तर जे तुमचे आहे ते तुम्हास कोण देईल? 13कोणत्याही नोकराला दोन मालकांची सेवा करता येत नाही. एकाचा तो राग करील व दुसऱ्यावर तो प्रीती करील किंवा एकाला तो धरून राहील व दुसऱ्याला तुच्छ मानील. तुम्ही एकाच वेळी देवाची व पैशाची सेवा करू शकत नाही.”
येशू परूश्यांचा निषेध करतो
14मग ते परूशी धनाचे लोभी होते त्यांनी हे सर्व ऐकले व त्यांनी येशूचा तिरस्कार केला. 15येशू त्यांना म्हणाला, “तुम्ही स्वतःला लोकांसमोर नीतिमान म्हणून मिरवता, पण देव तुमची अंतःकरणे ओळखतो. जे लोकांस त्यांच्या दृष्टीत महान वाटते ते देवाच्या नजरेमध्ये अमंगळ आहे.
16 योहानापर्यंत नियमशास्त्र व संदेष्टे हे होते आणि तेव्हापासून देवाच्या राज्याची सुवार्ता गाजवली जात आहे व प्रत्येकजण त्यामध्ये शिरण्याचा जोराने प्रयत्न करीत आहे. 17नियमशास्त्राचा एकही काना किंवा मात्रा नाहीसा होण्यापेक्षा आकाश व पृथ्वीचे नाहीसे होणे सोपे आहे.
18 जो कोणी आपल्या पत्नीला सोडून देतो व दुसरीबरोबर लग्न करतो तो व्यभिचार करतो आणि जो कोणी, पतीने सोडून दिलेल्या स्त्री सोबत लग्न करतो तो व्यभिचार करतो.
श्रीमंत मनुष्य व दरिद्री लाजर
19 कोणीएक श्रीमंत मनुष्य होता तो जांभळे आणि महागडे खादीचे कपडे घालीत असे. प्रत्येक दिवस तो ऐशोआरामात घालवीत असे. 20त्याच्या फाटकाजवळ लाजर नावाचा एक गरीब मनुष्य पडून होता आणि त्याच्या अंगावर फोड आलेले होते. 21त्या श्रीमंत मनुष्याच्या जेवणाच्या टेबलावरून जे काही खाली पडेल ते तरी आपल्याला खायला मिळेल अशी तो अपेक्षा करत असे याशिवाय कुत्री येऊन त्याचे फोड चाटीत असत. 22मग असे झाले की, तो गरीब मनुष्य मरण पावला व देवदूतांनी त्यास अब्राहामाच्या ऊराशी नेऊन ठेवले. नंतर श्रीमंत मनुष्यही मरण पावला व त्यास पुरले गेले. 23श्रीमंत मनुष्य मृतलोकात यातना भोगीत होता, तेथून त्याने वर पाहीले व दूरवर असलेल्या अब्राहामाला आणि लाजराला त्याच्या बाजूला पाहिले, 24तो ओरडून म्हणाला, हे पित्या अब्राहामा, माझ्यावर दया कर आणि लाजराला पाठव यासाठी की तो बोटाचे टोक पाण्यात बुडवून माझी जीभ थंड करील, कारण या आगीमध्ये मी भयंकर दुखः सहन करीत आहे. 25परंतु अब्राहाम म्हणाला, माझ्या मुला, ध्यानात घे की तुझ्या जीवनात जशा तुला चांगल्या गोष्टी मिळाल्या, तशा लाजराला वाईट गोष्टी मिळाल्या. पण आता त्यास आराम मिळत आहे व तू दुःखात आहेस. 26आणि या सगळ्याशिवाय, तुमच्या व आमच्यामध्ये एक मोठी दरी ठेवलेली आहे, यासाठी की, येथून तुमच्याकडे कोणाला जाता येणार नाही व तुमच्याकडून कोणालाही आमच्याकडे येता येणार नाही. 27तो श्रीमंत मनुष्य म्हणाला, मग तुला मी विनंती करतो की, पित्या, लाजराला माझ्या वडिलांच्या घरी पाठव, 28लाजराला माझ्या पाच भावांकडे जाऊन त्यांना सावध करू दे म्हणजे ते तरी या दुःखाच्या ठिकाणी येणार नाहीत. 29पण अब्राहाम म्हणाला, तुझ्या भावांजवळ मोशे आणि संदेष्टये आहेत त्यांचे त्यांनी ऐकावे. 30तो श्रीमंत मनुष्य म्हणाला, नाही, हे पित्या अब्राहामा, मरण पावलेल्यामधून कोणी माझ्या भावांकडे गेला तर ते पश्चात्ताप करतील. 31अब्राहाम त्यास म्हणाला, जर ते मोशेचे आणि संदेष्टयांचे ऐकत नाहीत तर मरण पावलेल्यातून जर कोणी उठला तरी त्यांची खात्री होणार नाही.”

Currently Selected:

लूक 16: IRVMar

Qaqambisa

Share

Copy

None

Ufuna ukuba iimbalasane zakho zigcinwe kuzo zonke izixhobo zakho? Bhalisela okanye ngena

IziCwangciso zokuFunda zasimahla kunye nokuzinikela okunxulumene ne लूक 16

I-YouVersion isebenzisa ii cookies ukwenza amava akho abe ngawe. Ngokusebenzisa i-website yethu, uyakwamkela ukusebenzisa kwethu ii cookies njengoko kuchaziwe kuMgaqo-nkqubo wethu