Uphawu lweYouVersion
Khetha Uphawu

उत्प. 14

14
अब्राम लोटाची सुटका करतो
1त्यानंतर शिनाराचा राजा अम्राफेल, एल्लासाराचा राजा अर्योक, एलामाचा राजा कदार्लागोमर आणि गोयिमाचा राजा तिदाल यांच्या दिवसात असे झाले की, 2त्यांनी सदोमाचा राजा बेरा, गमोराचा राजा बिर्शा, अदमाचा राजा शिनाब, सबोयिमाचा राजा शमेबर आणि बेला ज्याला सोअर म्हणतात त्याच्या राजांशी युद्ध केले. 3नंतर हे पाच राजे सिद्दीम खोऱ्यात एकत्र जमले. या खोऱ्याला क्षार समुद्र असेही म्हणतात. 4त्यांनी बारा वर्षे कदार्लागोमरची सेवा केली होती, परंतु तेराव्या वर्षी त्यांनी त्याच्या विरूद्ध बंड केले. 5त्यानंतर चौदाव्या वर्षी कदार्लागोमर व त्याच्या बरोबरचे राजे आले आणि त्यांनी अष्टरोथ-कर्णईम येथे रेफाईम लोकांस, हाम येथे जूजीम लोकांस, शावेह किर्याथाईम येथे एमीम या लोकांस मारले. 6आणि होरी यांना त्यांच्या सेईर डोंगराळ प्रदेशात जे एल पारान रान आहे तेथपर्यंत त्यांनी जाऊन मारले. 7नंतर ते मागे फिरून एन-मिशपात म्हणजे कादेश येथे आले. आणि त्यांनी सर्व अमालेकी देशाचा आणि तसेच हससोन-तामार येथे राहणाऱ्या अमोरी लोकांचाही पराभव केला. 8नंतर सदोमाचा राजा, गमोराचा राजा, अदमाचा राजा, सबोयिमाचा राजा आणि बेला म्हणजे सोअराचा राजा ह्यांनी लढाईची तयारी केली. 9एलामाचा राजा कदार्लागोमर, गोयिमाचा राजा तिदाल, शिनाराचा राजा अम्राफेल आणि एल्लासाराचा राजा अर्योक यांच्या विरूद्ध ते लढले. हे चार राजे पाच राजांविरूद्ध लढले. 10सिद्दीम खोऱ्यात पूर्ण डांबराने भरलेले खड्डे होते आणि सदोम व गमोराचे राजे पळून जाताना त्यामध्ये पडले, जे राहिले ते डोंगराकडे पळून गेले. 11अशा रीतीने शत्रूंनी सदोम व गमोरा नगराच्या सर्व वस्तू आणि त्यांचा सर्व अन्नसाठा लुटून घेऊन माघारी गेले. 12ते गेले तेव्हा त्यांनी अब्रामाच्या भावाचा मुलगा लोट जो सदोमात राहत होता, त्यालासुद्धा त्याच्या सर्व मालमत्तेसह नेले. 13तेथून पळून आलेल्या एकाने अब्राम इब्रीला हे सांगितले. तो तर अष्कोल व आनेर ह्यांचा भाऊ मम्रे अमोरी याच्या एलोन झाडांजवळ राहत होता आणि ते सर्व अब्रामाचे सहकारी होते. 14जेव्हा अब्रामाने ऐकले की, त्याच्या नातेवाइकांना शत्रूंनी पकडून नेले आहे तेव्हा त्याने आपल्या घरी जन्मलेली, लढाईचे शिक्षण घेतलेली तीनशे अठरा माणसे घेऊन सरळ दान नगरापर्यंत शत्रूंचा पाठलाग केला. 15त्याने रात्री त्याचे लोक त्यांच्याविरुद्ध विभागले आणि त्यांच्यावर हल्ला केला आणि दिमिष्काच्या डावीकडे होबापर्यंत त्यांचा पाठलाग केला. 16अब्रामाने सगळी मालमत्ता आणि त्याचा नातेवाइक लोट आणि त्याच्या वस्तू, त्याचप्रमाणे स्त्रिया आणि इतर लोक यांना परत आणले.
मालकीसदेक अब्रामाला आशीर्वाद देतो
इब्री. 7:1-2
17मग कदार्लागोमर व त्याच्याबरोबरचे राजे यांचा पराभव केल्यावर अब्राम परत आला तेव्हा सदोमाचा राजा शावेच्या खोऱ्यात त्यास भेटायला बाहेर आला. या खोऱ्याला राजाचे खोरे असे म्हणतात. 18देवाचा याजक असलेला शालेमाचा#यरूशलेम राजा मलकीसदेक भाकर व द्राक्षरस घेऊन अब्रामाला भेटण्यास आला. हा परात्पर देवाचा याजक होता. 19त्याने अब्रामाला आशीर्वाद देऊन म्हटले, “अब्रामा, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्नकर्ता परात्पर देव तुला आशीर्वाद देवो. 20परात्पर देव ज्याने तुझे शत्रू तुझ्या हाती दिले तो धन्यवादित असो.” तेव्हा अब्रामाने त्यास सर्वाचा दहावा भाग दिला. 21सदोमाचा राजा अब्रामास म्हणाला, “मला फक्त माझे लोक द्या आणि तुमच्यासाठी वस्तू घ्या.” 22अब्राम सदोमाच्या राजाला म्हणाला, “आकाश व पृथ्वीचा उत्पन्नकर्ता परमेश्वर परात्पर देव याच्यासमोर आपला हात उंचावून मी वचन देतो की, 23तुझा दोरा, चपलेचा बंध, किंवा जे तुझे आहे त्यातून मी काहीच घेणार नाही, नाहीतर तू म्हणशील, ‘अब्रामाला मी धनवान केले.’ 24माझ्या या तरुणांनी जे अन्न खाल्ले आहे तेवढे पुरे. आनेर, अष्कोल व मम्रे हे जे पुरुष माझ्याबरोबर गेले त्यांना आपापला वाटा घेऊ द्या.”

Currently Selected:

उत्प. 14: IRVMar

Qaqambisa

Share

Copy

None

Ufuna ukuba iimbalasane zakho zigcinwe kuzo zonke izixhobo zakho? Bhalisela okanye ngena