उत्प. 13

13
अब्राम आणि लोट विभक्त होतात
1अशा रीतीने अब्रामाने मिसर देश सोडला आणि तो, त्याची पत्नी साराय, आणि त्याचे जे सर्वकाही होते ते घेऊन नेगेबात गेला. लोटही त्याच्याबरोबर गेला. 2आता अब्राम जनावरे, तसेच सोने आणि चांदी यांनी फार श्रीमंत झाला होता. 3तो आपला प्रवास करीत नेगेबापासून बेथेल नगरामध्ये गेला, बेथेल व आय यांच्यामध्ये ज्या ठिकाणी त्याचा तंबू पूर्वी होता तेथपर्यंत गेला. 4जेथे त्याने पहिल्याने वेदी बांधली होती तेथेच ही जागा आहे आणि तेथे त्याने परमेश्वराच्या नावाचा धावा केला. 5आता लोट जो अब्रामाबरोबर प्रवास करीत होता. याच्याकडेसुद्धा कळप, गुरेढोरे व लोक#तंबू होते. 6तो देश त्या दोघांना एकत्र जवळ राहण्यास पुरेना, कारण त्यांची मालमत्ता फारच मोठी होती, ती इतकी की त्यांना एकत्र राहता येईना. 7तेथे अब्रामाचे गुराखी व लोटाचे गुराखी यांच्यामध्ये भांडणेसुद्धा होऊ लागली; त्या काळी त्या देशात कनानी व परिज्जी लोक राहत होते. 8तेव्हा अब्राम लोटाला म्हणाला, “तुझ्यामध्ये व माझ्यामध्ये, तसेच तुझे गुराखी व माझे गुराखी यांच्यामध्ये भांडण नसावे. शेवटी आपण एक कुटुंब आहोत. 9तुझ्यापुढे सर्व देश नाही काय? पुढे जा आणि माझ्यापासून तू वेगळा हो. तू जर डावीकडे गेलास तर मी उजवीकडे जाईन, आणि तू जर उजवीकडे गेलास तर मी डावीकडे जाईन.” 10लोटाने सभोवार पाहिले, आणि यार्देन खोऱ्याकडे नजर टाकली तेव्हा तेथे सर्वत्र भरपूर पाणी असल्याचे त्यास दिसले. परमेश्वराने सदोम व गमोरा या शहरांचा नाश करण्यापूर्वी सोअराकडे जाते त्या वाटेने लागणारे खोरे परमेश्वराच्या बागेसारखे, मिसर देशासारखे होते. 11तेव्हा लोटाने यार्देनेचे सर्व खोरे निवडले. मग ते दोघे वेगळे झाले आणि लोटाने पूर्वेकडे प्रवास करण्यास सुरुवात केली, आणि ते एकमेकांपासून वेगळे झाले. 12अब्राम कनान देशातच राहिला आणि लोट यार्देनेच्या मैदानातल्या शहरामध्ये जाऊन राहिला; लोट दूर सदोमाला गेला आणि तेथेच त्याने आपला तंबू ठोकला. 13सदोम नगराचे लोक अतिशय दुष्ट असून परमेश्वराच्या विरूद्ध पाप करणारे होते. 14लोट अब्राहापासून वेगळा झाल्यावर परमेश्वर अब्रामाला म्हणाला, “तू जेथे उभा आहेस त्या ठिकाणापासून उत्तरेकडे व दक्षिणेकडे, पूर्वेकडे व पश्चिमेकडे पाहा. 15तू पाहतोस हा सगळा प्रदेश मी तुला आणि तुझ्यानंतर तुझ्या संततीला कायमचा देईन. 16मी तुझी संतती या पृथ्वीवरील धुळीच्या कणांइतकी करीन, ते असे की, जर कोणाला ते धुळीचे कण मोजता येतील तर तुझे संतानही मोजता येईल. 17ऊठ, देशातून येथून तेथून चालत जा आणि त्याची लांबी व त्याची रुंदी पाहा, कारण तो मी तुला देणार आहे.” 18तेव्हा अब्रामाने आपला तंबू हलविला व तो हेब्रोन शहराजवळील मम्रेच्या एलोन झाडाशेजारी रहावयास गेला. परमेश्वरासाठी त्याने तेथे वेदी बांधिली.

Ekhethiweyo ngoku:

उत्प. 13: IRVMar

Qaqambisa

Yabelana

Kopa

None

Ufuna ukuba iimbalasane zakho zigcinwe kuzo zonke izixhobo zakho? Bhalisela okanye ngena