योहान 2

2
काना येथील लग्न
1नंतर तिसर्‍या दिवशी गालीलातील काना येथे एक लग्न होते आणि येशूची आई तेथे होती.
2येशूला व त्याच्या शिष्यांनाही लग्नाचे आमंत्रण होते.
3मग द्राक्षारस संपला तेव्हा येशूची आई त्याला म्हणाली, “त्यांच्याजवळ द्राक्षारस नाही.”
4येशू तिला म्हणाला, “बाई, ह्याच्याशी तुझा-माझा काय संबंध? माझी वेळ अजून आली नाही.”
5त्याची आई चाकरांना म्हणाली, “हा तुम्हांला जे काही सांगेल ते करा.”
6तेथे पाण्याचे सहा दगडी रांजण, यहूद्यांच्या शुद्धीकरणाच्या रीतीप्रमाणे ठेवलेले होते; त्यांत दोन-दोन, तीन-तीन मण पाणी मावेल असे ते होते.
7येशू त्यांना म्हणाला, “रांजण पाण्याने भरा,” आणि ते त्यांनी काठोकाठ भरले.
8मग त्याने त्यांना सांगितले, “आता त्यांतले काढून भोजनकारभार्‍याकडे न्या.” तेव्हा त्यांनी ते नेले.
9द्राक्षारस बनलेले पाणी भोजनकारभार्‍याने जेव्हा चाखले, (तो द्राक्षारस कोठला आहे हे त्याला ठाऊक नव्हते, पण पाणी काढणार्‍या चाकरांना ठाऊक होते), तेव्हा भोजनकारभारी वराला बोलावून म्हणाला,
10“प्रत्येक मनुष्य पहिल्याने चांगला द्राक्षारस वाढतो आणि लोक यथेच्छ प्याले मग नीरस वाढतो; तू तर चांगला द्राक्षारस आतापर्यंत ठेवला आहेस.”
11येशूने गालीलातील काना येथे आपल्या चिन्हांचा हा प्रारंभ करून आपला गौरव प्रकट केला आणि त्याच्या शिष्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला.
12त्यानंतर तो, त्याची आई, त्याचे भाऊ व त्याचे शिष्य खाली कफर्णहूमास गेले; परंतु तेथे ते फार दिवस राहिले नाहीत.
मंदिराचे शुद्धीकरण
13मग यहूद्यांचा वल्हांडण सण जवळ आला व येशू वर यरुशलेमेस गेला.
14आणि मंदिरात गुरे, मेंढरे, कबुतरे विकणारे आणि सराफ हे बसलेले त्याला आढळले.
15तेव्हा त्याने दोर्‍यांचा एक कोरडा करून मेंढरे व गुरे ह्या सर्वांना मंदिरातून घालवून दिले. सराफांचा खुर्दाही ओतून टाकला व चौरंग पालथे केले.
16आणि तो कबुतरे विकणार्‍यांना म्हणाला, “ही येथून काढून घ्या; माझ्या पित्याच्या घराची बाजारपेठ करू नका.”
17तेव्हा ‘तुझ्या मंदिराविषयीचा आवेश मला ग्रासून टाकील,’ असा शास्त्रलेख असल्याचे त्याच्या शिष्यांना आठवले.
18त्यावरून यहूदी त्याला म्हणाले, “तुम्ही हे करता तर आम्हांला तुमच्या अधिकाराचे काय चिन्ह दाखवता?”
19येशूने त्यांना उत्तर दिले, “तुम्ही हे मंदिर मोडून टाका आणि मी तीन दिवसांत ते उभारीन.”
20ह्यावरून यहूदी म्हणाले, “हे मंदिर बांधण्यास सेहेचाळीस वर्षे लागली आणि तुम्ही हे तीन दिवसांत उभारणार काय?”
21तो तर आपल्या शरीररूपी मंदिराविषयी बोलला होता.
22म्हणून तो असे म्हणत असे हे तो मेलेल्यांतून उठल्यावर त्याच्या शिष्यांना आठवले, आणि त्यांनी शास्त्रावर व येशूने जे वचन सांगितले होते त्यावर विश्वास ठेवला.
23वल्हांडणाच्या सणात यरुशलेम येथे असताना जी चिन्हे तो करत होता ती पाहून पुष्कळांनी त्याच्या नावावर विश्वास ठेवला.
24पण येशू सर्वांना ओळखून असल्यामुळे त्याला स्वतःला त्यांचा भरवसा नव्हता;
25शिवाय, मनुष्याविषयी कोणीही साक्ष द्यावी ह्याची त्याला गरज नव्हती, कारण मनुष्यात काय आहे हे त्याला स्वतःला ठाऊक होते.

Ekhethiweyo ngoku:

योहान 2: MARVBSI

Qaqambisa

Yabelana

Kopa

None

Ufuna ukuba iimbalasane zakho zigcinwe kuzo zonke izixhobo zakho? Bhalisela okanye ngena