उत्पत्ती 15

15
देवाचा अब्रामाशी करार
1ह्या गोष्टी घडल्यावर अब्रामाला दृष्टान्तात परमेश्वराचे वचन प्राप्त झाले ते असे : “अब्रामा, भिऊ नको. मी तुझी ढाल आहे, तुला मोठे प्रतिफळ मिळेल.”
2अब्राम म्हणाला, “हे प्रभू, परमेश्वरा, तू मला काय देणार? मी तर नि:संतान जाणार आणि दिमिष्की अलियेजर माझ्या घराचा मालक होणार.”
3अब्राम आणखी म्हणाला, “आणि पाहा, तू मला काही संतान दिले नाहीस तर माझ्या घरात जन्मलेला दास माझा वारस होणार.”
4तेव्हा परमेश्वराचे वचन त्याला प्राप्त झाले की, “हा मनुष्य तुझा वारस होणार नाही, तर तुझ्या पोटचाच तुझा वारस होईल.”
5मग त्याने त्याला बाहेर आणून म्हटले, “आकाशाकडे दृष्टी लाव; तुला हे तारे मोजवतील तर मोज.” मग त्याने त्याला सांगितले, “तुझी संतती अशीच होईल.”
6अब्रामाने परमेश्वरावर विश्वास ठेवला आणि अब्रामाचा हा विश्वास परमेश्वराने त्याचे नीतिमत्त्व गणला.
7तो त्याला म्हणाला, “तुला हा देश वतन द्यावा म्हणून खास्द्यांच्या ऊर गावातून ज्याने तुला आणले तो मीच परमेश्वर आहे.”
8तो म्हणाला, “प्रभू परमेश्वरा, मला हे वतन मिळेल हे कशावरून?”
9त्याने त्याला सांगितले, “तीन वर्षांची एक कालवड, तीन वर्षांची एक शेळी, तीन वर्षांचा एक एडका, एक होला आणि पारव्याचे एक पिलू माझ्यासाठी घे.”
10त्याने ती सर्व घेतली व मधोमध चिरून त्यांचे दोन-दोन तुकडे केले आणि प्रत्येकाचे तुकडे समोरासमोर ठेवले; पक्षी मात्र त्याने मधोमध चिरले नाहीत.
11त्या शवांवर हिंस्र पक्ष्यांनी झडप घातली, तेव्हा त्यांना अब्रामाने हाकून दिले.
12सूर्यास्ताच्या सुमारास अब्रामाला गाढ निद्रा लागली तेव्हा घोर भीती, निबिड अंधकार त्याच्यावर पडला.
13परमेश्वर अब्रामाला म्हणाला, “तू निश्‍चितपणे समज की जो देश स्वत:चा नाही, अशा देशात तुझे संतान उपरे होऊन राहील व तेथील लोकांचे दास्य करील, आणि ते लोक चारशे वर्षे त्यांना छळतील.
14मग ज्या राष्ट्राचे दास्य ते करतील त्याचे मी पारिपत्य करीन, त्यानंतर ते पुष्कळ धन घेऊन तेथून निघतील.
15तू तर शांतीने आपल्या पूर्वजांकडे जाशील; चांगला म्हातारा झाल्यावर तुला मूठमाती देतील.
16तुझ्या चौथ्या पिढीचे लोक इकडे माघारी येतील, कारण अमोरी लोकांच्या पापाचा घडा अद्यापि भरला नाही.
17नंतर सूर्य मावळला आणि निबिड अंधकार पडला, तेव्हा असे झाले की धुमसती आगटी व जळती मशाल त्या शवांच्या तुकड्यांमधून जाताना दिसली.
18त्या दिवशी परमेश्वराने अब्रामाशी करार करून सांगितले, “मिसराच्या1 नदीपासून ते महानदी फरात येथ-पर्यंतचा प्रदेश मी तुझ्या संतानास देतो.
19केनी, कनिज्जी, कदमोनी,
20हित्ती, परिज्जी, रेफाईम,
21अमोरी, कनानी, गिर्गाशी व यबूसी ह्या लोकांचा प्रदेश मी तुला देतो.”

Qaqambisa

Share

Copy

None

Ufuna ukuba iimbalasane zakho zigcinwe kuzo zonke izixhobo zakho? Bhalisela okanye ngena