YouVersion लोगो
सर्च आयकॉन

प्रेषितांची कृत्ये 2:14-37

प्रेषितांची कृत्ये 2:14-37 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

तेव्हा पेत्र अकरा प्रेषितांबरोबर उभा राहून, त्यांना मोठ्याने म्हणाला, अहो यहूदी लोकांनो व यरूशलेम शहरातील रहिवाश्यांनो, हे लक्षात आणा व माझे बोलणे ऐकून घ्या. तुम्हास वाटते हे मस्त झाले आहेत, पण असे नाही कारण सकाळचे नऊ वाजले आहेत. परंतु योएल संदेष्ट्याने जे सांगितले होते ते हे आहे: देव म्हणतो, “शेवटच्या दिवसात असे होईल, मी मनुष्यमात्रावर आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन, तेव्हा तुमचे पुत्र व तुमच्या कन्या संदेश देतील. तुमच्या तरूणांस दृष्टांत होतील व तुमच्या वृद्धास स्वप्ने पडतील. आणखी त्या दिवसात मी आपल्या दासांवर व आपल्या दासींवर आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन, म्हणजे ते संदेश देतील. आणि वर आकाशात अद्भूते व खाली पृथ्वीवर चिन्हे, म्हणजे रक्त, अग्नी व धूम्ररूप वाफ अशी मी दाखवीन. परमेश्वराचा महान व प्रसिद्ध दिवस येण्यापूर्वी सूर्य अंधकारमय व चंद्र रक्तमय होईल. तेव्हा असे होईल की जो कोणी परमेश्वराच्या नावाने त्याचा धावा करील तो तरेल.” “अहो इस्राएल लोकांनो, या गोष्टी ऐका: नासोरी येशूच्या द्वारे देवाने जी महत्कृत्ये, अद्भूते व चिन्हे तुम्हास दाखविली त्यावरून देवाने तुम्हाकरिता मान्यता दिलेला असा तो मनुष्य होता, याची तुम्हास माहिती आहे. तो देवाच्या ठाम संकल्पानुसार व पूर्वज्ञानानुसार तुमच्या स्वाधीन झाल्यावर, तुम्ही त्यास धरून अधर्म्यांच्या हातांनी वधस्तंभावर खिळून मारले; त्यास देवाने मरणाच्या वेदनांपासून सोडवून उठवले, कारण त्यास मरणाच्या स्वाधीन राहणे अशक्य होते. दावीद त्याच्याविषयी असे म्हणतो, ‘मी परमेश्वरास आपणापुढे नित्य पाहिले आहे; मी ढळू नये म्हणून तो माझ्या उजवीकडे आहे. म्हणून माझे हृदय आनंदित व माझी जीभ उल्लसित झालीच आणखी माझा देह ही आशेवर राहील. कारण तू माझा जीव मृतलोकात राहू देणार नाहीस, व आपल्या पवित्र पुरुषाला कुजण्याचा अनुभव येऊ देणार नाहीस. जीवनाचे मार्ग तू मला कळविले आहेत; ते आपल्या समक्षतेने मला हर्षभरीत करशील.’” “बंधुजनहो, कुलाधिपति दावीद: ह्याच्याविषयी मी तुम्हाबरोबर प्रशस्तपणे बोलतो तो मरण पावला, पुरला गेला व त्याची कबर आजपर्यंत आपल्यामध्ये आहे. तो संदेष्टा होता, आणि त्यास ठाऊक होते की देवाने त्यास अभिवचन दिले की तुझ्या संतानातील एकाला तुझ्या राजासनावर बसवीन. ह्याचे पूर्वज्ञान असल्यामुळे तो ख्रिस्ताच्या: पुनरुत्थानाविषयी असे बोलला की, त्यास मृतलोकात सोडून दिले नाही, व त्याच्या देहाला कुजण्याचा अनुभव आला नाही. त्या येशूला देवाने उठवले, ह्याविषयी आम्ही सर्व साक्षी आहोत. म्हणून तो देवाच्या उजव्या हाताकडे बसविलेला आहे त्यास पवित्र आत्म्याविषयीचे वचन पित्यापासून प्राप्त झाले आहे, आणि तुम्ही जे पाहता व ऐकता त्याचा त्याने वर्षाव केला आहे. कारण दावीद राजा स्वर्गास चढून गेला नाही, पण तो स्वतः म्हणतो, ‘परमेश्वराने माझ्या प्रभूला सांगितले की, मी तुझ्या शत्रूचे तुझे पादासन करेपर्यंत तू माझ्या उजवीकडे बसून राहा.’” “म्हणून, इस्राएलाच्या सर्व घराण्याने हे निश्चयपूर्वक समजून घ्यावे की, ज्या येशूला तुम्ही वधस्तंभावर खिळून मारले त्यास देवाने प्रभू व ख्रिस्त असे करून ठेवले आहे.” हे ऐकून त्यांच्या अंतःकरणास चुटपुट लागली आणि ते पेत्र व इतर प्रेषित ह्यांना म्हणाले, “बंधुजनहो, आम्ही काय करावे?”

प्रेषितांची कृत्ये 2:14-37 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

त्यावेळी पेत्र अकरा प्रेषितांसह उभा राहून, त्या जमावाला उद्देशून मोठ्याने म्हणाला: “यरुशलेममधील यहूदी बंधूंनो आणि रहिवाशांनो, तुम्हाला या गोष्टी स्पष्ट समजणे आवश्यक आहे; म्हणून माझे बोलणे लक्षपूर्वक ऐका. तुम्ही समजता त्याप्रमाणे ही माणसे द्राक्षारसाने मस्त झालेली नाहीत. आता तर सकाळचे फक्त नऊ वाजले आहेत! तर पाहा याविषयी संदेष्टा योएलने असे भविष्य केले होते: “ ‘परमेश्वर म्हणतात, शेवटच्या दिवसात, मी माझा आत्मा सर्व लोकांवर ओतेन. तुमचे पुत्र व तुमच्या कन्या भविष्यवाणी करतील, व तुमचे वृद्ध स्वप्ने पाहतील, तुमचे तरुण दृष्टान्त पाहतील. माझ्या दासांवर म्हणजेच, स्त्री आणि पुरुष दोघांवरही, त्या दिवसांत मी माझा आत्मा ओतेन. आणि ते भविष्यवाणी करतील. वर आकाशात व खाली पृथ्वीवर, रक्त व अग्नी व धुरांचे स्तंभ अशी विलक्षण चिन्हे मी दाखवेन. प्रभूचा महान व गौरवी दिवस येण्यापूर्वी सूर्य अंधकारमय व चंद्र रक्तमय होईल. आणि जो कोणी प्रभूच्या नावाने त्यांचा धावा करेल तोच वाचेल.’ “अहो इस्राएली लोकहो! आता हे लक्ष देऊन ऐका: तुम्हाला चांगलेच माहीत आहे की, परमेश्वराने नासरेथकर येशूंना अधिकृत मान्यता देऊन त्यांच्याद्वारे तुमच्यामध्ये चमत्कार, अद्भुत गोष्टी व चिन्हे केली. परमेश्वराच्या पूर्वनियोजित योजनेप्रमाणे व त्यांच्या पूर्वज्ञानानुसार या मनुष्यास तुमच्या हातात सोपवून दिले आणि तुम्ही दुष्ट लोकांच्या मदतीने, त्यांना क्रूसावर खिळे ठोकून जिवे मारले. परंतु परमेश्वराने त्यांची मृत्यूच्या वेदनांपासून सुटका केली व त्यांना मरणातून पुन्हा उठविले, कारण मृत्यूला येशूंवर अधिकार चालविणे अशक्य होते. दावीद राजा त्यांच्यासंबंधी म्हणतो: “ ‘मी माझ्या प्रभूला नित्य दृष्टीसमोर ठेवले आहे. कारण ते माझ्या उजवीकडे आहेत, मी डळमळणार नाही. यास्तव माझे अंतःकरण उल्हासित आहे आणि माझी जीभ स्तुतिगान करीत आहे; माझे शरीर देखील आशेत विसावा घेईल, कारण तुम्ही मला अधोलोकात राहू देणार नाही, किंवा तुमच्या पवित्रजनाला कुजणे पाहू देणार नाही. तुम्ही मला जीवनाचे मार्ग कळविले आहेत; तुमच्या समक्षतेत तुम्ही मला हर्षाने भराल.’ “प्रिय यहूदी बंधूंनो, मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगू शकतो की, आपला पूर्वज दावीद मरण पावला आणि त्याला पुरले व त्याची कबर आज देखील येथे आहे. परंतु तो संदेष्टा होता व त्याला माहीत होते की परमेश्वराने त्याला शपथ वाहून असे अभिवचन दिले होते, त्याच्या वंशजांपैकी एकाला ते त्याच्या सिंहासनावर बसवतील. पुढे होणार्‍या गोष्टी पाहता, तो ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाबद्दल बोलला, की त्यांना अधोलोकात राहू दिले नाही किंवा त्यांच्या देहाला कुजणे पाहू दिले नाही. त्याच येशूंना परमेश्वराने मरणातून उठवून जिवंत केले आणि त्याचे आम्ही सर्वजण साक्षीदार आहोत. आता ते परमेश्वराच्या उजवीकडे उच्च पदावर आहेत, अभिवचन दिल्याप्रमाणे त्यांनी तो पवित्र आत्मा पित्याकडून घेऊन आम्हावर ओतला आहे, त्याचाच हा परिणाम जे तुम्ही आता पाहात आणि ऐकत आहात. कारण दावीद आकाशात चढून गेला नाही, तरी तो म्हणाला, “ ‘प्रभू माझ्या प्रभूला म्हणाले: “मी तुझ्या शत्रूंना तुझ्या पायाखाली ठेवीपर्यंत माझ्या उजव्या हाताला बसून राहा.” ’ “यास्तव इस्राएलातील सर्वजणांनी खात्री करून घ्यावीः ज्या येशूंना तुम्ही क्रूसावर दिले होते, त्यांना परमेश्वराने प्रभू आणि ख्रिस्त केले आहे.” हे त्याचे बोलणे लोकांच्या अंतःकरणाला भेदले आणि ते पेत्राला व इतर प्रेषितांना म्हणाले, “बंधुजनहो, आता आम्ही काय करावे?”

प्रेषितांची कृत्ये 2:14-37 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

तेव्हा पेत्र अकरा प्रेषितांबरोबर उभा राहून त्यांना मोठ्याने म्हणाला, “अहो यहूदी लोकांनो व यरुशलेमेतील रहिवाशांनो, हे लक्षात आणा व माझे बोलणे ऐकून घ्या. तुम्हांला वाटते तसे हे मस्त झाले नाहीत; कारण हा दिवसाचा पहिला प्रहर आहे; परंतु योएल संदेष्ट्याने जे सांगितले होते ते हे आहे : ‘देव म्हणतो, शेवटल्या दिवसांत असे होईल की, मी मनुष्यमात्रावर आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन; तेव्हा तुमचे पुत्र व तुमच्या कन्या संदेश देतील, तुमच्या तरुणांना दृष्टान्त होतील, व तुमच्या वृद्धांना स्वप्ने पडतील; आणखी त्या दिवसांत मी आपल्या दासांवर व आपल्या दासींवर आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन;’ म्हणजे ते संदेश देतील; ‘आणि’ वर ‘आकाशात अद्भुते, व’ खाली ‘पृथ्वीवर’ चिन्हे, ‘म्हणजे रक्त, अग्नी व धूम्ररूप वाफ अशी मी दाखवीन; परमेश्वराचा महान व प्रसिद्ध दिवस येण्यापूर्वी सूर्य अंधकारमय व चंद्र रक्तमय होईल; तेव्हा असे होईल की, जो कोणी परमेश्वराच्या नावाने त्याचा धावा करील तो तरेल.’ अहो इस्राएल लोकांनो, ह्या गोष्टी ऐका; नासोरी येशूच्या द्वारे देवाने जी महत्कृत्ये, अद्भुते व चिन्हे तुम्हांला दाखवली त्यांवरून देवाने तुमच्याकरता पाठवलेला असा तो मनुष्य होता, ह्याची तुम्हांला माहिती आहे. तो देवाच्या ठाम संकल्पानुसार व पूर्वज्ञानानुसार तुमच्या स्वाधीन झाल्यावर तुम्ही त्याला धरून अधर्म्यांच्या हातांनी वधस्तंभावर खिळून मारले. त्याला देवाने मरणाच्या वेदनांपासून सोडवून उठवले; कारण त्याला मरणाच्या स्वाधीन राहणे अशक्य होते. दावीद त्याच्याविषयी असे म्हणतो, ‘मी परमेश्वराला आपणापुढे नित्य पाहिले आहे; मी ढळू नये म्हणून तो माझ्या उजवीकडे आहे; म्हणून माझे हृदय आनंदित व माझी जीभ उल्लसित झाली; आणि माझा देहही आशेवर राहील. कारण तू माझा जीव अधोलोकात राहू देणार नाहीस, व आपल्या पवित्र पुरुषाला कुजण्याचा अनुभव येऊ देणार नाहीस. जीवनाचे मार्ग तू मला कळवले आहेत; तू आपल्या समक्षतेने मला हर्षभरित करशील.’ बंधुजनहो, कुलाधिपती दावीद ह्याच्याविषयी मी तुमच्याबरोबर प्रशस्तपणे बोलतो. तो मरण पावला, पुरला गेला व त्याची कबर आजपर्यंत आपल्यामध्ये आहे. तो संदेष्टा होता आणि त्याला ठाऊक होते की, देव ‘शपथ वाहून त्याला म्हणाला, देहाप्रमाणे तुझ्या संतानांतील एकाला (म्हणजे ख्रिस्ताला) तुझ्या राजासनावर बसवण्यासाठी मी उठवीन.’ ह्याचे पूर्वज्ञान असल्यामुळे तो ख्रिस्ताच्या पुनरुत्थाना-विषयी असे बोलला की, ‘त्याला अधोलोकात सोडून दिले नाही’ व त्याच्या देहाला ‘कुजण्याचा अनुभव आला नाही.’ त्या येशूला देवाने उठवले ह्याविषयी आम्ही सर्व साक्षी आहोत. म्हणून तो देवाच्या उजव्या हाताकडे बसवलेला आहे, त्याला पवित्र आत्म्याविषयीचे वचन पित्यापासून प्राप्त झाले आहे आणि तुम्ही जे पाहता व ऐकता त्याचा त्याने वर्षाव केला आहे. कारण दावीद स्वर्गास चढून गेला नाही; पण तो स्वत: म्हणतो, ‘परमेश्वराने माझ्या प्रभूला सांगितले की, मी तुझ्या शत्रूंचे तुझ्या पायांसाठी आसन करीपर्यंत तू माझ्या उजवीकडे बसून राहा.’ म्हणून इस्राएलाच्या सर्व घराण्याने हे निश्‍चयपूर्वक समजून घ्यावे की, ज्या येशूला तुम्ही वधस्तंभावर खिळून मारले त्याला देवाने प्रभू व ख्रिस्त असे करून ठेवले आहे.” हे ऐकून त्यांच्या अंतःकरणास चुटपुट लागली आणि ते पेत्र व इतर प्रेषित ह्यांना म्हणाले, “बंधुजनहो, आम्ही काय करावे?”

प्रेषितांची कृत्ये 2:14-37 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

पेत्र अकरा प्रेषितांबरोबर उभा राहून लोकसमुदायास आवेशाने म्हणाला, “अहो यहुदी लोकांनो व यरुशलेमेतील रहिवाश्यांनो, माझे बोलणे लक्षपूर्वक ऐकून घ्या. त्याचा अर्थ समजून घ्या. तुम्हांला वाटते त्याप्रमाणे हे लोक नशेने धुंद झाले नाहीत. ही तर सकाळची नऊची वेळ आहे, उलट, योएल संदेष्ट्याने जे सांगितले होते, ते हे आहे: देव म्हणतो, ‘शेवटच्या दिवसांत असे होईल की, मी मनुष्यमात्रावर माझ्या आत्म्याचा वर्षाव करीन, तेव्हा तुमचे पुत्र व तुमच्या कन्या माझा संदेश घोषित करतील, तुमच्या तरुणांना दृष्टान्त होतील व तुमच्या वृद्धांना स्वप्ने पडतील, आणखी त्या दिवसांत मी माझ्या सेवक व सेविकांवर माझ्या आत्म्याचा वर्षाव करीन, म्हणजे तेदेखील माझा संदेश देऊ लागतील. मी वर आकाशात चमत्कार व खाली पृथ्वीवर अद्भूत कृत्ये करीन. म्हणजेच मी रक्त, अग्नी व धुरासारखे धुके ही चिन्हे दाखवीन, परमेश्वराचा महान व वैभवशाली दिवस येण्यापूर्वी सूर्य अंधकारमय होईल व चंद्र रक्तमय होईल, आणि त्या वेळी जो कोणी परमेश्वराचा धावा करील त्याचा बचाव होईल.’ अहो इस्राएली लोकांनो, ह्या गोष्टी ऐका. नासरेथकर येशूच्याद्वारे देवाची जी महत्कृत्ये, चमत्कार व चिन्हे तुम्हांला पाहायला मिळाली त्यांवरून तो असा मनुष्य होता, त्याचा दैवी अधिकार स्वतः देवाने तुम्हांला सिद्ध करून दाखविला. तो देवाच्या निश्चित योजनेनुसार व पूर्वज्ञानानुसार तुमच्या स्वाधीन झाल्यावर तुम्ही त्याला पापी लोकांद्वारे क्रुसावर चढवून मारले, परंतु त्याला देवाने मरणातून सोडवून उठविले कारण त्याला मरणाच्या सत्तेखाली राहणे अशक्य होते. दावीद त्याच्याविषयी असे म्हणतो: मी प्रभूला आपणापुढे नित्य पाहिले आहे, मी ढळू नये म्हणून तो माझ्या उजवीकडे आहे, माझे हृदय आनंदाने भरून गेले आहे व माझी जीभ उल्हसित झाली आहे तसेच मी जरी मर्त्य असलो, तरीही आशेवर विसंबून राहीन, कारण तू माझा जीव अधोलोकात राहू देणार नाहीस, आपल्या पवित्र सेवकाला तू कुजण्याचा अनुभव येऊ देणार नाहीस. जीवनाचे मार्ग तू मला कळविले आहेत आणि तुझा सहवास मला आनंदाने भरून टाकील. बंधुजनहो, आपल्या कुलाधिपती दावीदविषयी मी तुमच्याबरोबर उघडपणे बोलतो. तो मरण पावला, पुरला गेला व त्याची कबर आजपर्यंत इथे आपल्यामध्ये आहे. तो संदेष्टा होता आणि त्याला ठाऊक होते की, देव शपथ वाहून त्याला म्हणाला, ‘तुझ्या संतानांतील एकाला मी तुझ्या राजासनावर बसवीन.’ ह्याचे पूर्वज्ञान असल्यामुळे तो ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाविषयी असे बोलला की, ‘त्याला अधोलोकात सोडून दिले नाही व त्याच्या देहाला कुजण्याचा अनुभव आला नाही.’ ह्या येशूला देवाने उठविले, ह्याविषयी आम्ही सर्व साक्षीदार आहोत. देवाच्या उजव्या हाताकडे त्याला उच्चस्थान देण्यात आले आहे, पित्याने वचन दिल्याप्रमाणे त्याला पवित्र आत्मा मिळाला असून तुम्ही जे पाहता व ऐकता तो त्याच दानाचा त्याने आमच्यावर केलेला वर्षाव आहे. कारण दावीद स्वर्गात चढून गेला नाही, पण तो स्वतः म्हणतो: परमेश्वराने माझ्या प्रभूला सांगितले, ‘मी तुझे वैरी तुझ्या पायांसाठी आसन करीपर्यंत तू माझ्या उजवीकडे बसून राहा.’ म्हणून इस्त्राएलच्या सर्व घराण्यांनी हे ठामपणे समजून घ्यावे की, ज्या येशूला तुम्ही क्रुसावर चढवून मारलेत, त्याला देवाने प्रभू व ख्रिस्त असे संबोधले आहे!” हे ऐकून त्यांच्या अंतःकरणास चुटपुट लागली, ते पेत्र व इतर प्रेषित ह्यांना म्हणाले, “बंधुजनहो, तर आम्ही काय करावे?”