त्यावेळी पेत्र अकरा प्रेषितांसह उभा राहून, त्या जमावाला उद्देशून मोठ्याने म्हणाला: “यरुशलेममधील यहूदी बंधूंनो आणि रहिवाशांनो, तुम्हाला या गोष्टी स्पष्ट समजणे आवश्यक आहे; म्हणून माझे बोलणे लक्षपूर्वक ऐका. तुम्ही समजता त्याप्रमाणे ही माणसे द्राक्षारसाने मस्त झालेली नाहीत. आता तर सकाळचे फक्त नऊ वाजले आहेत! तर पाहा याविषयी संदेष्टा योएलने असे भविष्य केले होते:
“ ‘परमेश्वर म्हणतात, शेवटच्या दिवसात,
मी माझा आत्मा सर्व लोकांवर ओतेन.
तुमचे पुत्र व तुमच्या कन्या भविष्यवाणी करतील,
व तुमचे वृद्ध स्वप्ने पाहतील,
तुमचे तरुण दृष्टान्त पाहतील.
माझ्या दासांवर म्हणजेच, स्त्री आणि पुरुष दोघांवरही,
त्या दिवसांत मी माझा आत्मा ओतेन.
आणि ते भविष्यवाणी करतील.
वर आकाशात व खाली पृथ्वीवर,
रक्त व अग्नी व धुरांचे स्तंभ अशी
विलक्षण चिन्हे मी दाखवेन.
प्रभूचा महान व गौरवी दिवस
येण्यापूर्वी सूर्य अंधकारमय व
चंद्र रक्तमय होईल.
आणि जो कोणी प्रभूच्या नावाने
त्यांचा धावा करेल तोच वाचेल.’
“अहो इस्राएली लोकहो! आता हे लक्ष देऊन ऐका: तुम्हाला चांगलेच माहीत आहे की, परमेश्वराने नासरेथकर येशूंना अधिकृत मान्यता देऊन त्यांच्याद्वारे तुमच्यामध्ये चमत्कार, अद्भुत गोष्टी व चिन्हे केली. परमेश्वराच्या पूर्वनियोजित योजनेप्रमाणे व त्यांच्या पूर्वज्ञानानुसार या मनुष्यास तुमच्या हातात सोपवून दिले आणि तुम्ही दुष्ट लोकांच्या मदतीने, त्यांना क्रूसावर खिळे ठोकून जिवे मारले. परंतु परमेश्वराने त्यांची मृत्यूच्या वेदनांपासून सुटका केली व त्यांना मरणातून पुन्हा उठविले, कारण मृत्यूला येशूंवर अधिकार चालविणे अशक्य होते. दावीद राजा त्यांच्यासंबंधी म्हणतो:
“ ‘मी माझ्या प्रभूला नित्य दृष्टीसमोर ठेवले आहे.
कारण ते माझ्या उजवीकडे आहेत,
मी डळमळणार नाही.
यास्तव माझे अंतःकरण उल्हासित आहे आणि माझी जीभ स्तुतिगान करीत आहे;
माझे शरीर देखील आशेत विसावा घेईल,
कारण तुम्ही मला अधोलोकात राहू देणार नाही,
किंवा तुमच्या पवित्रजनाला कुजणे पाहू देणार नाही.
तुम्ही मला जीवनाचे मार्ग कळविले आहेत;
तुमच्या समक्षतेत तुम्ही मला हर्षाने भराल.’
“प्रिय यहूदी बंधूंनो, मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगू शकतो की, आपला पूर्वज दावीद मरण पावला आणि त्याला पुरले व त्याची कबर आज देखील येथे आहे. परंतु तो संदेष्टा होता व त्याला माहीत होते की परमेश्वराने त्याला शपथ वाहून असे अभिवचन दिले होते, त्याच्या वंशजांपैकी एकाला ते त्याच्या सिंहासनावर बसवतील. पुढे होणार्या गोष्टी पाहता, तो ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाबद्दल बोलला, की त्यांना अधोलोकात राहू दिले नाही किंवा त्यांच्या देहाला कुजणे पाहू दिले नाही. त्याच येशूंना परमेश्वराने मरणातून उठवून जिवंत केले आणि त्याचे आम्ही सर्वजण साक्षीदार आहोत. आता ते परमेश्वराच्या उजवीकडे उच्च पदावर आहेत, अभिवचन दिल्याप्रमाणे त्यांनी तो पवित्र आत्मा पित्याकडून घेऊन आम्हावर ओतला आहे, त्याचाच हा परिणाम जे तुम्ही आता पाहात आणि ऐकत आहात. कारण दावीद आकाशात चढून गेला नाही, तरी तो म्हणाला,
“ ‘प्रभू माझ्या प्रभूला म्हणाले:
“मी तुझ्या शत्रूंना तुझ्या पायाखाली ठेवीपर्यंत
माझ्या उजव्या हाताला बसून राहा.” ’
“यास्तव इस्राएलातील सर्वजणांनी खात्री करून घ्यावीः ज्या येशूंना तुम्ही क्रूसावर दिले होते, त्यांना परमेश्वराने प्रभू आणि ख्रिस्त केले आहे.”
हे त्याचे बोलणे लोकांच्या अंतःकरणाला भेदले आणि ते पेत्राला व इतर प्रेषितांना म्हणाले, “बंधुजनहो, आता आम्ही काय करावे?”