YouVersion लोगो
सर्च आयकॉन

प्रेषि. 2:14-37

प्रेषि. 2:14-37 IRVMAR

तेव्हा पेत्र अकरा प्रेषितांबरोबर उभा राहून, त्यांना मोठ्याने म्हणाला, अहो यहूदी लोकांनो व यरूशलेम शहरातील रहिवाश्यांनो, हे लक्षात आणा व माझे बोलणे ऐकून घ्या. तुम्हास वाटते हे मस्त झाले आहेत, पण असे नाही कारण सकाळचे नऊ वाजले आहेत. परंतु योएल संदेष्ट्याने जे सांगितले होते ते हे आहे: देव म्हणतो, “शेवटच्या दिवसात असे होईल, मी मनुष्यमात्रावर आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन, तेव्हा तुमचे पुत्र व तुमच्या कन्या संदेश देतील. तुमच्या तरूणांस दृष्टांत होतील व तुमच्या वृद्धास स्वप्ने पडतील. आणखी त्या दिवसात मी आपल्या दासांवर व आपल्या दासींवर आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन, म्हणजे ते संदेश देतील. आणि वर आकाशात अद्भूते व खाली पृथ्वीवर चिन्हे, म्हणजे रक्त, अग्नी व धूम्ररूप वाफ अशी मी दाखवीन. परमेश्वराचा महान व प्रसिद्ध दिवस येण्यापूर्वी सूर्य अंधकारमय व चंद्र रक्तमय होईल. तेव्हा असे होईल की जो कोणी परमेश्वराच्या नावाने त्याचा धावा करील तो तरेल.” “अहो इस्राएल लोकांनो, या गोष्टी ऐका: नासोरी येशूच्या द्वारे देवाने जी महत्कृत्ये, अद्भूते व चिन्हे तुम्हास दाखविली त्यावरून देवाने तुम्हाकरिता मान्यता दिलेला असा तो मनुष्य होता, याची तुम्हास माहिती आहे. तो देवाच्या ठाम संकल्पानुसार व पूर्वज्ञानानुसार तुमच्या स्वाधीन झाल्यावर, तुम्ही त्यास धरून अधर्म्यांच्या हातांनी वधस्तंभावर खिळून मारले; त्यास देवाने मरणाच्या वेदनांपासून सोडवून उठवले, कारण त्यास मरणाच्या स्वाधीन राहणे अशक्य होते. दावीद त्याच्याविषयी असे म्हणतो, ‘मी परमेश्वरास आपणापुढे नित्य पाहिले आहे; मी ढळू नये म्हणून तो माझ्या उजवीकडे आहे. म्हणून माझे हृदय आनंदित व माझी जीभ उल्लसित झालीच आणखी माझा देह ही आशेवर राहील. कारण तू माझा जीव मृतलोकात राहू देणार नाहीस, व आपल्या पवित्र पुरुषाला कुजण्याचा अनुभव येऊ देणार नाहीस. जीवनाचे मार्ग तू मला कळविले आहेत; ते आपल्या समक्षतेने मला हर्षभरीत करशील.’” “बंधुजनहो, कुलाधिपति दावीद: ह्याच्याविषयी मी तुम्हाबरोबर प्रशस्तपणे बोलतो तो मरण पावला, पुरला गेला व त्याची कबर आजपर्यंत आपल्यामध्ये आहे. तो संदेष्टा होता, आणि त्यास ठाऊक होते की देवाने त्यास अभिवचन दिले की तुझ्या संतानातील एकाला तुझ्या राजासनावर बसवीन. ह्याचे पूर्वज्ञान असल्यामुळे तो ख्रिस्ताच्या: पुनरुत्थानाविषयी असे बोलला की, त्यास मृतलोकात सोडून दिले नाही, व त्याच्या देहाला कुजण्याचा अनुभव आला नाही. त्या येशूला देवाने उठवले, ह्याविषयी आम्ही सर्व साक्षी आहोत. म्हणून तो देवाच्या उजव्या हाताकडे बसविलेला आहे त्यास पवित्र आत्म्याविषयीचे वचन पित्यापासून प्राप्त झाले आहे, आणि तुम्ही जे पाहता व ऐकता त्याचा त्याने वर्षाव केला आहे. कारण दावीद राजा स्वर्गास चढून गेला नाही, पण तो स्वतः म्हणतो, ‘परमेश्वराने माझ्या प्रभूला सांगितले की, मी तुझ्या शत्रूचे तुझे पादासन करेपर्यंत तू माझ्या उजवीकडे बसून राहा.’” “म्हणून, इस्राएलाच्या सर्व घराण्याने हे निश्चयपूर्वक समजून घ्यावे की, ज्या येशूला तुम्ही वधस्तंभावर खिळून मारले त्यास देवाने प्रभू व ख्रिस्त असे करून ठेवले आहे.” हे ऐकून त्यांच्या अंतःकरणास चुटपुट लागली आणि ते पेत्र व इतर प्रेषित ह्यांना म्हणाले, “बंधुजनहो, आम्ही काय करावे?”

प्रेषि. 2:14-37 साठी चलचित्र