प्रेषितांचे कार्य 2
2
पेन्टेकॉस्टः पवित्र आत्म्याचे आगमन
1पेन्टेकॉस्ट म्हणजे पन्नासावा दिवस आला, तेव्हा ते सर्व एकत्र जमले असताना, 2अकस्मात आकाशातून सोसाट्याच्या वाऱ्यासारखा आवाज झाला व ज्या घरात ते बसले होते ते घर त्या आवाजाने भरले. 3नंतर अग्नीसारख्या निरनिराळ्या जिभा त्यांना दिसल्या व त्या प्रत्येकावर एक एक अशा स्थिरावल्या. 4ते सर्व जण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि आत्म्याने जसजशी त्यांना वाचा दिली, तसतसे ते निरनिराळ्या भाषांतून बोलू लागले.
5त्या वेळेस आकाशाखालच्या प्रत्येक राष्ट्रातून आलेले यहुदी लोक यरुशलेममध्ये राहत होते. 6तो ध्वनी ऐकल्यावर लोकसमुदाय एकत्र होऊन भांबावून गेला कारण प्रत्येकाने आपापल्या भाषेत त्यांना बोलताना ऐकले. 7ते सर्व आश्चर्याने थक्क होऊन म्हणाले, “पाहा, हे अशा प्रकारे बोलणारे सर्व गालीलकर ना? 8तर आपण प्रत्येक जण आपापली भाषा ऐकतो हे कसे? 9आपण पार्थी, मेदी, एलामी, मेसोपटेम्या, यहुदिया, कप्पुदुकिया, पंत, आसिया, 10फ्रुगिया, पंफूलिया, मिसर व कुरणेजवळील लिबुवा अशा विविध प्रदेशांतले आहोत. आपणांपैकी काही लोक मूळचे यहुदी व इतर काही धर्मांतरित यहुदी असे रोमन आहेत. 11तसेच इतर काही लोक क्रेती व अरब आहेत. असे असतानाही आपण त्यांना आपापल्या भाषांत देवाची महत्कृत्ये सांगताना ऐकतो.”
12ते सर्व विस्मित होऊन व गोंधळून जाऊन एकमेकांना विचारू लागले, “हे काय असेल?” 13परंतु दुसरे कित्येक चेष्टा करत म्हणाले, “हे नव्या द्राक्षारसाने मस्त झाले आहेत.”
पेन्टेकॉस्टच्या वेळचे पेत्राचे भाषण
14पेत्र अकरा प्रेषितांबरोबर उभा राहून लोकसमुदायास आवेशाने म्हणाला, “अहो यहुदी लोकांनो व यरुशलेमेतील रहिवाश्यांनो, माझे बोलणे लक्षपूर्वक ऐकून घ्या. त्याचा अर्थ समजून घ्या. 15तुम्हांला वाटते त्याप्रमाणे हे लोक नशेने धुंद झाले नाहीत. ही तर सकाळची नऊची वेळ आहे, 16उलट, योएल संदेष्ट्याने जे सांगितले होते, ते हे आहे:
17देव म्हणतो,
‘शेवटच्या दिवसांत असे होईल की,
मी मनुष्यमात्रावर माझ्या आत्म्याचा वर्षाव करीन,
तेव्हा तुमचे पुत्र व तुमच्या कन्या
माझा संदेश घोषित करतील,
तुमच्या तरुणांना दृष्टान्त होतील
व तुमच्या वृद्धांना स्वप्ने पडतील,
18आणखी त्या दिवसांत मी माझ्या सेवक
व सेविकांवर माझ्या आत्म्याचा वर्षाव करीन,
म्हणजे तेदेखील माझा संदेश देऊ लागतील.
19मी वर आकाशात चमत्कार
व खाली पृथ्वीवर अद्भूत कृत्ये करीन.
म्हणजेच मी रक्त, अग्नी व धुरासारखे धुके ही चिन्हे दाखवीन,
20परमेश्वराचा महान व वैभवशाली दिवस येण्यापूर्वी सूर्य अंधकारमय होईल
व चंद्र रक्तमय होईल,
21आणि त्या वेळी जो कोणी परमेश्वराचा
धावा करील त्याचा बचाव होईल.’
22अहो इस्राएली लोकांनो, ह्या गोष्टी ऐका. नासरेथकर येशूच्याद्वारे देवाची जी महत्कृत्ये, चमत्कार व चिन्हे तुम्हांला पाहायला मिळाली त्यांवरून तो असा मनुष्य होता, त्याचा दैवी अधिकार स्वतः देवाने तुम्हांला सिद्ध करून दाखविला. 23तो देवाच्या निश्चित योजनेनुसार व पूर्वज्ञानानुसार तुमच्या स्वाधीन झाल्यावर तुम्ही त्याला पापी लोकांद्वारे क्रुसावर चढवून मारले, 24परंतु त्याला देवाने मरणातून सोडवून उठविले कारण त्याला मरणाच्या सत्तेखाली राहणे अशक्य होते. 25दावीद त्याच्याविषयी असे म्हणतो:
मी प्रभूला आपणापुढे नित्य पाहिले आहे,
मी ढळू नये म्हणून
तो माझ्या उजवीकडे आहे,
26माझे हृदय आनंदाने भरून गेले आहे
व माझी जीभ उल्हसित झाली आहे
तसेच मी जरी मर्त्य असलो, तरीही आशेवर विसंबून राहीन,
27कारण तू माझा जीव अधोलोकात राहू देणार नाहीस,
आपल्या पवित्र सेवकाला
तू कुजण्याचा अनुभव येऊ देणार नाहीस.
28जीवनाचे मार्ग तू मला कळविले आहेत
आणि तुझा सहवास मला आनंदाने भरून टाकील.
29बंधुजनहो, आपल्या कुलाधिपती दावीदविषयी मी तुमच्याबरोबर उघडपणे बोलतो. तो मरण पावला, पुरला गेला व त्याची कबर आजपर्यंत इथे आपल्यामध्ये आहे. 30तो संदेष्टा होता आणि त्याला ठाऊक होते की, देव शपथ वाहून त्याला म्हणाला, ‘तुझ्या संतानांतील एकाला मी तुझ्या राजासनावर बसवीन.’ 31ह्याचे पूर्वज्ञान असल्यामुळे तो ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाविषयी असे बोलला की, ‘त्याला अधोलोकात सोडून दिले नाही व त्याच्या देहाला कुजण्याचा अनुभव आला नाही.’
32ह्या येशूला देवाने उठविले, ह्याविषयी आम्ही सर्व साक्षीदार आहोत. 33देवाच्या उजव्या हाताकडे त्याला उच्चस्थान देण्यात आले आहे, पित्याने वचन दिल्याप्रमाणे त्याला पवित्र आत्मा मिळाला असून तुम्ही जे पाहता व ऐकता तो त्याच दानाचा त्याने आमच्यावर केलेला वर्षाव आहे. 34कारण दावीद स्वर्गात चढून गेला नाही, पण तो स्वतः म्हणतो:
परमेश्वराने माझ्या प्रभूला सांगितले,
35‘मी तुझे वैरी तुझ्या पायांसाठी
आसन करीपर्यंत
तू माझ्या उजवीकडे बसून राहा.’
36म्हणून इस्त्राएलच्या सर्व घराण्यांनी हे ठामपणे समजून घ्यावे की, ज्या येशूला तुम्ही क्रुसावर चढवून मारलेत, त्याला देवाने प्रभू व ख्रिस्त असे संबोधले आहे!”
37हे ऐकून त्यांच्या अंतःकरणास चुटपुट लागली, ते पेत्र व इतर प्रेषित ह्यांना म्हणाले, “बंधुजनहो, तर आम्ही काय करावे?”
38पेत्र त्यांना म्हणाला, “पश्चात्ताप करा व तुम्ही प्रत्येक जण येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या म्हणजे तुमच्या पापांची तुम्हांला क्षमा मिळेल आणि तुम्हांला पवित्र आत्म्याचे दान प्राप्त होईल. 39कारण देवाचे वचन तुम्हांला, तुमच्या मुलाबाळांना व जे दूर आहेत त्या सर्वांना म्हणजे जितक्यांना आपला प्रभू परमेश्वर स्वतःकडे बोलावितो तितक्यांना दिले आहे.”
40आणखी त्याने दुसऱ्या पुष्कळ गोष्टी सांगून त्यांना आर्जवून म्हटले, “ह्या भ्रष्ट पिढीला होणाऱ्या शिक्षेपासून तुम्ही आपला बचाव करून घ्या!” 41त्या वेळी त्यांनी त्याच्या संदेशाचा स्वीकार केला व त्यांना बाप्तिस्मा देण्यात आला. त्या दिवशी त्यांच्यात सुमारे तीन हजार माणसांची भर पडली.
ख्रिस्तमंडळ्यांचे धार्मिक जीवन
42ते प्रेषितांच्या शिक्षणात व सहभागितेत, भाकर मोडण्यात आणि प्रार्थना करण्यात वेळ व्यतीत करीत असत.
43प्रेषितांच्या हातून पुष्कळ अद्भूत कृत्ये व चिन्हे घडत होती म्हणून प्रत्येक मनुष्याला आदरयुक्त भय वाटत होते. 44विश्वास ठेवणारे सर्व एकत्र होते आणि त्यांचे सर्व काही सामाईक होते. 45ते आपापली जमीन व मालमत्ता विकून जसजशी प्रत्येकाला गरज लागत असे, तसतशी सर्वांना वाटून देत असत. 46ते दररोज मंदिरात एकत्र जमत असत, घरोघरी भाकर मोडत असत आणि आनंदी व विनम्र वृत्तीने अन्न खात असत. 47देवाची स्तुती करीत सर्व लोकांच्या सद्भावना त्यांच्या पाठीशी असत. तारण प्राप्त होत असलेल्या माणसांची भर प्रभू दररोज त्यांच्यात घालत असे.
सध्या निवडलेले:
प्रेषितांचे कार्य 2: MACLBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi C.L. (NT), पवित्र शास्त्र
Copyright © 2018 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.