YouVersion लोगो
सर्च आयकॉन

प्रेषितांचे कार्य 2:14-37

प्रेषितांचे कार्य 2:14-37 MACLBSI

पेत्र अकरा प्रेषितांबरोबर उभा राहून लोकसमुदायास आवेशाने म्हणाला, “अहो यहुदी लोकांनो व यरुशलेमेतील रहिवाश्यांनो, माझे बोलणे लक्षपूर्वक ऐकून घ्या. त्याचा अर्थ समजून घ्या. तुम्हांला वाटते त्याप्रमाणे हे लोक नशेने धुंद झाले नाहीत. ही तर सकाळची नऊची वेळ आहे, उलट, योएल संदेष्ट्याने जे सांगितले होते, ते हे आहे: देव म्हणतो, ‘शेवटच्या दिवसांत असे होईल की, मी मनुष्यमात्रावर माझ्या आत्म्याचा वर्षाव करीन, तेव्हा तुमचे पुत्र व तुमच्या कन्या माझा संदेश घोषित करतील, तुमच्या तरुणांना दृष्टान्त होतील व तुमच्या वृद्धांना स्वप्ने पडतील, आणखी त्या दिवसांत मी माझ्या सेवक व सेविकांवर माझ्या आत्म्याचा वर्षाव करीन, म्हणजे तेदेखील माझा संदेश देऊ लागतील. मी वर आकाशात चमत्कार व खाली पृथ्वीवर अद्भूत कृत्ये करीन. म्हणजेच मी रक्त, अग्नी व धुरासारखे धुके ही चिन्हे दाखवीन, परमेश्वराचा महान व वैभवशाली दिवस येण्यापूर्वी सूर्य अंधकारमय होईल व चंद्र रक्तमय होईल, आणि त्या वेळी जो कोणी परमेश्वराचा धावा करील त्याचा बचाव होईल.’ अहो इस्राएली लोकांनो, ह्या गोष्टी ऐका. नासरेथकर येशूच्याद्वारे देवाची जी महत्कृत्ये, चमत्कार व चिन्हे तुम्हांला पाहायला मिळाली त्यांवरून तो असा मनुष्य होता, त्याचा दैवी अधिकार स्वतः देवाने तुम्हांला सिद्ध करून दाखविला. तो देवाच्या निश्चित योजनेनुसार व पूर्वज्ञानानुसार तुमच्या स्वाधीन झाल्यावर तुम्ही त्याला पापी लोकांद्वारे क्रुसावर चढवून मारले, परंतु त्याला देवाने मरणातून सोडवून उठविले कारण त्याला मरणाच्या सत्तेखाली राहणे अशक्य होते. दावीद त्याच्याविषयी असे म्हणतो: मी प्रभूला आपणापुढे नित्य पाहिले आहे, मी ढळू नये म्हणून तो माझ्या उजवीकडे आहे, माझे हृदय आनंदाने भरून गेले आहे व माझी जीभ उल्हसित झाली आहे तसेच मी जरी मर्त्य असलो, तरीही आशेवर विसंबून राहीन, कारण तू माझा जीव अधोलोकात राहू देणार नाहीस, आपल्या पवित्र सेवकाला तू कुजण्याचा अनुभव येऊ देणार नाहीस. जीवनाचे मार्ग तू मला कळविले आहेत आणि तुझा सहवास मला आनंदाने भरून टाकील. बंधुजनहो, आपल्या कुलाधिपती दावीदविषयी मी तुमच्याबरोबर उघडपणे बोलतो. तो मरण पावला, पुरला गेला व त्याची कबर आजपर्यंत इथे आपल्यामध्ये आहे. तो संदेष्टा होता आणि त्याला ठाऊक होते की, देव शपथ वाहून त्याला म्हणाला, ‘तुझ्या संतानांतील एकाला मी तुझ्या राजासनावर बसवीन.’ ह्याचे पूर्वज्ञान असल्यामुळे तो ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाविषयी असे बोलला की, ‘त्याला अधोलोकात सोडून दिले नाही व त्याच्या देहाला कुजण्याचा अनुभव आला नाही.’ ह्या येशूला देवाने उठविले, ह्याविषयी आम्ही सर्व साक्षीदार आहोत. देवाच्या उजव्या हाताकडे त्याला उच्चस्थान देण्यात आले आहे, पित्याने वचन दिल्याप्रमाणे त्याला पवित्र आत्मा मिळाला असून तुम्ही जे पाहता व ऐकता तो त्याच दानाचा त्याने आमच्यावर केलेला वर्षाव आहे. कारण दावीद स्वर्गात चढून गेला नाही, पण तो स्वतः म्हणतो: परमेश्वराने माझ्या प्रभूला सांगितले, ‘मी तुझे वैरी तुझ्या पायांसाठी आसन करीपर्यंत तू माझ्या उजवीकडे बसून राहा.’ म्हणून इस्त्राएलच्या सर्व घराण्यांनी हे ठामपणे समजून घ्यावे की, ज्या येशूला तुम्ही क्रुसावर चढवून मारलेत, त्याला देवाने प्रभू व ख्रिस्त असे संबोधले आहे!” हे ऐकून त्यांच्या अंतःकरणास चुटपुट लागली, ते पेत्र व इतर प्रेषित ह्यांना म्हणाले, “बंधुजनहो, तर आम्ही काय करावे?”

प्रेषितांचे कार्य 2:14-37 साठी चलचित्र