स्तोत्रसंहिता 102
102
स्तोत्र 102
संकटसमयीच्या आक्रांत पुरुषाची अभ्यर्थना. तो अत्यंत उदास आहे आणि याहवेहच्या समोर स्वतःच्या हृदय-वेदनेचे वर्णन करीत आहे.
1हे याहवेह, माझी प्रार्थना ऐका;
माझी मदतीची विनवणी तुमच्यापर्यंत पोहचो.
2मी संकटसमयात असता
तुम्ही आपले मुख माझ्यापासून लपवू नका.
जेव्हा मी तुमचा धावा करेन तेव्हा मला त्वरेने उत्तर द्या;
तुमचे कान माझ्याकडे लावा.
3कारण माझे दिवस धुरासारखे विरून जात आहेत;
माझ्या हाडांचा जळत्या कोळशासारखा दाह होत आहे.
4माझे हृदय गवताप्रमाणे करपून व कोमेजून गेले आहे;
अन्न सेवन करण्याचेही मला स्मरण होत नाही.
5निराशेने आता अधिकच उच्चस्वरात कण्हत असून
मी कातडी व हाडे यांचा सापळा झालो आहे.
6ओसाड प्रदेशातील घुबडासारखा,
भग्नावशेषातील घुबडासारखा मी झालो आहे.
7मी जागाच राहतो.
छपरावर एकाकी असणार्या पक्ष्यासारखा मी झालो आहे.
8माझे शत्रू दिवसेंदिवस मला टोचून बोलतात;
आणि माझा उपहास करणारे माझे नाव एखाद्या श्रापासारखे देतात.
9मी अन्न म्हणून राख खात आहे;
आणि माझे अश्रू माझ्या पेयात मिश्रित होतात,
10तुम्ही माझ्यावर क्रोधाविष्ट झाला आहात;
कारण संतापाने तुम्ही मला उचलून फेकून दिले.
11सायंकाळच्या सावलीप्रमाणे माझे आयुष्य वेगाने संपत आहे;
मी गवताप्रमाणे वाळून जात आहे.
12परंतु हे याहवेह देवा, तुम्ही सदासर्वकाळ सिंहासनावर विराजमान आहात;
तुमची किर्ती पिढ्यान् पिढ्या टिकून राहील.
13तुम्ही याल आणि सीयोनावर दया कराल,
कारण तिच्यावरील कृपादृष्टीची वेळ येऊन ठेपली आहे;
तो निश्चित समय आलेला आहे.
14यातील प्रत्येक धोंड्यावर तुमचे सेवक प्रीती करतात;
येथील धूळ देखील त्यांचे मन द्रवित करते.
15सर्व राष्ट्रे तुमच्या नामाचे भय धरतील,
पृथ्वीवरील सर्व राजे तुमच्या गौरवासमोर नतमस्तक होतील.
16कारण याहवेह सीयोनाची पुनर्बांधणी करतील;
आणि त्यांच्या गौरवाने प्रगट होतील.
17निराधार लोकांच्या प्रार्थना ते ऐकतील;
त्यांच्या विनवण्यांचा ते तिरस्कार करणार नाहीत.
18भावी पिढ्यांच्या हितासाठी हे सर्व नमूद करून ठेवले जावो,
जे आजपर्यंत अस्तित्वात नाहीत, तेही याहवेहची स्तुती करतील:
19“याहवेहने आपल्या महान पवित्रस्थानातून खाली दृष्टी टाकली,
त्यांनी स्वर्गातून पृथ्वीकडे पाहिले,
20जेणेकरून गुलामगिरीतील लोकांचे कण्हणे ऐकावे
आणि मृत्युदंड मिळालेल्यांची सुटका करावी.”
21म्हणजे सर्व लोक याहवेह देवाची महिमा सीयोनात जाहीर करतील
आणि यरुशलेमात त्यांची स्तुती करतील.
22जेव्हा लोक व राष्ट्रेही
याहवेहची उपासना करण्यासाठी तिथे येतील.
23माझ्या जीवनयात्रेच्या मध्येच त्यांनी माझे बळ तोडले;
त्यांनी माझे आयुष्य कमी केले.
24पण मी त्यांना आरोळी मारली:
“हे परमेश्वरा, आयुष्याच्या मध्यातच मला मृत्यू येऊ देऊ नका;
तुमची वर्षे पिढ्यान् पिढ्या निरंतर असतात.
25प्रारंभी पृथ्वीचा पाया तुम्हीच घातला,
आणि आपल्या हातांनी तुम्ही गगनमंडळे निर्माण केलीत.
26ती नष्ट होतील, परंतु तुम्ही निरंतर राहाल;
ती सर्व जुन्या वस्त्राप्रमाणे जीर्ण होतील;
जुनी वस्त्रे टाकून नवी घालावी,
तसे तुम्ही त्यांना बदलून टाकाल.
27परंतु तुम्ही निरंतर समान राहणार,
आणि तुमची वर्षे कधीही संपुष्टात येणार नाहीत.
28तुमच्या सेवकांचे संतान तुमच्या उपस्थितीत टिकून राहतील;
तुमच्या संरक्षणाखाली त्यांच्या वंशजांचे जतन होईल.”
सध्या निवडलेले:
स्तोत्रसंहिता 102: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.