YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 103

103
स्तोत्र 103
दावीदाची रचना
1माझ्या जिवा, याहवेहचे स्तवन कर;
माझ्या संपूर्ण अंतरात्म्या, त्यांच्या पवित्र नामाचे स्तवन कर.
2हे माझ्या जिवा, याहवेहचे स्तवन कर;
त्यांनी केलेले उपकार कधीही विसरू नको.
3जे तुझ्या सर्व अपराधांची क्षमा करतात,
जे तुझे सर्व रोग बरे करतात.
4जे नाशाच्या दरीतून तुझी सुटका करतात;
आपल्या प्रीतीचा आणि दयेचा तुला मुकुट घालतात.
5जे तुझे आयुष्य उत्तम पदार्थांनी तृप्त करतात;
म्हणून गरुडासारखे तुझ्या तारुण्याचे नवीनीकरण होते.
6ज्यांच्यावर जुलूम केला गेला,
त्या सर्वांना याहवेह धार्मिकतेने व न्यायाने वागवितात.
7त्यांनी आपले मार्ग मोशेला प्रगट केले,
आणि आपली अद्भुत कृत्ये इस्राएली लोकात केली:
8याहवेह कृपावान व करुणामय आहेत,
ते मंदक्रोध व प्रीतीने विपुल आहेत.
9ते सर्वदाच दोष देत राहणार नाहीत,
व त्यांचा क्रोध सर्वकाळ टिकून ठेवत नाहीत.
10ते आपल्या अपराधास यथायोग्य असा दंड देत नाहीत,
अथवा आपल्या कुकृत्याच्या प्रमाणात प्रतिफळ देत नाहीत.
11कारण पृथ्वीच्यावर आकाश जितके उंच आहे,
तितकी त्यांची प्रीती, त्यांचे भय बाळगणार्‍यांवर विपुल आहे.
12पूर्वेपासून पश्चिम जेवढी दूर आहे,
तेवढे त्यांनी आमचे अपराध आम्हांपासून दूर केले आहेत.
13जशी पित्याची करुणा त्याच्या लेकरांवर असते,
तसे त्यांचे भय बाळगणार्‍यांसाठी याहवेह कोमलहृदयी व सहानुभूतीने भरलेले आहेत.
14कारण आम्ही कसे निर्माण झालो हे ते जाणतात,
आम्ही धूळ आहोत याचे त्यांना स्मरण आहे.
15मर्त्यप्राण्याचे जीवन गवताप्रमाणे आहे,
ते मैदानावर एखाद्या फुलासारखे फुलतात;
16परंतु उष्ण वारा त्यावर येताच ते कायमचे नाहीसे होते,
ते स्थळ त्याचे स्मरण करीत नाही.
17परंतु याहवेहची प्रेममयदया त्यांचे भय धरणार्‍यांवर
अनादि पासून अनंतकालापर्यंत
तथा त्यांची नीतिमत्ता त्याच्या पुत्र पौत्रांना लाभते.
18जे त्यांच्या कराराशी प्रामाणिक राहतात,
आणि त्यांच्या आज्ञा पाळण्याची आठवण ठेवतात.
19याहवेहने स्वर्गात आपले सिंहासन प्रस्थापित केले आहे,
आणि संपूर्ण विश्वावर त्यांची सत्ता आहे.
20अहो प्रतापशाली स्वर्गदूतांनो,
त्यांची आज्ञा अंमलात आणणारे,
व त्यांच्या वचनाचे पालन करणारे, याहवेहचे स्तवन करा.
21अहो स्वर्गातील सर्व सैन्यहो,
त्यांची इच्छापूर्ती करणारे त्यांचे सेवकहो, याहवेहचे स्तवन करा.
22त्यांच्या अधिपत्त्यातील अखिल रचनांनो,
याहवेहचे स्तवन करा.
हे माझ्या जिवा, याहवेहचे स्तवन कर.

सध्या निवडलेले:

स्तोत्रसंहिता 103: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन