YouVersion लोगो
सर्च आयकॉन

नहेम्या 13

13
नहेम्याहच्या अंतिम सुधारणा
1त्याच दिवशी, मोशेचे नियमशास्त्र मोठ्याने वाचण्यात येत असताना, लोकांना एक विधान ऐकावयास मिळाले. त्यात असे लिहिले होते की अम्मोनी व मोआबींना परमेश्वराच्या सभामध्ये प्रवेश करण्याची कधीही परवानगी देण्यात येऊ नये, 2कारण त्यांनी इस्राएली लोकांना अन्न व पाण्याचा पुरवठा केला नाही. उलट त्यांनी त्यांना शाप देण्यासाठी बलामाला पैसे देऊन बोलाविले. (पण परमेश्वराने त्या शापाचे रूपांतर आशीर्वादात केले ही गोष्ट वेगळी.) 3जेव्हा लोकांनी नियमशास्त्रातील हे वचन ऐकले, तेव्हा त्यांनी सर्व विदेशी वंशजांच्या लोकांना इस्राएलमधून वगळले.
4ही घटना घडण्यापूर्वी, एल्याशीब याजकाला परमेश्वराच्या भवनातील कोठड्यांचा रक्षक म्हणून नेमण्यात आले होते. तो तोबीयाहाचा एक स्नेही होता. 5त्याने तोबीयाहाला एका कोठडी दिली. ही कोठडी पूर्वी धान्यार्पण, ऊद, मंदिराचे सामान, तसेच धान्य, नवीन द्राक्षारस आणि जैतुनाचे तेल यांच्या दशांशांचे साठे ठेवण्यासाठी वापरली जात असे. ही सर्व अर्पणे लेव्यांसाठी, संगीतकारांच्या सभासदांसाठी आणि द्वारपालांसाठी, त्याचबरोबर याजकांसाठी वर्गणी म्हणून असत.
6हे सर्वकाही होत असताना, मी यरुशलेमात नव्हतो, कारण बाबेलचा राजा अर्तहशश्तच्या कारकिर्दीच्या बत्तिसाव्या वर्षी मी त्याच्याकडे परतलो होतो. काही काळानंतर मी त्याला परवानगी मागितली, 7आणि मी यरुशलेमला परत आलो. तेव्हा मला एल्याशीबाने तोबीयाहास परमेश्वराच्या मंदिरातील अंगणात एका कोठार देण्याचे गैरकृत्य केल्याचे कळले. 8मी फारच नाराज झालो आणि तोबीयाहाच्या सर्व वस्तू मी कोठडीबाहेर फेकून दिल्या. 9नंतर ती कोठडी संपूर्णपणे शुद्ध करून घ्यावी असा मी आदेश दिला. मग मी परमेश्वराच्या भवनातील सामान, धान्यार्पणे व ऊद ही परत त्या कोठडीत आणली.
10मला असेही समजले की, लेव्यांना जो हिस्सा नेमून दिला होता, तो त्यांना देण्यात आला नव्हता आणि यामुळे ते सर्व लेवी व ज्यांची उपासना घेण्याची जबाबदारी होती, ते संगीतकार आपआपल्या शेतांवर परत निघून गेले होते. 11मी पुढार्‍यांना भेटून त्यांचा समाचार घेऊन विचारले, “परमेश्वराच्या भवनाकडे असे दुर्लक्ष का करण्यात आले आहे?” नंतर मी सर्व लेव्यांना परत एकत्र बोलाविले व त्यांच्या पूर्वीच्याच जागी त्यांची नेमणूक केली.
12आणि पुन्हा एकदा यहूदीयाचे सर्व लोक धान्य, नवा द्राक्षारस व तेलाचे दशांश मंदिराच्या कोठारांत आणू लागले. 13मी शेलेम्याह याजक, सादोक शास्त्री आणि पदायाह नामक लेवींना कोठारांत अधिकारी म्हणून नेमले व त्यांचा मदतनीस म्हणून हानान, जो जक्कूराचा पुत्र व मत्तन्याहचा नातू होता, याची नेमणूक केली. कारण हे सर्वजण विश्वासयोग्य मानले जात होते. आपल्या लेवी बांधवांना अर्पणाचे वाटप प्रामाणिकपणे करण्याची त्यांना जबाबदारी देण्यात आली.
14हे माझ्या परमेश्वरा, या चांगल्या कृत्यांबद्दल माझी आठवण ठेवा आणि परमेश्वराच्या भवनासाठी मी जे सर्व अत्यंत विश्वासूपणाने केले आहे ते पुसून टाकू नका.
15त्या दिवसात मी यहूदीयातील काही पुरुषांना शब्बाथ दिवशी द्राक्षकुंडांत द्राक्षे तुडविताना व धान्यांच्या पेंढ्या आणून गाढवांवर लादतांना, त्याचप्रमाणे द्राक्षारस, द्राक्षे, अंजीर व इतर पदार्थांचे ओझे शब्बाथ दिवशी यरुशलेमला विक्रीसाठी घेऊन जाताना पाहिले. तेव्हा मी त्यांना त्या दिवशी हे विक्री करण्यास विरोध केला. 16सोरचेही काही लोक मासे व नाना प्रकारचे पदार्थ यरुशलेमला आणून शब्बाथ दिवशी यहूदीयांना लोकांना विकत असत. 17मी यहूदीयाच्या प्रतिष्ठितांना फटकारून विचारले, “तुम्ही हे काय दुराचरण करीत आहात—शब्बाथ भ्रष्ट करीत आहात? 18तुमच्या पूर्वजांनी हेच केले व त्यामुळेच आपण व आपल्या शहरावर हे संकट परमेश्वराने आणले आहे? आणि आता तर तुम्ही शब्बाथ दिवस अशा रीतीने अपवित्र करून इस्राएली लोकांवर अधिक क्रोध आणत आहात.”
19यरुशलेमच्या वेशींवर संध्याकाळचा अंधार पडेपर्यंत सर्व दारे बंद केली जावीत व ती शब्बाथ संपेपर्यंत उघडली जाऊ नयेत असा मी आदेश दिला. मग मी माझी काही माणसे वेशीवर पहारा ठेवण्यासाठी नेमली. यासाठी की कुठल्याही प्रकारचा माल शब्बाथ दिवशी शहरात आणला जाऊ नये. 20सर्वप्रकारच्या सामानाचे व्यापारी व विक्रेते यांनी यरुशलेमबाहेर एक दोनदा रात्र घालविली. 21पण मी त्यांना ताकीद दिली आणि म्हणालो, “तुम्ही येथे तटाजवळ रात्र का घालविली? परत असे काही केले, तर मी तुम्हाला अटक करेन.” मग त्या दिवसानंतर परत ते शब्बाथ दिवशी आले नाही. 22नंतर मी लेव्यांना आज्ञा दिली की त्यांनी स्वतःला शुद्ध करून घ्यावे आणि शब्बाथ दिवसाचे पावित्र्य राखण्यासाठी वेशींवर पहारा ठेवावा.
हे माझ्या परमेश्वरा, या चांगल्या कृत्यांबद्दल माझी आठवण ठेवा आणि आपल्या विपुल प्रीतीनुसार मजवर दया करा.
23याच सुमारास माझ्या निदर्शनास आले की काही यहूदी पुरुषांनी अश्दोदी, अम्मोनी व मोआबी स्त्रियांशी विवाह केला होता. 24त्यांची अर्धी मुलेबाळे अश्दोदी अथवा इतर लोकांची भाषा बोलत होती, पण त्यांना यहूदीयाची भाषा बोलता येत नसे. 25तेव्हा मी त्यांना धमकाविले, त्यांना शाप दिला. काही पुरुषांना मार दिला व त्यांचे केस उपटून परमेश्वराची शपथ घालून त्यांच्याकडून वचन घेतले व म्हटले, “इतःपर तुम्ही आपल्या कन्यांचा त्यांच्या पुत्रांशी वा त्यांच्या कन्यांचा आपल्या पुत्रांशी विवाह करून देणार नाही. 26शलोमोन राजा अशाच प्रकारच्या गोष्टींनी पापमग्न झाला नव्हता काय? त्याच्याशी तुलना करता येईल असा दुसरा राजा अनेक राष्ट्रांमध्ये नव्हता आणि परमेश्वराने त्याच्यावर प्रीती केली व त्याला संपूर्ण इस्राएलचा राजा केले. असे असूनही त्याला यहूदीतर स्त्रियांनी पापाकडे वळविले. 27आता तुम्हीही तोच सर्व भयंकर दुष्टपणा करता व यहूदीतर स्त्रियांशी विवाह करून परमेश्वराशी विश्वासघात करीत आहात हे आम्ही ऐकावे काय?”
28मुख्य याजक एल्याशीबचा पुत्र यहोयादाच्या पुत्रांपैकी एकजण सनबल्लट होरोनी याचा जावई होता, म्हणून मी त्याला माझ्यापासून दूर हाकलून दिले.
29हे माझ्या परमेश्वरा, त्यांनी याजकपद व याजकांचे आणि लेव्यांचे करार भ्रष्ट केले आहेत, त्यांची तुम्ही आठवण ठेवा.
30तेव्हा मी त्या याजक व लेव्यांना सर्व यहूदीतर गोष्टींपासून शुद्ध करून घेतले. याजकांची व लेव्यांची कामे आणि प्रत्येकाला त्यांच्या जबाबदाऱ्या दिल्या. 31वेदीसाठी वेळच्या वेळी लाकडे आणि अर्पणांची आणि हंगामातील प्रथम उपजाची अर्पणे पुरविली.
हे माझ्या परमेश्वरा, मजवर प्रसन्न होऊन माझी आठवण ठेवा.

सध्या निवडलेले:

नहेम्या 13: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन