YouVersion लोगो
सर्च आयकॉन

एस्तेर 1

1
वश्ती राणीची पदच्युति
1भारतापासून कूशपर्यंत#1:1 नाईल नदीचा वरील भाग पसरलेल्या व एकशे सत्तावीस प्रांत असलेल्या या विस्तृत साम्राज्याचा बादशहा राजा अहश्वेरोश#1:1 किंवा झेरेस च्या कारकिर्दीत हे घडले: 2त्याकाळी राजा अहश्वेरोश शूशनच्या सिंहासनावर विराजमान होता. 3त्याच्या कारकिर्दीच्या तिसऱ्या वर्षी त्याने आपल्या सर्व प्रतिष्ठित लोकांना व अधिकार्‍यांना तिथे भरविलेल्या महोत्सवाचे राजवाड्यात आमंत्रण दिले. या प्रसंगासाठी पर्शिया व मेदियातील लष्करी अधिकारी, सरदार आणि त्या प्रांतातील प्रतिष्ठित लोक उपस्थित होते.
4सतत 180 दिवस त्याने याच्या साम्राज्याच्या दौलतीचे, महिमा व वैभवाचे प्रदर्शन केले. 5हे दिवस संपल्यानंतर, राजाने शूशन राजवाड्यातील लहानापासून थोरापर्यंत सर्वांना राजवाड्याच्या अंगणातील बागेत मेजवानी दिली, जी सात दिवस चालली. 6सजावटीचे पडदे पांढर्‍या आणि निळ्या रंगांचे होते आणि ते पांढर्‍या रंगाच्या कापडी फितींनी व जांभळ्या कापडांनी रुपेरी कड्यांना बसविलेल्या संगमरवरी खांबांना बांधलेले होते. संगमरवरी पाषाणांच्या फरशीवर सोन्याचे व रुप्याची लाल-जांभळी रत्ने, संगमरवरी, मौल्यवान मोती व इतर रत्नजडित आसने ठेवलेली होती. 7निरनिराळे नक्षीकाम केलेल्या सुवर्णपात्रांतून पेय दिले जात होते आणि शाही मद्य राजाच्या औदार्यास साजेल असे विपुलतेने दिले जात होते. 8राजाच्या हुकुमानुसार प्रत्येक पाहुण्याच्या मद्य पिण्यावर कोणतेही बंधन नव्हते, राजाने मद्य वाढणाऱ्या अधिकार्‍यांना सूचना दिल्याप्रमाणे प्रत्येकाला त्याच्या इच्छेस येईल ते मद्य पिण्याची पूर्ण मुभा होती.
9वश्ती राणीनेही अहश्वेरोश राजाच्या शाही महालातील स्त्रियांना मेजवानी दिली.
10सातव्या दिवशी, अहश्वेरोश राजा मद्य पिऊन पूर्णपणे उल्लसित झाला असताना त्याने त्याच्या तैनातीस असलेल्या खोजांना—महूमान, बिजथा, हरबोना, बिग्था, अबग्था, जेथर व कर्खस यांना— 11राणी वश्तीला मस्तकावर राजमुकुट घालून आपणाकडे आणण्यास सांगितले. हेतू हा की जमलेले सर्व लोक व प्रतिष्ठितांसमोर तिच्या सौंदर्याचे प्रदर्शन करावे, कारण ती एक अतिशय सुंदर स्त्री होती. 12परंतु राजाची आज्ञा जेव्हा खोजांनी वश्ती राणीला कळविली, तेव्हा तिने येण्यास नकार दिला. त्यामुळे राजा अहश्वेरोश संतापला व त्याचा क्रोधाग्नी भडकला.
13परंतु चालीरीतींना अनुसरून राजाने कायदा व न्यायात पारंगत व्यक्तीचा सल्ला घेतला. ते ज्ञानी गृहस्थ होते व त्यांना त्या काळाच्या परिस्थितीचे योग्य आकलन होते. 14शिवाय जे राजाचे जिवलग मित्र होते—कर्शना, शेथार, अदमाथा, तार्शीश, मेरेस, मर्सेना व ममुकान—ते पर्शिया व मेदिया या साम्राज्यातील सात प्रतिष्ठित लोक व सर्वात उच्चाधिकारी होते, ज्यांना राजाच्या सानिध्यात प्रवेश करण्याची खास मुभा होती.
15राजाने त्यांना विचारले, “कायद्यानुसार, वश्ती राणीच्या बाबतीत काय करावे? खोजाद्वारे पाठविलेली अहश्वेरोश राजाची आज्ञा तिने पाळली नाही.”
16राजा व प्रतिष्ठितांच्या समक्षतेत ममुकानाने उत्तर दिले, “वश्ती राणीने चूक केली आहे, केवळ राजाच्याच विरुद्ध नव्हे तर अहश्वेरोश राजाच्या साम्राज्यातील सर्व प्रतिष्ठित व नागरिकांच्या विरुद्ध केली आहे. 17कारण राणी वश्तीची वागणूक सर्व ठिकाणच्या स्त्रियांना समजल्यावर त्याही आपआपल्या पतीची अवज्ञा करून म्हणतील, ‘अहश्वेरोश राजाने वश्ती राणीस त्याच्या समक्षतेत आणण्याची आज्ञा दिली होती, पण ती आली नाही.’ 18आजच्या दिवशी पर्शिया व मेदिया या साम्राज्यातील प्रतिष्ठितांच्या स्त्रिया राणीच्या आचरणाबद्धल ऐकून राजाच्या सर्व प्रतिष्ठितांना असाच प्रतिसाद देतील. संपूर्ण साम्राज्यात अपमान व मतभेदाचा अंत राहणार नाही.
19“यास्तव, जर महाराजांना मान्य असेल, तर त्यांनी राजाज्ञा द्यावी व तो मेदिया व पर्शिया या प्रांतातील एक न बदलणारा कायदा म्हणून काढावा, त्यात हे नोंदलेले असावे की वश्तीने राजा अहश्वेरोश यांच्या समक्षतेत पुन्हा कधीही येऊ नये. आणि तिच्या जागी हे शाही स्थान ग्रहण करण्यास तिच्यापेक्षा चांगल्या राणीची राजाने निवड करावी. 20तुमच्या या विशाल साम्राज्यातून ही राजाज्ञा प्रसिद्ध झाली तर सर्व ठिकाणच्या पतीचा, मग तो लहान असो वा थोर त्यांच्या पत्नीकडून आदर केला जाईल!”
21राजा आणि त्याचे सर्व प्रतिष्ठित या सल्ल्याने प्रसन्न झाले, म्हणून राजाने ममुकानच्या सल्ल्याप्रमाणे केले. 22त्याने आपल्या राज्यातील सर्व प्रांतांना सर्व स्थानिक भाषेत, प्रत्येक व्यक्तीस त्याच्या भाषेत कळेल असे पत्र पाठविले. ज्याद्वारे जाहीर करण्यात आले की त्यांच्यामधून प्रत्येक पुरुषाने आपल्या घरात सत्ता चालवावी आणि आपल्या अधिकाराची अंमलबजावणी आपल्या मातृभाषेत करावी.

सध्या निवडलेले:

एस्तेर 1: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन