YouVersion लोगो
सर्च आयकॉन

एस्तेर 2

2
एस्तेरला राणी करण्यात येते
1अहश्वेरोश राजाचा संताप शांत झाल्यानंतर त्याला वश्तीचे स्मरण झाले आणि तिने काय केले व त्याने तिच्याविरुद्ध कोणता कायदा बनविला हे कळून आले. 2तेव्हा त्याच्या तैनातीतील सेवकांनी त्याला सूचना केली, “एक सुंदर व तरुण कुमारिका राजासाठी शोधण्यात यावी. 3राजाने याकरिता कारभारी नेमले जेणेकरून प्रत्येक प्रांतातील सुंदर व तरुण कुमारिकांना शूशनच्या राजवाड्यातील अंतःपुरात आणण्यात यावे. त्यांना अंतःपुराचा प्रमुख खोजा हेगाइकडे सोपविण्यात यावे, जो त्यांच्यावर सौंदर्यप्रसाधनांचे उपचार करेल. 4मग जी तरुणी तुम्हाला अधिक प्रसन्न करेल ती वश्तीच्या जागी राणी केली जाईल.” या सूचनेने राजा अतिशय संतुष्ट झाला आणि त्याने ती योजना अंमलात आणली.
5बिन्यामीन वंशातील कीशाचा पुत्र शिमीचा पुत्र याईर, याचा पुत्र मर्दखय हा यहूदी मनुष्य शूशन राजवाड्यात कामास होता. 6बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरने यरुशलेमातील यहूदीयाचा राजा यकोन्याह#2:6 किंवा यहोयाखीन च्याबरोबर व इतर अनेकांना बाबेलला बंदिवासात नेले, तेव्हा मर्दखय यालाही पकडून नेले. 7मर्दखयाला एक चुलतबहीण होती, तिचे नाव हदस्साह होते, जिला त्याने वाढविले होते, कारण तिला आईवडील नव्हते. या तरुणीस एस्तेरही म्हणत असत, जी बांधेसूद व देखणी होती. एस्तेरचे आईवडील मरण पावल्यामुळे मर्दखयने तिला आपल्या कुटुंबात स्वतःच्या मुलीसारखे वाढविले होते.
8जेव्हा आता राजाची आज्ञा जाहीर करण्यात आली, तेव्हा अनेक तरुण कुमारिका शूशन राजवाड्यातील अंतःपुरात आणण्यात आल्या व हेगाइच्या देखरेखीत ठेवण्यात आल्या. एस्तेरलाही राजवाड्यात आणून अंतःपुराचा अधिकारी हेगाइच्या देखरेखीत ठेवण्यात आले. 9एस्तेरला पाहून अंतःपुराचा अधिकारी हेगाइची कृपादृष्टी तिच्यावर झाली; आणि लगेचच तिच्यासाठी त्याने सौंदर्यप्रसाधनांची व खास भोजनपदार्थांची व्यवस्था केली. राजवाड्यातील सात दासी तिच्या तैनातीला त्याने दिल्या व तिला त्यांच्यासह अंतःपुरातील सर्वात उत्तम दालनात हालविले.
10एस्तेरने आपले राष्ट्रीयत्व व कौटुंबिक माहिती कोणालाही सांगितली नाही, कारण मर्दखयाने तिला ते सांगू नये असे बजावले होते. 11एस्तेरची विचारपूस करण्यासाठी आणि तिच्या बाबतीत पुढे काय घडते हे जाणून घेण्यासाठी, मर्दखय दररोज अंतःपुराच्या अंगणाजवळ येजा करीत असे.
12अहश्वेरोश राजाच्या शयनमंदिरात नेण्यापुर्वी प्रत्येकीवर बारा महिने सौंदर्यप्रसाधनांचे उपचार करण्यात येत, सहा महिने गंधरसाच्या तेलाचा उपचार व सहा महिने खास सुवासिक द्रव्ये व प्रसाधनांचा उपचार केला जाई. 13मग जेव्हा प्रत्येक तरुणी राजाकडे जाई तेव्हा: वस्त्रांची व अलंकारांची अंतःपुरातून आपल्या इच्छेप्रमाणे निवड करून राजमहालात नेण्याची तिला मोकळीक होती. 14तिला संध्याकाळी नेण्यात येई आणि दुसर्‍या दिवशी सकाळी राजाच्या उपपत्नी राहत, त्या अंतःपुराच्या दुसर्‍या भागात ती जाई. तिथे ती राजाच्या खोजांपैकी शाशगज नावाच्या खोजाच्या देखरेखीखाली असे. राजाने तिचे नाव घेऊन तिला परत बोलाविले नाही, तर राजाकडे तिला पुन्हा पाठविले जात नसे.
15राजाकडे जाण्याची एस्तेरची (मर्दखयाने दत्तक घेतलेली, त्याचे काका अबीहाईलच्या कन्याची) पाळी आली, तेव्हा तिने अंतःपुराचा प्रमुख हेगाइचा सल्ला स्वीकारून त्याच्या सूचनेप्रमाणे वस्त्रे परिधान केली आणि ज्यांनीही तिला पाहिले, त्यांची कृपादृष्टी तिच्यावर झाली. 16तेव्हा एस्तेरला अहश्वेरोश राजाच्या महालात त्याच्या कारकिर्दीच्या सातव्या वर्षाच्या दहाव्या म्हणजे, तेबेथ#2:16 अंदाजे जानेवारी महिना महिन्यात नेण्यात आले.
17इतर सर्व स्त्रियांपेक्षा राजाने एस्तेरवर अधिक प्रीती केली, त्याने तिला इतर सर्व कुमारिकांपेक्षा जास्त पसंत केले, तो तिच्यावर इतका प्रसन्न झाला की त्याने तिच्या मस्तकांवर राणीचा राजमुकुट ठेवला आणि वश्तीच्या जागी एस्तेरला राणी केले. 18हा प्रसंग साजरा करण्यासाठी, राजाने आपल्या सर्व अधिकार्‍यांना व सेवकांना एस्तेरसाठी एक भव्य मेजवानी दिली. त्यावेळी त्याने सर्व प्रांतांत रजा जाहीर केली आणि शाही उदारतेने देणग्या दिल्या.
मर्दखय कट उघडकीस आणतो
19त्यानंतर जेव्हा सर्व कुमारिका पुन्हा एकत्र आणल्या गेल्या, मर्दखय राजमहालाच्या व्दारात बसला होता. 20एस्तेरने आपले राष्ट्रीयत्व व कौटुंबिक माहिती मर्दखयाच्या सूचनेनुसार कोणालाही सांगितली नव्हती. कारण मर्दखयाच्या घरी असताना ती ज्याप्रमाणे आज्ञा पाळीत असे, त्याचप्रमाणे ती अद्यापही त्याच्या आज्ञा पाळीत होती.
21एके दिवशी मर्दखय राजवाड्याच्या द्वारात बसलेला असताना, राजाचे दोन अधिकारी बिग्थान#2:21 किंवा बिग्थाना व तेरेश, जे राजवाड्याच्या द्वारी द्वारपाल होते, ते राजावर संतापले आणि अहश्वेरोश राजाचा वध करण्याचा त्यांनी कट केला. 22मर्दखयाने या कटाची माहिती शोधून काढली व ती बातमी त्याने एस्तेर राणीला कळवली. तिने ती राजास कळवली आणि मर्दखयाकडून कटाची माहिती मिळाल्याचे त्याला सांगितले. 23जेव्हा तपास करण्यात आला तेव्हा ते दोन अधिकारी दोषी असल्याचे आढळून आले, तेव्हा त्यांना सुळावर चढविण्यात आले. हे सर्व वृत्त राजाच्या समक्षतेत कारकिर्दीच्या इतिहासग्रंथात नोंदण्यात आले.

सध्या निवडलेले:

एस्तेर 2: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन