YouVersion लोगो
सर्च आयकॉन

इय्योब 24

24
1“सर्वसमर्थ आपल्या न्यायाचा समय नेमून का ठेवीत नाही?
जे त्यांना ओळखतात त्यांनी त्या दिवसांची व्यर्थ वाट का पाहावी?
2असे काही लोक आहेत की जे हद्दीच्या खुणा सरकवितात;
चोरी करून आणलेले कळप ते चारतात.
3अनाथांची गाढवे ते हाकलून लावतात
आणि विधवेचा बैल तारण म्हणून ठेवून घेतात.
4गरजवंतांना वाटेवरून बाजूला ढकलून देतात
देशातील सगळ्या गरिबांना लपून राहण्यास भाग पाडतात.
5रानातील रानगाढवां प्रमाणे,
गरीब मनुष्य अन्नासाठी कष्ट करीत भटकतात;
पडीक जमिनीतून त्यांच्या लेकरांस भोजन पुरवठा होतो.
6ते रानातून चारा गोळा करतात
आणि दुष्टांच्या द्राक्षमळ्यातून वेचून घेतात.
7पुरेशी वस्त्र नसल्याने त्यांना वस्त्रहीनच झोपावे लागते.
थंडीत पांघरण्यास देखील त्यांच्याकडे काही नसते.
8पर्वतीय वृष्टीने ते ओलेचिंब होतात
आणि आश्रय नसल्यामुळे ते खडकांचा आधार घेतात.
9पितृहीन बालकांस मातेच्या स्तनापासून ओढून काढले जाते;
ऋण फेडून घेण्यासाठी गरिबांची तान्ही बाळे जप्त करतात.
10पुरेशी वस्त्र नसल्याने, ते उघडेच असतात;
ते धान्याच्या पेंढ्या वाहतात तरी उपाशीच राहतात.
11आपल्याच आवारात ते जैतुनाचे तेल काढतात;
द्राक्षकुंडात द्राक्षे तुडवितात, परंतु तहानेने व्याकूळ झालेले असतात.
12मरणासन्न असलेल्‍यांचे कण्हणे शहरातून ऐकू येते,
आणि घायाळ झालेल्यांचा मदतीसाठी आक्रोश चालू आहे.
तरी देखील परमेश्वर कोणालाही दोष देत नाही.
13“काहीजण प्रकाशाविरुद्ध बंड करतात,
ज्यांना तो मार्ग अवगत नाही
ते त्या मार्गात टिकूनही राहत नाहीत.
14दिवस मावळला म्हणजे हत्यारा सज्ज होतो,
गरीब आणि गरजवंतांना तो ठार करतो,
आणि रात्रीच्या वेळी चोरासारखी चोरी करतो.
15व्यभिचार्‍याचा डोळा दिवस मावळण्याची वाट पाहत असतो;
तो म्हणतो, ‘मला कोणीही पाहत नाही.’
तो आपला चेहरा झाकून घेतो.
16चोर अंधारात घरे फोडतात,
परंतु दिवसा ते लपून राहतात;
त्यांना प्रकाशाशी काहीही देणे घेणे नको असते.
17मध्यरात्र त्या प्रत्येकासाठी सकाळ असते,
अंधारातील आतंकाशी त्यांचे सख्य असते.
18“तरीही पृथ्वीच्या पाठीवर ते फेसासारखे आहेत;
त्यांच्या वाट्याची भूमी इतकी शापित असते,
की त्यांच्या द्राक्षमळ्यात कोणीही जात नाही.
19जसे उष्णता आणि दुष्काळ वितळलेल्‍या हिमाला शोषून घेते,
त्याचप्रमाणे पाप्‍यांची कबर त्यांना ओढून घेते.
20त्यांनी जन्म घेतलेले उदर त्यांना विसरते,
किडे त्यांचा फडशा पाडतात;
दुष्टांची आठवण देखील पुन्हा केली जात नाही
आणि वृक्षाप्रमाणे ते मोडले जातात.
21पुत्रहीन व वांझ स्त्रीस ते भक्ष करतात,
आणि विधवांशी ते दयेने वागत नाहीत.
22परंतु परमेश्वर बलवानाला आपल्या सामर्थ्याने राखतात;
त्याला जीवनाची खात्री नसली तरी ते स्थिरावतात.
23आम्ही सुरक्षित आहोत असे त्यांना वाटू दिले,
तरी परमेश्वराची नजर त्यांच्या मार्गावर असते.
24त्यांची बढती केवळ क्षणभंगुर आहे आणि ते लवकरच नष्ट होतात;
इतरांप्रमाणे ते देखील गळून पडतात;
धान्याच्या कणसाप्रमाणे ते कापले जातील.
25“जर असे नाही तर, कोण मला खोटे ठरवेल
आणि माझे शब्द कोणाला शून्यात जमा करता येतील?”

सध्या निवडलेले:

इय्योब 24: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन