YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यशायाह 51

51
सीयोनसाठी अनंतकाळचे तारण
1“तुम्ही, ज्यांनी नीतिमत्तेचा ध्यास घेतला आहे
व जे याहवेहचा शोध घेता, ते सर्वजण, माझे ऐका:
ज्या खडकातून तुम्हाला कापून काढले,
आणि ज्या खाणीतून तुम्हाला खोदून काढले, त्याकडे बघा;
2होय, तुमचा पिता अब्राहामाकडे,
आणि साराहकडे, जिने तुम्हाला जन्म दिला, त्यांच्याकडे बघा.
मी अब्राहामाला बोलाविले, तेव्हा तो एकटा होता,
मी त्याला आशीर्वाद दिला, तेव्हा तो बहुगुणित झाला.
3तर याहवेह सीयोनचे निश्चितच सांत्वन करतील
आणि तिच्या सर्व ओसाड प्रदेशाकडे दयेने बघतील;
ते तिचे वाळवंट एदेन बागेसारखे सुंदर करतील,
तिची उजाड ठिकाणे याहवेहच्या बागेसारखी होतील.
तिथे आनंद व उल्लास व्यक्त करण्यात येईल.
उपकारस्मरण व गीतांचे स्वर तिथे ऐकू येतील.
4“माझ्या लोकांनो, माझे ऐका;
माझ्या देशा, माझ्याकडे लक्ष दे:
माझाकडूनच तुम्हाला उपदेश प्राप्त होईल.
माझा न्याय राष्ट्रांसाठी प्रकाश बनेल.
5माझी नीतिमत्ता वेगाने जवळ येत आहे,
माझे तारण येण्याच्या मार्गावर आहे.
माझी भुजा राष्ट्रांना न्याय प्रदान करेल.
द्वीप माझा शोध घेतील
आणि माझ्या भुजेची आशेने वाट पाहतील.
6तुमची दृष्टी वर आकाशाकडे करा,
आणि खाली पृथ्वीकडे पाहा;
आकाश धुरासारखे विरून नाहीसे होईल,
पृथ्वी वस्‍त्रांप्रमाणे जीर्ण होईल
आणि पृथ्वीवरील लोक चिलटांप्रमाणे मरतील.
परंतु माझे तारण सदासर्वकाळ टिकेल.
माझ्या नीतिमत्तेचा कधीही अंत होणार नाही.
7“हे, नीतिमत्ता जाणणार्‍या लोकांनो,
माझ्या नियमांवर अंतःकरणापासून भाव ठेवणार्‍यांनो माझे ऐका:
मर्त्य मानवाच्या उपहासाने भयभीत होऊ नका
किंवा त्यांनी केलेल्या निंदेला घाबरू नका.
8कारण वस्त्रांसारखे कसर त्यांचाही नाश करेल;
लोकरीसारखे कीड त्यांनाही खाऊन टाकेल.
परंतु माझी नीतिमत्ता सदासर्वकाळ टिकेल.
व माझे तारण पिढ्यान् पिढ्या टिकून राहील.”
9उठा, उठा, हे याहवेहच्या भुजा,
सामर्थ्याचे वस्त्र परिधान करा.
उठा, पूर्वी जसे जागे झाले होते,
पुरातन पिढीत जसे उठले होते.
नाईल नदीतील राहाब सर्पाचे तुकडे केले, ते तुम्हीच नाही का,
त्या समुद्रातील राक्षसाचा छेद केला, ते तुम्हीच नाही का?
10ते तुम्हीच नाही का, ज्यांनी समुद्र आटवून कोरडा केला,
त्या अति खोल पाण्याला आटविले,
ज्यांनी समुद्राच्या खोलीत मार्ग तयार केला
जेणेकरून तुमचे सोडविलेले लोक ते पार करतील?
11ज्यांना याहवेहने सोडविले, ते लोक परत येतील.
ते हर्षगीते गात सीयोनात प्रवेश करतील;
अनंतकाळचा उल्हास त्यांच्या मस्तकावर असेल.
हर्ष व उल्हासाने ते भरून जातील,
दुःख व शोक दूर पळून जातील.
12“मी, तो मीच आहे, जो तुमचे सांत्वन करेल.
तुम्ही कोण आहात जे मर्त्य मानवांना भिता,
मानवप्राणी, जे केवळ गवताप्रमाणे असतात,
13तुम्ही जे तुमच्या निर्माणकर्त्याला, याहवेहला विसरता,
ज्यांनी आकाश ताणून पसरले
आणि ज्यांनी पृथ्वीचा पाया घातला,
तुम्ही सतत दहशतीखाली का जगता
दिवसभर विरोधकांच्या क्रोधाच्या भीतीत का राहता?
कारण त्यांनी तुमचा नाश करण्याचा निर्धार केला आहे?
विरोधकांचा क्रोध कुठे आहे?
14भीतीने थिजलेल्या बंदिवानांची लवकरच सुटका होईल;
ते त्यांच्या अंधारकोठडीत मरणार नाहीत,
त्यांना भाकरीची उणीव भासणार नाही.
15कारण मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे,
जो लाटांनी गर्जना करावी म्हणून समुद्र ढवळतो—
सर्वसमर्थ याहवेह हे त्याचे नाव आहे.
16मी माझी वचने तुमच्या मुखात घातली आहेत
आणि तुम्हाला माझ्या हाताच्या सावलीत झाकून ठेवले आहे—
मीच आहे, ज्याने आकाशाला स्थिर असे ठेवले,
आणि सर्व पृथ्वीसाठी पाया घातला,
आणि जो सीयोनला म्हणतो, ‘तुम्ही माझे आहात.’ ”
याहवेहच्या क्रोधाचा प्याला
17ऊठ, ऊठ!
अगे यरुशलेमे, जागी हो,
तू, जिने क्रोधाचा प्याला याहवेहच्या हातून
भरपूर प्याला आहे,
दहशतीचा प्याला तू गाळासकट पिऊन टाकला आहेस,
तो प्याला, जो लोकांना मद्यधुंद करून अडखळवितो.
18तिने जन्माला घातलेल्या लेकरांपैकी
तिचे मार्गदर्शन करण्यासाठी कोणीही नव्हते;
तिने संगोपन केलेल्या लेकरांपैकी
तिचा हात धरून चालविण्यासाठी कोणीही नव्हते.
19ओसाडी आणि विध्वंस, दुष्काळ आणि तलवार
ही दुप्पट अरिष्टे तुझ्यावर आली आहेत—
कोण तुझे सांत्वन करू शकेल?
कोण तुझे दुःखपरिहार करू शकेल?
20कारण तुझी लेकरे ग्लानी येऊन,
प्रत्येक रस्त्याच्या कोपऱ्यात पडली आहेत,
हरिणाप्रमाणे ते जाळ्यात अडकलेले आहेत.
याहवेहच्या क्रोधाने
आणि तुमच्या परमेश्वराच्या धमकीने भरले आहेत.
21म्हणून गांजलेल्यांनो, हे ऐका!
तुम्ही धुंद झालेले आहात, मद्याने नव्हे.
22तुमचे सार्वभौम याहवेह,
तुमचे परमेश्वर, जे त्यांच्या लोकांना सुरक्षित ठेवतात, ते असे म्हणतात:
“पाहा, जो प्याला तुम्हाला धुंद करून अडखळवितो
तो मी तुमच्या हातातून काढून घेतला आहे;
त्या प्याल्यातून, माझ्या क्रोधाच्या प्याल्यातून
तुम्ही यापुढे कधीही पिणार नाही.
23तुमचा छळ करणाऱ्यांच्या हातात मी तो देईन,
जे तुम्हाला म्हणाले,
‘भूमीवर पडा, म्हणजे आम्ही तुमच्यावरून चालत जाऊ.’
आणि तुम्ही तुमची पाठ जमिनीसारखी केली,
जणू रस्ताच, ज्यावरून चालत जावे.”

सध्या निवडलेले:

यशायाह 51: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन