यशायाह 50
50
इस्राएलचे पाप व सेवकाचे आज्ञापालन
1याहवेह असे म्हणतात:
“मी तुमच्या आईला घटस्फोट दिला, जो दाखला देऊन मी तिला पाठविले,
तो कुठे आहे?
मी तुम्हाला माझ्या कोणत्या कर्जदारांना
विकून टाकले?
तुमच्या पापांमुळेच तुम्ही विकले गेले आहात;
आणि तुमच्या अपराधांमुळे तुमच्या आईला पाठविण्यात आले.
2मी जेव्हा आलो, तेव्हा तिथे कोणीही का नव्हते?
मी जेव्हा हाक मारली, तेव्हा कोणीही उत्तर का दिले नाही?
तुम्हाला सोडविण्यासाठी माझा हात फारच आखूड होता काय?
तुमचे तारण करण्यास माझ्याकडे सामर्थ्य नाही काय?
मी केवळ धमकाविले तरी समुद्र आटून जाईल!
नद्यांचे मी वाळवंटात रूपांतर करतो;
त्यातील मासे पाण्याच्या अभावी सडतात
आणि तहानेने मरतात.
3मी आकाशास अंधकार परिधान करवितो
आणि गोणपाट त्याचे आच्छादन करतो.”
4सार्वभौम याहवेहने माझ्या मुखात उपदेशात्मक जीभ दिली आहे,
त्यावर थकलेल्या लोकांना पडू न देणारी वचने आहेत,
ते मला रोज सकाळी जागे करतात,
शिक्षण प्राप्त करणाऱ्यासाठी उघडावे, तसे ते माझे कान उघडतात.
5सार्वभौम याहवेहनी माझे कान उघडले आहेत;
मी बंडखोर नव्हतो,
मी मागे फिरलो नाही.
6जे मला चाबकाचे फटकारे मारतात, त्यांना मी आपली पाठ देऊ केली,
जे माझी दाढी उपटतात, त्यांना मी आपले गाल देऊ केले;
उपहास करणारे व थुंकणाऱ्यांपासून
मी तोंड लपवित नाही.
7मी लज्जित होणार नाही,
कारण सार्वभौम याहवेह मला साहाय्य करतात.
म्हणूनच मी माझा चेहरा गारगोटीसारखा कठीण केला आहे
आणि मी लज्जित होणार नाही, हे मला माहीत आहे.
8मला न्याय देणारे माझ्या निकट आहेत.
मग माझ्याविरुद्ध कोण आरोप करेल?
चला आपण एकमेकांचा सामना करू या!
माझ्यावर आरोप करणारा कोण आहे?
त्याने माझा सामना करावा!
9सार्वभौम याहवेह मला साहाय्य करतात.
मला कोण दोषी ठरविणार?
माझ्यावर आरोप करणारे सर्व जुन्या कपड्याप्रमाणे विरून जातील;
कसर त्यांना खाऊन टाकेल.
10तुमच्यामध्ये कोण आहे जो याहवेहचे भय बाळगतो
आणि त्यांच्या सेवकाच्या आज्ञा पाळतो?
जो अंधारात चालतो,
ज्याच्याकडे प्रकाश नाही,
त्याने याहवेहच्या नावावर विश्वास ठेवावा
आणि त्याने आपल्या परमेश्वरावर विसंबून राहावे.
11परंतु आता, तुम्ही जे अग्नी प्रज्वलित करता
आणि स्वतःला जळत्या मशालीचा पुरवठा करता,
जा, तुम्ही स्वतः प्रज्वलित केलेल्या,
आणि तुम्ही ज्वलंत केलेल्या मशालीच्या प्रकाशात चला,
माझ्यापासून मात्र तुम्हाला हे प्राप्त होईल:
तुम्ही यातनामध्ये पडून राहाल.
सध्या निवडलेले:
यशायाह 50: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.