यशायाह 52
52
1ऊठ, ऊठ, हे सीयोना,
सामर्थ्याचे वस्त्र परिधान कर!
यरुशलेम, हे पवित्र नगरी,
आपली वैभवशाली वस्त्रे परिधान कर.
बेसुंती आणि भ्रष्ट
यापुढे तुझ्या वेशीतून प्रवेश करणार नाहीत.
2हे यरुशलेमे, तुझ्यावरील धूळ झटकून टाक,
ऊठ व सिंहासनारुढ हो.
बंदिवान सीयोनकन्ये,
दास्यतेची बंधने आपल्या गळ्यांतून काढून मुक्त हो.
3कारण याहवेह म्हणतात:
“तुम्हाला विनामूल्य बंदिवासात विकले,
आणि आता पैशावाचून तुम्हाला सोडविण्यात येईल.”
4कारण सार्वभौम याहवेह असे म्हणतात:
“प्रथम माझे लोक इजिप्त देशात राहवयास गेले;
नंतर अश्शूरच्या लोकांनी त्यांचा छळ केला.”
5याहवेह घोषणा करतात, “आणि आता माझ्याकडे काय राहिले आहे?
माझ्या लोकांना विनामूल्य नेण्यात आले आहे,
आणि जे त्यांच्यावर सत्ता गाजवितात ते त्यांचा उपहास#52:5 किंवा आतंक करतात,”
याहवेह घोषणा करतात,
“संपूर्ण दिवसभर
माझ्या नावाची सतत निंदा करण्यात येते.
6माझे लोक माझे नाव जाणतील;
म्हणून त्या दिवशी त्यांना समजेल
कि ते भविष्यकथन करणारा तो मीच आहे.
होय, तो मीच आहे.”
7पर्वतावरून शुभवार्ता आणणार्याचे पाय किती मनोरम आहेत,
जे आनंददायी वार्ता आणतात,
जे शांतीची घोषणा करतात,
जे शुभ संदेश आणतात,
जे तारणाची घोषणा करतात,
जे सीयोनास म्हणतात,
“तुमचे परमेश्वर राज्य करतात!”
8ऐका! तुमचे पहारेकरी त्यांचा आवाज उंचावतात;
एकत्र मिळून ते आनंदाचा जयघोष करतात.
जेव्हा याहवेह सीयोनास परत येतील,
ते प्रत्यक्ष त्यांच्या डोळ्याने पाहतील.
9यरुशलेमच्या उद्ध्वस्त स्थळांनो,
सर्वांनी एकत्र उसळून हर्षगीतांनी जयघोष करा,
कारण याहवेहने आपल्या लोकांचे सांत्वन केले आहे,
त्यांनी यरुशलेमास सोडविले आहे.
10याहवेह आपली पवित्र भुजा
सर्व राष्ट्रांसमक्ष उघडणार आहेत,
आणि पृथ्वीच्या सर्व दिगंतापर्यंत
आमच्या परमेश्वराचे तारण दिसेल.
11निघा, निघा, इथून बाहेर पडा!
अपवित्र वस्तूला स्पर्श करू नका!
तुम्ही जे याहवेहच्या मंदिरातील पात्रांची नेआण करता,
इथून बाहेर पडा व स्वतःला शुद्ध करा.
12परंतु तुम्हाला इथून पलायन करावे लागणार नाही
वा घाईने निघावे लागणार नाही;
कारण याहवेह तुमच्यापुढे जातील,
आणि इस्राएलचे परमेश्वर तुमचे पाठीराखे असतील.
सेवकाची पीडा व गौरव
13पाहा, माझा सेवक सुज्ञतेने वागेल#52:13 किंवा समृद्धी पावेल;
तो उच्च केला जाईल व उत्कर्ष पावेल आणि त्याचे मोठे गौरव होईल.
14जसे त्याला पाहताच अनेकजण विस्मित झाले होते—
त्याचे स्वरूप मनुष्यप्राण्याच्या पलीकडे विद्रुप करण्यात आले होते
आणि त्याचा आकार मानवसदृश्य राहिला नव्हता—
15यास्तव तो अनेक राष्ट्रांवर शिंपडेल,#52:15 किंवा अनेक राष्ट्रांना आश्चर्य वाटेल
आणि त्याच्यामुळे राजे आपले मुख बंद करतील.
कारण त्यांना पूर्वी कधी कोणी जे सांगितले नव्हते, ते आता बघतील,
आणि ज्यांनी ऐकले नाही, त्यांना समजेल.
सध्या निवडलेले:
यशायाह 52: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.