दानीएल 11
11
1मेदिया राजा दारयावेशच्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षी, त्याला साहाय्य करण्यास आणि संरक्षण देण्यास मी उभा राहिलो.)
दक्षिणेचा राजा आणि उत्तरेचा राजा
2“आता मी तुला सत्य सांगतो: आता पुढे घडणार्या गोष्टींचा दृष्टान्त मी तुला दाखवितो. पर्शियात आणखी तीन राजे उदयास येतील आणि मग चौथा राजा जो सर्वांहून अतिशय धनवान असेल. तो धनसंपत्तीने प्रबळ झाला म्हणजे तो सर्वांना ग्रीसच्या राज्याविरुद्ध उठवेल. 3तेव्हा आणखी एक पराक्रमी राजा उदयास येईल, जो महान पराक्रमाने राज्य करेल आणि त्याला वाटेल त्याप्रमाणे तो करेल. 4त्याचा उदय झाल्यानंतर त्याचे राज्य भंग पावेल आणि चार दिशांत त्याची विभागणी होईल. हे त्याच्या वंशजांकडे जाणार नाही किंवा ज्या सामर्थ्याने त्याने राज्य केले ते त्यांच्याकडे नसेल, कारण त्याचे साम्राज्य उपटले जाईल आणि ते दुसर्यांना दिले जाईल.
5“दक्षिणेचा राजा सामर्थ्यशाली होईल, परंतु त्याच्या सेनापतींपैकी एक त्याच्यापेक्षाही बलाढ्य होईल आणि तो स्वतःच्या राज्यावर बलशाली होऊन राज्य करेल. 6काही वर्षानंतर ते एकमेकांशी सलोखा करतील. दक्षिणेच्या राजाची कन्या उत्तरेच्या राजाकडे तह करण्यासाठी जाईल, परंतु तिच्याकडे सामर्थ्य राहणार नाही आणि तो व त्याची शक्ती#11:6 किंवा संतती टिकणार नाही. त्या दिवसांत, शाही रक्षकांसह आणि तिचे वडील आणि मदतनीस तिच्यासोबत विश्वासघात करतील.
7“तिच्या कुळातील एकाचा उदय होईल जो तिची जागा घेईल. तो उत्तरेच्या राजाच्या सैन्यावर हल्ला करेल आणि त्याच्या किल्ल्यात प्रवेश करेल; तो त्यांच्याशी युद्ध करेल आणि विजयी होईल. 8तो त्यांचे दैवत, त्यांच्या धातूच्या मूर्ती आणि सोन्या-चांदीच्या मौल्यवान पात्रांना ताब्यात घेऊन इजिप्तला नेईल. काही वर्षे तो उत्तरेकडील राजाला एकटा सोडेल. 9मग उत्तरेकडील राजा दक्षिणेकडील राजाच्या राज्यावर कूच करेल, परंतु तो आपल्या देशात परत जाईल. 10त्याचे पुत्र युद्धाची तयारी करतील आणि प्रचंड सैन्य गोळा करतील. जे एका अप्रतिकार्य पुरासारखे पुढे जातील आणि युद्ध त्याच्या किल्ल्यापर्यंत घेऊन जातील.
11“नंतर दक्षिणेचा राजा क्रोधिष्ट होऊन पुढे जाईल आणि उत्तरेच्या राजाशी युद्ध करेल, जो एक मोठे सैन्य उभारेल, परंतु त्याचा पराभव होईल. 12जेव्हा सैन्याचा नाश होईल, तेव्हा दक्षिणेचा राजा गर्वाने धुंद होऊन जाईल आणि अनेक हजारो लोकांचा वध करेल, तरीही तो विजयी होणार नाही. 13कारण उत्तरेचा राजा दुसरे सैन्य उभे करेल, जे त्याच्या आधीच्या सैन्यापेक्षा मोठे असेल; आणि बर्याच वर्षानंतर तो पूर्ण तयारीने मोठ्या सैन्यासह पुढे जाईल.
14“त्या काळात अनेक दक्षिणेच्या राजाविरुद्ध उभे राहतील. तुझ्या स्वतःच्या लोकांपैकीच काही बंडखोर विचारांचे हिंसक लोकसुद्धा दृष्टान्त पूर्णतेसाठी विद्रोह करतील, परंतु ते अपयशी होतील. 15नंतर उत्तरेचा राजा येईल आणि आणि वेढा बांधून तटबंदी असलेले शहर ताब्यात घेईल. दक्षिणेकडील सैन्यांना प्रतिकार करण्यास शक्ती राहणार नाही; त्यांच्या सर्वोत्तम सैन्यालाही सामना करण्याची ताकद नसेल. 16आक्रमण करणारा त्याला वाटेल तसे तो करेल; त्याच्या विरोधात कोणीही उभे राहू शकणार नाही. तो सुंदर देशात स्वतःची स्थापना करेल आणि त्याचा नाश करण्याची शक्ती त्याच्याकडे असेल. 17तो आपल्या राज्याच्या सर्व सामर्थ्याने येण्याचा निर्धार करेल आणि तो दक्षिणेच्या राजाबरोबर करार करेल. त्याचे राज्य जिंकण्यासाठी तो आपली एक मुलगी विवाहात देईल, परंतु त्याची ही योजना यशस्वी होणार नाही वा त्याला काही मदत मिळणार नाही. 18यानंतर तो आपले लक्ष किनारपट्टीवरील शहरांकडे वळवील व त्यातील अनेक जिंकून घेईल. परंतु एक सेनापती त्याला प्रतिकार करेल व त्याला लाजिरवाणी माघार घ्यावी लागेल. 19यानंतर तो आपल्या स्वतःच्या देशातील दुर्गाकडे मोर्चा फिरवेल, पण तो ठेच लागून पडेल व त्याचे अस्तित्व सापडणार नाही.
20“त्याच्या जागी एकजण येईल, जो त्या वैभवी देशात कर वसूल करणार्यास पाठवेल. काही वर्षात, त्याचा नाश केला जाईल, तरीही त्याचा नाश क्रोधाने किंवा युद्धात होणार नाही.
21“त्याच्या जागी असा नीच मनुष्य येईल ज्याला राजघराण्याचा मान मिळालेला नाही. जेव्हा जनतेला सुरक्षित वाटत असेल, तेव्हाच तो राज्यावर आक्रमण करेल आणि कट रचून राज्य आपल्या ताब्यात घेईल. 22मग त्याच्यापुढे मोठ्या सैन्याचा नाश होईल; तो आणि कराराचा राजपुत्र दोघेही नष्ट होतील. 23त्याच्यासोबत करार केल्यानंतर तो कपटाने वागेल, आणि काही मोजक्या लोकांसह तो समर्थ होईल. 24जेव्हा श्रीमंतांना राज्य सुरक्षित वाटत असेल, तेव्हाच तो त्यांच्यावर आक्रमण करेल आणि असे यश प्राप्त करेल की, त्याच्या पित्याने किंवा त्याच्या पित्याच्या पित्याने प्राप्त केले नसेल. तो धन, लूट आणि संपत्ती आपल्या अनुयायांमध्ये वाटून देईल. तो किल्ले पाडण्याचा कट रचेल—पण फक्त काही काळासाठी.
25“प्रचंड सैन्य घेऊन तो दक्षिणेच्या राजाविरुद्ध आपले सामर्थ्य आणि धाडस उत्तेजित करेल. दक्षिणेचा राजाही प्रचंड आणि बलाढ्य सैन्यासह लढेल, परंतु त्याच्याविरुद्ध रचलेल्या कटामुळे तो तोंड देऊ शकणार नाही. 26जे राजाच्या मेजावर भोजन करीत असे ते त्याचा नाश करण्याचा प्रयत्न करतील; त्याच्या सैन्याचा नाश होईल आणि बरेच लोक युद्धात मारले जातील. 27दोन्ही राजे मनात वाईट गोष्टी घेऊन एकाच मेजावर बसतील आणि एकमेकांशी खोटे बोलतील, त्यातून काहीच निष्पन्न होणार नाही, कारण अंत ठरलेल्या वेळी होईल. 28उत्तरेचा राजा पुष्कळ धनसंपत्ती घेऊन आपल्या देशात परत येईल, परंतु त्याचे मन पवित्र कराराविरुद्ध राहील. त्याच्या मनाला वाटेल तसा तो वागेल आणि मग आपल्या देशात परत येईल.
29“निर्धारित वेळी तो पुन्हा दक्षिणेवर आक्रमण करेल, परंतु पहिल्या दोन प्रसंगी झाले त्याहून अगदी वेगळे परिणाम आता होतील. 30पश्चिमेकडील कित्तीम बेटांतील जहाजे त्याला विरोध करतील आणि त्याचे धैर्य तुटेल. मग तो पवित्र करारावर आपला रोष काढण्यासाठी परत येईल. तो परत येईल आणि पवित्र कराराचा त्याग करणार्यांवर कृपा दाखवेल.
31“त्याचे सशस्त्र सैन्य मंदिराच्या दुर्गास अपवित्र करण्यासाठी पुढे येतील आणि दैनंदिन होमार्पण बंद केले जाईल. मग ते ओसाड करणारा अमंगळ पदार्थ स्थापतील. 32जे कराराविरुद्ध दुष्टता करतात, त्यांना तो खुशामत करून भ्रष्ट करेल, पण ज्यांना त्यांचा परमेश्वर माहीत आहे ते त्याला खात्रीने सामोरे जातील.
33“जे ज्ञानी आहेत ते पुष्कळांना शिक्षण देतील, जरी काही काळासाठी, ते तलवारीने मारले जातील किंवा जाळले जातील किंवा पकडले जातील किंवा लुटले जातील. 34जेव्हा ते पडतील तेव्हा त्यांना खूप कमी मदत मिळेल आणि प्रामाणिक नसलेले बरेच लोक त्यांच्यात सामील होतील. 35सुज्ञानी लोकांपैकी काही अडखळतील, यासाठी की शेवटच्या वेळेपर्यंत ते स्वच्छ, शुद्ध आणि निर्दोष राहतील, कारण अंत नेमलेल्या वेळी होईल.
स्वतःला श्रेष्ठ करणारा राजा
36“राजा स्वतःच्या इच्छेप्रमाणे वागेल; सर्व दैवतांपेक्षा आपण श्रेष्ठ आहोत असे तो म्हणेल. तो देवाधिदेवाचीही निंदा करेल आणि त्याची महासंकटकाळाच्या शेवटपर्यंत भरभराट होईल. कारण जे ठरवून दिले आहे ते नक्कीच घडेल. 37तो आपल्या पूर्वजांच्या दैवतांचा आदर करणार नाही, किंवा स्त्रियांच्या इच्छांची पर्वा करणार नाही, किंवा कोणत्याही दैवताचा आदर करणार नाही, परंतु तो स्वतःला त्या सर्वांपेक्षा श्रेष्ठ ठरवेल. 38पण त्यांच्याऐवजी तो दुर्गदैवतांचा सन्मान करेल; जे दैवत त्याच्या पूर्वजांना माहीत नव्हते त्यांचा सन्मान तो सोने, चांदी, मौल्यवान रत्ने आणि किमती देणग्या यांनी करेल. 39तो या परकीय दैवतांच्या साहाय्याने मजबूत किल्ल्यांवर आक्रमण करेल आणि जे त्याचा राजा म्हणून स्वीकार करतील त्यांचा आदर करेल. तो त्यांना अनेक लोकांवर अधिकारी म्हणून नियुक्त करेल आणि बक्षीस म्हणून त्यांना जमीन वाटून देईल.#11:39 किंवा प्रतिफळ म्हणून देईल
40“अखेरच्या काळात दक्षिणेचा राजा त्याच्यावर हल्ला करेल आणि उत्तरेचा राजा वादळी झंझावातासारखा रथ, घोडेस्वार आणि पुष्कळ जहाजे घेऊन त्याच्यावर हल्ला करेल. तो अनेक देशांवर स्वार्या करेल आणि एखाद्या महापुराप्रमाणे त्यांच्यामधून निघून जाईल. 41तो सुंदर देशावर आक्रमण करेल. पुष्कळ देशांची उलथापालथ होईल, पण एदोम, मोआब आणि अम्मोनचे प्रमुख त्याच्या तावडीतून सुटतील. 42तो अनेक देशांवर आपल्या शक्तीचा विस्तार करेल; इजिप्त देश देखील सुटणार नाही. 43तो इजिप्त देशामधील सोन्याच्या व चांदीच्या खजिन्यांवर व सर्व मौल्यवान वस्तूंवर ताबा मिळवेल, लिबिया व कूशी हे देश त्याचे दास होतील. 44परंतु पूर्वेकडून व उत्तरेकडून येणार्या बातम्यांनी तो अस्वस्थ होईल आणि मोठ्या क्रोधाने पुष्कळांचा नाश आणि अनेकांना नाहीसे करण्यास बाहेर पडेल. 45समुद्राच्या मध्यभागी असलेल्या सुंदर पवित्र पर्वताजवळ तो आपला शाही तंबू उभारेल. तरीही त्याचा अंत होईल आणि त्याच्या साहाय्यासाठी कोणीही नसेल.
सध्या निवडलेले:
दानीएल 11: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.