दानीएल 10
10
दानीएलला झालेला एका मनुष्याचा दृष्टान्त
1पर्शियाचा राजा कोरेश#10:1 किंवा सायप्रस च्या कारकिर्दीच्या तिसर्या वर्षी दानीएलला (ज्याला बेलटशास्सर असे म्हटले जाते) एक प्रकटीकरण झाले. तो संदेश खरा असून त्याचा संबंध मोठ्या युद्धाशी होता. संदेशाचा समज दृष्टान्ताद्वारे त्याच्याकडे आला.
2त्यावेळेस मी, दानीएल, तीन आठवडे शोक करीत होतो. 3मी माझे आवडते भोजन केले नाही; मी मांस खाल्ले नाही वा द्राक्षारस आपल्या ओठाला लावले नाही; तीन आठवडे पूर्ण होईपर्यंत मी तेलाचा अभ्यंगसुद्धा केले नाही.
4पहिल्या महिन्याच्या चोविसाव्या दिवशी मी महानदी फरातच्या तीरावर उभा होतो, 5तेव्हा मी वर पाहिले आणि एक तागाची वस्त्रे परिधान केलेला आणि कमरेला उफाज देशाच्या शुद्ध सोन्याचा पट्टा घातलेला असा पुरुष उभा होता. 6त्याची त्वचा तेजस्वी होती, त्याचा चेहरा विजा चमकाव्यात तसा लखलखत होता. त्याचे डोळे अग्नीच्या ज्योतीसारखे होते. त्यांचे बाहू आणि पाय उज्ज्वल कास्यासारखे चमकत होते आणि त्याची वाणी फार मोठ्या लोकसमुदायाच्या आवाजासारखी प्रचंड होती.
7हा दृष्टान्त केवळ मला, दानीएललाच दिसला; जे माझ्याबरोबर होते, त्यांना तो दिसला नाही, परंतु त्यांना अतिशय भीतीने ग्रासले व लपण्यासाठी ते पळून गेले. 8मग मी एकटाच राहिलो आणि हा महान दृष्टान्त पहात राहिलो; माझ्यात शक्ती उरली नाही, माझा चेहरा पांढराफटक पडला आणि मी असहाय्य झालो. 9नंतर मी त्याला बोलताना ऐकले आणि मी जमिनीवर पालथा पडलो आणि मला गाढ झोप लागली.
10परंतु एका हाताने त्याने मला स्पर्श केला आणि माझ्या थरथर कापत असणार्या मला हातांवर व गुडघ्यांवर ठेवले. 11त्याने म्हटले, “हे दानीएला, परमप्रिय पुरुषा, मी जी काही वचने तुला सांगत आहे, ती लक्षपूर्वक ऐक आणि नीट उभा राहा, कारण मला तुझ्याकडे पाठविण्यात आले आहे.” आणि जेव्हा त्याने हे म्हटले, तेव्हा मी थरथर कापत उभा राहिलो.
12तो पुढे म्हणाला, “दानीएला, भिऊ नकोस. कारण ज्या पहिल्या दिवशी तू समजून घेण्यास आणि स्वतःला आपल्या परमेश्वरासमोर नम्र करण्यास मन लावलेस, त्या दिवसापासून तुझे शब्द ऐकण्यात आले आहे आणि आणि मी त्यांना प्रतिसाद म्हणून आलो आहे. 13परंतु पर्शिया राज्याच्या राजपुत्राने माझी वाट एकवीस दिवस अडविली. नंतर मिखाएल, स्वर्गातील राजपुत्रांपैकी एक, माझ्या साहाय्यासाठी आला, कारण पर्शियाच्या राजाकडे मला अडविण्यात आले होते. 14आता मी येथे भविष्यात तुझ्या लोकांसोबत काय होणार आहे ते समजविण्यासाठी आलो आहे, कारण हा दृष्टान्त पूर्ण होण्यास बराच वेळ आहे.”
15तो माझ्यासोबत हे बोलत असता, मी माझे तोंड जमिनीकडे केले आणि मी काही बोलू शकलो नाही. 16तेव्हा कोणीतरी जो मानवासारखा दिसणाऱ्याने#10:16 काही मूळ प्रतींनुसार मानवी हातासारखे दिसणारे असे काही माझ्या ओठांना स्पर्श केला आणि मी माझे मुख उघडले आणि मी बोलू लागलो. जो माझ्यापुढे उभा होता त्याला म्हटले, “प्रभू या दृष्टान्तामुळे मी मनोवेदनांनी ग्रस्त झालो आहे; आणि माझ्यात काही बळ उरले नाही. 17माझ्या प्रभू, मी तुमचा सेवक, मी तुमच्यासोबत कसे बोलू शकतो? माझी शक्ती नष्ट झाली आहे. मला श्वासही घेववत नाही.”
18तेव्हा मानवासारख्या दिसणार्या पुरुषाने मला पुन्हा स्पर्श केला आणि मला शक्ती दिली. 19“भिऊ नको, तू फार परमप्रिय आहेस,” तो म्हणाला. “तुला शांती लाभो! आता बलवान हो; बलवान हो!”
जेव्हा त्याने हे म्हटले तेव्हा मला सामर्थ्य आले आणि मी त्याला म्हटले, “माझ्या प्रभू बोला, कारण तुम्ही मला सामर्थ्य दिले आहे.”
20तेव्हा तो म्हणाला, “मी तुझ्याकडे का आलो हे तुला ठाऊक आहे काय? फार लवकर, मी पर्शियाच्या राजपुत्राशी लढायला परत येईन आणि मी निघून गेल्यावर ग्रीसचा राजपुत्र येईल; 21परंतु सत्याच्या पुस्तकात काय लिहिले आहे ते मी तुला प्रथम सांगतो. (तुमचा राजपुत्र मिखाएलाशिवाय त्यांच्याविरुद्ध माझी मदत करणारा कोणीही नाही.
सध्या निवडलेले:
दानीएल 10: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.