2 राजे 5
5
नामान कुष्ठरोगातून बरा होतो
1नामान हा अरामाच्या राजाच्या सैन्याचा सेनापती होता. तो त्याच्या स्वामीच्या नजरेत एक थोर आणि अत्यंत आदरणीय होता, कारण याहवेहने त्याच्याद्वारे अरामाला विजय मिळवून दिला होता. तो एक पराक्रमी वीरपुरुष होता; परंतु त्याला कुष्ठरोग#5:1 कुष्ठरोग कातडीच्या वेगवेगळ्या आजारासाठी हा शब्द वापरला जात असे. झाला होता.
2आता अरामातून टोळी बाहेर गेली आणि त्यांनी इस्राएलातील एका लहान मुलीला गुलाम म्हणून नेले आणि ती नामानाच्या पत्नीची सेवा करू लागली. 3एके दिवशी ती मुलगी आपल्या धनिणीला म्हणाली, “आपल्या स्वामींनी शोमरोनातील संदेष्ट्याची भेट घेतली असती तर किती बरे झाले असते! तो त्यांचा कुष्ठरोग बरा करू शकला असता.”
4ही इस्राएली मुलगी काय म्हणते हे नामानाने जाऊन राजाला सांगितले. 5तेव्हा अरामचा राजा म्हणाला, “मग आता जा आणि मी इस्राएलाच्या राजाला पत्र पाठवितो.” मग नामान आपल्याबरोबर चांदीचे दहा तालांत#5:5 जवळपास 340 कि.ग्रॅ., सोन्याची सहा हजार सोन्याची नाणी#5:5 जवळपास 69 कि.ग्रॅ. आणि उंची पोशाखांचे दहा जोड घेऊन निघाला. 6त्याने इस्राएलाच्या राजासाठी जे पत्र नेले, त्यामध्ये असे लिहिले होते: “या पत्रासोबत मी माझा सेवक नामानला तुमच्याकडे पाठवित आहे, तुम्ही त्याचे कुष्ठरोग बरे करावे.”
7इस्राएलाच्या राजाने ते पत्र वाचले. तेव्हा त्याने आपली वस्त्रे फाडली व म्हणाला, “मी परमेश्वर आहे काय? मी कोणाला मारून त्याला पुन्हा जिवंत करू शकतो काय? या व्यक्तीने कोणाला तरी माझ्याकडे कुष्ठरोग बरा होण्यासाठी का पाठविले आहे? पाहा तो कसा माझ्यासोबत भांडण करण्याचे काहीतरी निमित्त शोधीत आहे!”
8इस्राएलाच्या राजाने आपली वस्त्रे फाडली आहेत, असे जेव्हा परमेश्वरचा मनुष्य अलीशाने ऐकले, तेव्हा त्याने राजाला हा निरोप पाठविला: “तुम्ही आपली वस्त्रे का फाडली? त्या व्यक्तीला माझ्याकडे पाठवून द्या आणि त्याला समजून येईल की इस्राएलमध्ये संदेष्टा आहे.” 9तेव्हा नामानाने आपले घोडे आणि रथ घेतले आणि अलीशाच्या दारात येऊन उभा राहिला. 10अलीशाने एका निरोप्याद्वारे त्याला संदेश पाठविला, “जा यार्देन नदीत जाऊन सात वेळा स्वतःला धुवून घे म्हणजे तुझे शरीर पूर्वीसारखे शुद्ध होईल.”
11परंतु नामान रागात निघाला आणि म्हणाला, “पाहा, मला वाटले की ते खात्रीने बाहेर माझ्याकडे येतील आणि उभे राहतील आणि याहवेह त्यांच्या परमेश्वराच्या नावाचा धावा करतील, आपला हात माझ्या आजारी देहावर फिरवतील आणि माझे कोड बरे करतील. 12दिमिष्कमधील अमानाह व परपर या नद्या इस्राएलातील जलांपेक्षा उत्तम नाहीत काय? त्यामध्ये स्नान करून मी स्वतःला शुद्ध करू शकतो की नाही?” मग तो मागे फिरला आणि क्रोधाने निघून केला.
13नामानाचे सेवक त्याच्याकडे गेले आणि म्हणाले, “माझ्या पित्या, संदेष्ट्याने आपल्याला एखादी अवघड गोष्ट करावयास सांगितली असती, तर ती तुम्ही केली नसती काय? त्यांनी तर आपल्याला एवढेच सांगितले, जा स्नान कर आणि शुद्ध हो. तर मग तसे करावे की नाही?” 14मग तो खाली गेला आणि परमेश्वराच्या मनुष्याने सांगितल्याप्रमाणे यार्देन नदीमध्ये सात वेळा बुड्या मारल्या आणि त्याचे शरीर पूर्ववत् होऊन लहान मुलाच्या शरीरासारखे शुद्ध झाले.
15नंतर नामान आणि त्याचे सर्व लोक परमेश्वराच्या मनुष्याकडे परत गेले. तो त्याच्यासमोर उभा राहिला आणि म्हणाला, “शेवटी इस्राएलशिवाय जगामध्ये इतरत्र कुठेही परमेश्वर नाही, हे मला आता पूर्णपणे समजून चुकले आहे. तुमच्या सेवकाद्वारे आणलेल्या नजराण्यांचा कृपया स्वीकार करा.”
16तेव्हा संदेष्ट्याने उत्तर दिले, “ज्यांची मी सेवा करतो त्या जिवंत याहवेहची शपथ, मी काहीही स्वीकार करणार नाही.” आणि नामानाने त्याला फार आग्रह केला, पण त्याने नकार दिला.
17नामान म्हणाला, “तुम्हाला नजराणे नको असतील तर घेऊ नका, पण निदान माझ्यावर थोडी कृपा करा आणि बरोबर नेण्यासाठी मला दोन खेचरांवर लादून नेता येईल एवढी येथील माती तरी द्या, कारण येथून पुढे याहवेहशिवाय मी इतर कोणत्याही दैवताला कधीही होमार्पण किंवा यज्ञार्पण करणार नाही. 18मात्र एक गोष्टींसाठी याहवेहने आपल्या सेवकाला क्षमा करावी: माझा धनी, म्हणजे राजा, रिम्मोन मंदिरात नमन करण्यास जातात, त्यावेळी त्यांना माझ्या हाताच्या आधाराची गरज पडते आणि त्याच्याबरोबर मलाही नमन करावे लागते—जेव्हा मी रिम्मोन मंदिरात नमन करतो, तेव्हा याहवेहने आपल्या सेवकाला क्षमा करावी.”
19अलीशा म्हणाला, “शांतीने जा.”
मग नामान काही प्रवास केल्यानंतर, 20इकडे परमेश्वराचा मनुष्य अलीशाचा सेवक गेहजी स्वतःस म्हणाला, “माझ्या धन्याने या अरामी नामानाकडून नजराणे न स्वीकारता त्याला असेच जाऊ दिले. जिवंत याहवेहची शपथ, आता मी स्वतः त्याच्यामागे पळत जाईन आणि त्याच्यापासून काहीतरी घेईन.”
21गेहजी नामानाच्या मागे धावला. नामानाने जेव्हा त्याला त्याच्याकडे धावत येताना पाहिले, तो आपल्या रथातून खाली उतरून त्यास भेटण्यास गेला. नामानाने विचारले, “सर्वकाही ठीक आहे ना?”
22गेहजी म्हणाला, “सर्वकाही ठीक आहे. माझ्या धन्याने मला तुमच्याकडे हे सांगण्यास पाठविले आहे, ‘एफ्राईमच्या डोंगराळ भागातून संदेष्ट्यांच्या समुहातून दोन तरुण संदेष्टे आताच आले आहेत. कृपया त्यांना देण्यासाठी चांदीची एक तालांत व पोशाखांचे दोन जोड हवे आहेत.’ ”
23नामान म्हणाला, “तू आनंदाने दोन तालांत घेऊन जा.” त्याने ते स्वीकारण्याची त्याला विनंती केली आणि मग ती चांदी आणि पोशाखांच्या दोन थैल्या बांधून दिल्या. त्याने ते आपल्या दोन सेवकांना दिले आणि ते त्याच्यापुढे निघाले. 24जेव्हा गेहजी डोंगराजवळ आला तेव्हा त्याने सेवकांकडून त्या थैल्या घेतल्या आणि त्या आपल्या घरी ठेवून दिल्या. त्याने त्या माणसांना परत पाठवून दिले आणि ते निघून गेले.
25गेहजी आपल्या धन्याच्या पुढे जाऊन उभा राहिला, तेव्हा अलीशाने त्याला विचारले, “गेहजी, तू कुठे गेला होतास?”
गेहजीने उत्तर दिले, “तुमचा सेवक कुठेच गेला नव्हता.”
26परंतु अलीशा त्याला म्हणाला, “तो मनुष्य तुला भेटण्यास आपल्या रथावरून उतरला, तेव्हा माझा आत्मा तुझ्याबरोबर नव्हता काय? पैसा किंवा पोशाख, जैतुनाची शेते आणि द्राक्षमळे किंवा मेंढरे आणि गुरे किंवा दास आणि दासी मागून घेण्याचा हा समय आहे काय? 27तुला व तुझ्या संतानाला नामानाचा कुष्ठरोग निरंतर लागून राहील.” तेव्हा गेहजी अलीशाच्या सान्निध्यातून निघून गेला आणि त्याच्या त्वचेवर कोड फुटले होते—आणि त्याची त्वचा हिमासारखी पांढरी झाली होती.
सध्या निवडलेले:
2 राजे 5: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.