YouVersion लोगो
सर्च आयकॉन

2 राजे 6

6
कुर्‍हाड पाण्यावर तरंगते
1संदेष्ट्यांचा समूह अलीशाला म्हणाला, “पाहा, आम्ही ज्या ठिकाणी तुम्हाला भेटतो ती जागा आमच्यासाठी फार लहान आहे. 2चला आपण यार्देन नदीवर जाऊ या, जिथे प्रत्येक आपल्यासाठी खांब घेईल; आणि भेटण्यासाठी आपण एक स्थान तयार करू या.”
आणि तो म्हणाला, “जा.”
3त्यापैकी एकाने म्हटले, “कृपया तुम्ही तुमच्या सेवकासोबत येणार काय?”
अलीशाने उत्तर दिले, “मी तुमच्याबरोबर येतो.” 4आणि तो त्यांच्यासोबत गेला.
ते यार्देनकडे गेले आणि झाडे तोडू लागले. 5त्यापैकी एकजण झाडे तोडत असता, त्याच्या कुर्‍हाडीचे पाते अचानक दांड्यातून निसटून नदीत पडले. तो ओरडून म्हणाला, “अरे! अरे! स्वामी, मी ती कुर्‍हाड उसनी मागून आणली होती!”
6परमेश्वराच्या मनुष्याने विचारले, “ते कुठे पडले?” तेव्हा त्या शिष्यांनी ती जागा त्याला दाखविली. तेव्हा अलीशाने एक लाकूड तोडून त्या जागेवर टाकले. आणि ते कुर्‍हाडीचे पाते येऊन पाण्यावर तरंगू लागले. 7तो म्हणाला, “ती काढून घे.” मग त्याने हात लांब करून ती घेतली.
अलीशा आंधळ्या अराम्यांना जाळ्यात अडकवितो
8त्यावेळी अरामाच्या राजाने इस्राएलशी युद्ध केले असता, आपल्या अधिकार्‍यांशी मसलत केली आणि तो म्हणाला, “मी अमुक ठिकाणी माझा तळ देणार आहे.”
9परमेश्वराच्या मनुष्याने इस्राएलाच्या राजाला निरोप पाठविला: “सावध राहा, तुम्ही त्या ठिकाणी जाऊ नका, कारण अरामी सैनिक त्या ठिकाणी दबा धरून बसले आहेत.” 10परमेश्वराच्या मनुष्याने सांगितलेले ठिकाण इस्राएलच्या राजाने पडताळून पाहिले. अलीशाने राजाला वारंवार सावध केले, जेणेकरून तो अशा ठिकाणी सावध राहिला.
11तेव्हा अरामचा राजा संतप्त झाला. त्याने आपल्या अधिकार्‍यांना बोलाविले आणि मागणी केली, “आपल्यापैकी कोण इस्राएलाच्या राजाच्या बाजूने आहे?”
12तेव्हा एका अधिकार्‍याने म्हटले, “माझे स्वामी महाराज, आपल्यापैकी कोणीही नाही, परंतु इस्राएलमधील अलीशा जो संदेष्टा, तो इस्राएलाच्या राजाला तुम्ही तुमच्या विश्रांतिगृहात उच्चारलेले प्रत्येक शब्द कळवितो.”
13राजाने आदेश दिला, “तो कुठे आहे शोधून काढा, म्हणजे मी माणसे पाठवितो आणि त्याला कैद करतो.” त्याच्याकडे बातमी परत आली: “तो दोथान येथे आहे.” 14मग त्याने तिथे घोडे आणि रथ व एक मोठे सैन्य पाठविले. ते रात्री गेले आणि शहराला वेढा घातला.
15दुसर्‍या दिवशी पहाटेच परमेश्वराच्या मनुष्याचा सेवक उठून बाहेर आला, तेव्हा सैनिकांनी रथ आणि घोडे यासह शहराला वेढा दिला आहे, हे त्याला दिसले. तेव्हा तो ओरडला, “माझ्या स्वामी, आता आपण काय करावे?”
16संदेष्ट्याने उत्तर दिले, “भिऊ नकोस, कारण हे त्यांच्यासोबत जे आहेत त्यांच्यापेक्षा जे आपल्यासोबत आहेत ते अधिक आहेत.”
17मग अलीशाने ही प्रार्थना केली, “हे याहवेह, याचे डोळे उघडा, म्हणजे तो पाहू शकेल.” तेव्हा याहवेहने त्या सेवकाचे डोळे उघडले, आणि त्याने दृष्टी वर केली आणि पाहिले की, अलीशाच्या सभोवतालचा डोंगर अग्नीचे घोडे आणि रथ यांनी भरलेला आहे.
18जेव्हा शत्रू खाली त्याच्याकडे आले, तेव्हा अलीशाने याहवेहकडे प्रार्थना केली, “कृपा करून या सर्व लोकांना आंधळे करून टाका.” अलीशाने विनंती केल्याप्रमाणे त्यांनी त्यांना आंधळे केले.
19मग अलीशा त्यांना म्हणाला, “हा तो रस्ता नाही आणि हे ते नगरही नाही. माझ्यामागे या म्हणजे जो मनुष्य तुम्हाला पाहिजे आहे, त्याच्याकडे मी तुम्हाला घेऊन जाईन.” आणि त्याने त्यांना शोमरोनात नेले.
20शोमरोनात प्रवेश केल्यानंतर, अलीशाने प्रार्थना केली, “हे याहवेह, आता या माणसांचे डोळे उघडा म्हणजे ते पाहू शकतील.” तेव्हा याहवेहने त्यांचे डोळे उघडले, आणि त्यांनी पाहिले की ते इस्राएलची राजधानी शोमरोनामध्ये आहेत.
21जेव्हा इस्राएलाच्या राजाने त्यांना पहिले, तेव्हा त्यांनी अलीशाला विचारले, “मी त्यांचा घात करू काय, माझ्या पित्या, मी त्यांचा घात करू काय?”
22अलीशाने उत्तर दिले, “त्यांचा घात करू नको. तुम्ही आपल्या तलवारीने किंवा धनुष्याने पकडलेल्यांना माराल का? त्यांच्यापुढे अन्न व पाणी ठेवा म्हणजे ते खाऊन पिऊन तृप्त होतील आणि नंतर त्यांच्या स्वामीकडे परत जातील.” 23तेव्हा राजाने त्यांच्यासाठी एक मोठी मेजवानी केली, आणि त्यांचे खाणेपिणे झाल्यानंतर त्यांना पाठवून दिले आणि ते आपल्या स्वामीकडे परत आले. त्यानंतर अरामाच्या टोळ्यांनी इस्राएली देशावर हल्ला करण्याचे थांबविले.
वेढलेल्या शोमरोनात दुष्काळ
24काही काळानंतर अरामचा बेन-हदाद राजाने आपल्या सर्व सैन्याची जमवाजमव करून शोमरोनावर स्वारी केली आणि त्याला वेढा दिला. 25शोमरोन शहरात फार मोठा दुष्काळ पडला; वेढा इतका काळ राहिला की गाढवाचे मुंडके चांदीच्या ऐंशी शेकेलला#6:25 अंदाजे 920 ग्रॅ. आणि कबुतराची एक पावशेर#6:25 मूळ भाषेत एक पावशेर अंदाजे 100 ग्रॅ विष्ठा#6:25 विष्ठा कदाचित् एक प्रकारची भाजी पाच शेकेलला#6:25 अंदाजे 58 ग्रॅ. विकली गेली.
26एके दिवशी इस्राएलाचा राजा तटावरून फेर्‍या मारीत असताना, एक स्त्री मोठ्याने ओरडून त्याला म्हणाली, “माझे स्वामी महाराज, मला साहाय्य करा!”
27राजाने उत्तर दिले, “खुद्द याहवेह तुला साहाय्य करीत नाही, तर मी तुझी साहाय्यता कशी करू? खळ्यातून की द्राक्षकुंडातून?” 28मग राजाने तिला विचारले, “तुला काय झाले आहे?”
स्त्रीने उत्तर दिले, “या स्त्रीने मला म्हटले, ‘तू आपला मुलगा दे म्हणजे आज आपण त्याला खाऊ आणि उद्या आपण माझ्या मुलाला खाऊ.’ 29तेव्हा आम्ही माझ्या मुलाला शिजवून खाल्ले. दुसर्‍या दिवशी मी तिला म्हणाले, ‘आता तुझ्या मुलाला आण म्हणजे आपण त्याला खाऊ,’ पण तिने त्याला कुठेतरी लपवून ठेवले.”
30जेव्हा राजाने स्त्रीचे शब्द ऐकले, तेव्हा त्याने आपला अंगरखा फाडला. त्याला तटावरून फिरत असता लोकांनी पाहिले आणि त्यांच्या नजरेस आले की त्याच्या अंगरख्या खाली त्याने गोणपाट गुंडाळलेले आहे. 31तो म्हणाला, “मी जर आज शाफाटाचा पुत्र अलीशाचे शिर उडविले नाही, तर परमेश्वर माझे त्याहूनही अधिक वाईट करो.”
32अलीशा आपल्या घरात बसलेला होता आणि वडीलजन त्याच्यासोबत बसलेले होते. राजाने आपल्यापुढे दूत पाठविला, पण तो येण्यापूर्वी अलीशा वडीलजनांना म्हणाला, “या खुनी मनुष्याने माझा शिरच्छेद करण्यासाठी कोणाला तरी पाठविले आहे, हे तुम्ही पाहिले काय? पाहा, जेव्हा दूत येईल तेव्हा दार बंद करून त्याला बाहेरच ठेवा, कारण त्याच्या पाठोपाठ त्याच्या धन्याच्या पावलांचा आवाज आहे की नाही?” 33अलीशा हे सांगत असतानाच तो दूत खाली त्याच्याजवळ आला.
राजा म्हणाला, “हे अरिष्ट याहवेहकडून आहे. तेव्हा मी याहवेहची अजून वाट का पाहावी?”

सध्या निवडलेले:

2 राजे 6: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन