YouVersion लोगो
सर्च आयकॉन

2 राजे 7

7
1अलीशाने उत्तर दिले, “याहवेहचे वचन ऐका. याहवेह असे म्हणतात: उद्या याच सुमारास शोमरोनच्या वेशीत तुम्हाला एका शेकेलला#7:1 अंदाजे 12 ग्रॅ. एक सिआ#7:1 अंदाजे 5.5 कि.ग्रॅ. सपीठ आणि एका शेकेलला दोन सिआ#7:1 अंदाजे 9 कि.ग्रॅ. सातू मिळेल.”
2ज्या कारभाऱ्याच्या हातावर राजा टेकायचा तो परमेश्वराच्या मनुष्याला म्हणाला, “याहवेहने आकाशाच्या खिडक्या उघडल्या, तरी असे घडणे शक्य नाही.”
अलीशाने त्याला उत्तर दिले, “तसे तू आपल्या डोळ्यांनी पाहशील, पण त्यातील तू काहीही खाऊ शकणार नाही!”
वेढा उठविण्यात येतो
3त्यावेळी शहराच्या वेशीजवळ चार कुष्ठरोगी बसले होते. त्यांनी एकमेकास म्हटले, “आपण मरेपर्यंत इथे का राहावे? 4जर आपण म्हणालो, ‘आपण शहरात जाऊ,’ तर तिथे दुष्काळ आहे आणि आपण तर मरणारच. येते बसून राहिलो तरीही आपण मरणारच आहोत. तर मग आपण अरामी सैन्याच्या छावणीत जाऊ आणि शरण घेऊ. त्यांनी आपल्याला जीवदान दिले, तर जिवंत राहू आणि मारून टाकले, तर आपण मरू, तर त्यात काही हरकत नाही.”
5संध्याकाळी ते उठले आणि अरामी सैन्याच्या छावणीत गेले, पण जेव्हा ते छावणीच्या सीमेवर आले तेव्हा तिथे एकही मनुष्य नव्हता, 6कारण प्रभू परमेश्वराने अरामी सेनेला रथांचा आणि घोड्यांचा आणि मोठ्या सैन्याचा आवाज ऐकविला होता. तेव्हा ते एकमेकांना म्हणाले, “पाहा, आमच्यावर हल्ला चढविण्यासाठी इस्राएलाच्या राजाने पैसे देऊन हिथी व इजिप्ती राजे बोलाविले आहे.” 7तेव्हा ते उठले आणि संध्याकाळी पळून गेले. त्यांनी आपले तंबू, घोडे, गाढवे यांचा त्याग केला. आपले तंबू तसेच सोडून प्राण वाचविण्यासाठी त्यांनी पलायन केले.
8जेव्हा हे कुष्ठरोगी अरामी छावणीच्या सीमेजवळ आले, तेव्हा त्यांनी एका तंबूत घुसून खाणेपिणे केले. त्यांनी चांदी, सोने आणि कपडे गोळा करून ते लपवून ठेवले. ते परत येऊन दुसर्‍या तंबूत गेले आणि त्यातून काही वस्तू घेतल्या आणि त्यादेखील लपवून ठेवल्या.
9तेव्हा ते एकमेकास म्हणाले, “आपण जे करत आहोत ते योग्य नाही. हा आनंदाच्या शुभवार्तेचा दिवस आहे आणि ती आपण स्वतःजवळच ठेवीत आहोत. जर आपण सकाळ होईपर्यंत थांबून राहिलो तर आपण दंडपात्र होऊ. तेव्हा चला, आपण राजवाड्यात जाऊन ही बातमी सांगू.”
10नंतर ते गेले आणि शहराच्या पहारेकर्‍यांना हाक मारून सांगितले, “आम्ही अरामी छावणीत गेलो होतो आणि तिथे कोणीही मनुष्य नव्हता—कोणाचाही शब्द नाही—तेथील घोडे व गाढवे बांधून ठेवली आहेत आणि तंबूही जसेच्या तसे आहेत.” 11तेव्हा पहारेकर्‍यांनी ओरडून ही बातमी सांगितली आणि राजवाड्यात कळविली.
12तेव्हा राजा रात्री उठला आणि आपल्या सेवकांना म्हणाला, “मी तुम्हाला सांगतो की अरामी लोकांनी आपल्यासोबत काय केले आहे. आपण भुकेने मरत आहोत हे त्यांना माहीत आहे; म्हणून ते आपली छावणी सोडून आजूबाजूला मैदानात दबा धरून बसले आहे. त्यांना वाटते की, ‘ते खात्रीने बाहेर पडतील आणि मग आपण त्यांना जिवंत पकडू आणि त्यांच्या शहरात प्रवेश करू.’ ”
13तेव्हा त्याच्या एका अधिकार्‍याने उत्तर दिले, “शहरात शिल्लक राहिलेले पाच घोडे घेण्यास काही माणसांना सांगा. तसेही त्यांची अवस्था येथे उरलेल्या सर्व इस्राएली लोकांपेक्षा काही वेगळी नाही—होय, ते केवळ ज्यांचा नाश झाला आहे, त्या सर्व इस्राएली लोकांप्रमाणेच असतील. म्हणून काय झाले आहे हे पाहण्यास काही लोकांना पाठवू द्या.”
14म्हणून त्यांनी दोन रथ घोड्यांसहित घेतले आणि राजाने त्यांना अरामी सैन्याच्या मागे पाठविले. त्याने त्यांना आदेश दिला, “जा आणि काय झाले ते पाहून या.” 15ते यार्देनपर्यंत त्यांच्यामागे गेले आणि अरामी लोकांचे कपडे व सामान मार्गावर पसरलेले त्यांना आढळले, जे अरामी लोकांनी पळून जात असता फेकून दिले होते. दूत परत आले आणि राजाला हे वर्तमान कळवले. 16मग लोक बाहेर निघाले आणि अरामी लोकांची छावणी लुटली. याहवेहच्या वचनानुसार एका शेकेलास एक सिआ सपीठ, आणि एका शेकेलास सातूच्या दोन सेआ विकत मिळू लागले.
17राजा ज्या अधिकार्‍याच्या दंडावर टेकीत होता त्याला वेशीवर नियुक्त केले होते आणि लोकांनी त्याला वेशीवर तुडविले व तो मरण पावला, ज्याप्रमाणे परमेश्वराच्या मनुष्याने सांगितले होते, जेव्हा राजा खाली त्याच्याकडे गेला होता. 18परमेश्वराच्या मनुष्याने राजाला सांगितल्याप्रमाणे झाले: “शोमरोनच्या वेशीजवळ एका शेकेलास एक सिआ सपीठ आणि एका शेकेलास दोन सिआ सातू विकत मिळू लागेल.”
19त्या अधिकार्‍याने परमेश्वराच्या मनुष्याला म्हटले होते, “याहवेहने आकाशाच्या खिडक्या उघडल्या, तरी असे घडणे शक्य नाही.” परमेश्वराच्या मनुष्याने उत्तर दिले होते, “तसे तू आपल्या डोळ्यांनी पाहशील, पण त्यातील तू काहीही खाऊ शकणार नाही!” 20त्याच्यासोबत असेच घडले, कारण लोकांनी त्याला वेशीजवळ तुडविले आणि तो मरण पावला.

सध्या निवडलेले:

2 राजे 7: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन