YouVersion लोगो
सर्च आयकॉन

2 राजे 8

8
शूनेम येथील स्त्रीची भूमी परत मिळवून दिली
1अलीशाने ज्या स्त्रीच्या मुलास जिवंत केले होते, तिला म्हणाला, “तुझ्या कुटुंबीयांनी घेऊन निघून जा आणि जिथे तुला राहता येईल तिथे राहा, कारण याहवेह या भूमीवर मोठा दुष्काळ पाठविणार आहेत आणि तो सात वर्षे टिकणार आहे.” 2त्या स्त्रीने परमेश्वराच्या मनुष्याने सांगितल्याप्रमाणे केले. ती आणि तिचे कुटुंब दूर निघून पलिष्ट्यांच्या देशात जाऊन सात वर्षे राहिले.
3सात वर्षाच्या शेवटी ती पलिष्टी देशातून परत आली आणि आपले घर आणि जमीन परत मिळण्यासंबंधी राजाला विनंती करण्यास गेली. 4त्यावेळी राजा परमेश्वराचा मनुष्य अलीशाचा सेवक गेहजीशी बोलत होता आणि तो म्हणाला, “अलीशाने जी सर्व मोठी कृत्ये केली ती मला सांग.” 5जेव्हा गेहजी राजाला सांगत असता कसे अलीशाने मृताला जिवंत केले; ती स्त्री आपली जमीन आणि घर परत मिळावे म्हणून विनंती करण्यास राजाकडे आली होती.
गेहजी म्हणाला, “माझे स्वामी, माझे महाराज, हीच ती स्त्री, आणि अलीशाने ज्या मुलाला जिवंत केले तोच हा पुत्र.” 6राजाने त्याबद्दल स्त्रीला विचारले आणि तिने त्याला सर्व सांगितले.
मग त्याने आपल्या एका अधिकार्‍याला तिच्या मदतीसाठी नेमून दिले आणि त्याला म्हटले, “तिचे जे काही होते, ते सर्व तिला परत द्या, तिने देश सोडल्यापासून आजपर्यंत तिच्या मालकीचे सर्वकाही, अगदी तिच्या जमिनीचे सर्व उत्पन्न तिला परत करा.”
हजाएल बेन-हदादचा वध करतो
7अलीशा दिमिष्क येथे गेला आणि अरामचा राजा बेन-हदाद आजारी होता. जेव्हा राजाला सांगण्यात आले, “परमेश्वराचा मनुष्य येथे वर आलेला आहे,” 8राजाने हजाएलला म्हटले, “एखादी भेट घेऊन परमेश्वराच्या मनुष्याला भेटण्यास जा आणि त्याच्याद्वारे याहवेहस विचार, ‘मी या आजारातून बरा होईन की नाही?’ ”
9हजाएल त्याच्यासोबत दिमिष्कच्या सर्व उत्तम भेटवस्तू चाळीस उंटावर लादून अलीशाला भेटण्यासाठी गेला. तो गेला आणि त्याच्यासमोर उभा राहिला आणि म्हटले, “तुमचा पुत्र, अरामचा राजा बेन-हदाद, यांनी मला आपल्याकडे हे विचारण्यास पाठविले आहे की, मी या आजारातून बरा होईन की नाही?”
10अलीशाने उत्तर दिले, “जा आणि त्याला सांग, ‘तू नक्कीच बरा होशील.’ परंतु याहवेहने मला स्पष्ट दाखविले आहे की तो अवश्य मरेल.” 11यानंतर अलीशाने हजाएलकडे तो इतका लाजिरवाणा होईपर्यंत रोखून पाहिले की हजाएल भांबावून गेला. त्यानंतर परमेश्वराचा मनुष्य रडू लागला.
12हजाएलाने विचारले, “माझे स्वामी का रडत आहेत?”
अलीशाने उत्तर दिले, “कारण मला माहीत आहे की तू इस्राएली लोकांचे वाईट करणार आहेस, तू त्यांच्या तटबंदीच्या ठिकाणास आग लावशील, त्यांच्या तरुण पुरुषांना तलवारीने ठार मारशील, त्यांच्या बालकांना आपटून मारशील आणि गर्भवती स्त्रियांना चिरून टाकशील.”
13हजाएल म्हणाला, “कसे काय तुमचा सेवक मी एक कुत्रा आहे, एवढी मोठी गोष्ट करणार काय?”
अलीशाने उत्तर दिले, “याहवेहने मला दाखविले आहे, तू अरामचा राजा होणार,”
14त्यानंतर हजाएल अलीशाला सोडून गेला आणि आपल्या स्वामीकडे परत आला. जेव्हा बेन-हदादने विचारले, “अलीशाने तुला काय सांगितले?” हजाएलाने उत्तर दिले, “त्यांनी मला सांगितले की तुम्ही नक्कीच बरे होणार.” 15परंतु दुसर्‍या दिवशी त्याने एक रजई पाण्यात भिजविली आणि ती राजाच्या तोंडावर पसरली, त्यामुळे राजा मरण पावला. त्यानंतर हजाएल त्याच्या ठिकाणी राजा झाला.
यहूदाचा राजा योराम
16अहाबाचा पुत्र, इस्राएलाचा राजा योरामच्या कारकिर्दीच्या पाचव्या वर्षी, यहूदीयाचा राजा यहोशाफाटचा पुत्र यहोराम राज्य करू लागला. 17तो वयाच्या बत्तीसाव्या वर्षी राजा झाला, त्याने यरुशलेमवर आठ वर्षे राज्य केले. 18अहाबाच्या घराण्याने जसे केले होते त्याचप्रमाणे त्याने इस्राएलच्या राजांच्या मार्गांचे अनुसरण केले, कारण त्याने अहाबाच्या मुलीबरोबर विवाह केला होता. याहवेहच्या दृष्टीने जे वाईट ते त्याने केले. 19तथापि आपला सेवक दावीदासाठी याहवेहने यहूदाहचा नाश केला नाही. कारण त्यांनी दावीदाच्या वंशजाचा दिवा कायम ठेवण्याचे अभिवचन दिले होते.
20यहोरामाच्या काळात, एदोमाने यहूदीयाविरुद्ध बंड पुकारले आणि त्यांनी स्वतःसाठी एक राजा निवडला. 21मग यहोराम आपले रथ घेऊन साईर येथे गेला. ज्या एदोमी लोकांनी त्याला आणि त्याच्या रथाच्या नायकांना घेरले होते, रात्रीच्या वेळी उठून त्याने वेढा मोडून टाकला. आणि लोक आपल्या डेर्‍यांत पळून गेले. 22तेव्हापासून आजपर्यंत एदोम यहूदीयाहविरुद्ध बंड करीत आहे. त्याचवेळेस लिब्नाहनेही बंड केले.
23यहोरामाच्या बाकीच्या कामगिरीचा तपशील आणि त्याची सर्व कामे यहूदीयाच्या राजांच्या इतिहास या ग्रंथात केलेली नाही काय? 24यहोराम त्याच्या पूर्वजांबरोबर विसावा पावला आणि तो त्यांच्याबरोबर दावीदाच्या नगरात पुरला गेला आणि वारस म्हणून त्याचा पुत्र अहज्याह राजा झाला.
यहूदाचा राजा अहज्याह
25इस्राएलाचा राजा अहाबाचा पुत्र योरामच्या बाराव्या वर्षी यहोरामाचा पुत्र अहज्याह यहूदीयाचा राजा म्हणून राज्य करू लागला. 26वयाच्या बावीसाव्या वर्षी अहज्याह राजा झाला आणि त्याने यरुशलेमात एक वर्ष राज्य केले. त्याच्या आईचे नाव अथल्याह होते, ती इस्राएलाचा राजा ओमरीची नात होती. 27तो अहाबाच्या घराण्याच्या मार्गाने चालला आणि अहाबाच्या घराण्याप्रमाणे याहवेहच्या दृष्टीने वाईट ते केले, कारण त्याचे अहाबाच्या घराण्याशी विवाहाद्वारे संबंध होते.
28अरामचा राजा, हजाएलविरुद्ध रामोथ गिलआद येथे झालेल्या युद्धात अहज्याह इस्राएलचा राजा अहाबाचा पुत्र योरामच्या बाजूने लढला. या युद्धात योराम राजा जखमी झाला; 29रामाह#8:29 किंवा रामोथ येथे अरामचा राजा हजाएलशी लढताना झालेल्या जखमांना मलम पट्टी करण्यासाठी योराम राजा येज्रीलला परतला.
यहूदीयाचा राजा यहोरामचा पुत्र अहज्याह हा अहाबाचा पुत्र योरामची प्रकृती पाहण्यासाठी येज्रीलला गेला, कारण योराम जखमी झाला होता.

सध्या निवडलेले:

2 राजे 8: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन