YouVersion लोगो
सर्च आयकॉन

2 राजे 4

4
विधवेचे जैतून तेल
1संदेष्ट्यांच्या समुहातील एका मनुष्याची पत्नी रडून अलीशाला म्हणाली, “तुमचा सेवक माझा पती मरण पावला आहे आणि तुम्हाला माहीत आहे तो याहवेहचा भय बाळगणारा होता. पण आता त्याचा सावकार माझ्या दोन मुलांना त्याचे गुलाम व्हावे म्हणून घ्यायला येत आहे.”
2अलीशाने तिला विचारले, “मी तुला कशी मदत करू शकतो? तुझ्या घरात काय आहे ते मला सांग?”
ती म्हणाली, “एका कुपीत थोड्याशा जैतुनाच्या तेलाशिवाय तुमच्या दासीजवळ काहीही नाही.”
3अलीशा म्हणाला, “आजूबाजूला जा आणि तुझ्या सर्व शेजार्‍यांकडून रिकामी भांडी मागून घे. थोडकी मागू नको. 4आपल्या मुलांना घेऊन तू घरात जा व दार लावून घे. नंतर जैतुनाचे तेल तू सर्व भांड्यात भर आणि ते भांडे भरले की एका बाजूला ठेव.”
5तिने त्याला सोडले आणि तिच्या आणि तिच्या मुलांच्या मागून दार बंद केले. त्यांनी भांडे तिच्याकडे आणले आणि ती ओतत राहिली. 6जेव्हा प्रत्येक भांडे भरले गेले. ती तिच्या मुलाला म्हणाली, “आणखी काही भांडी माझ्याकडे आण.”
पण त्याने म्हटले, “आता एकही भांडे शिल्लक राहिले नाही.” तेव्हा तेल वाहणे बंद झाले.
7ती परमेश्वराच्या माणसाजवळ गेली आणि त्याला सांगितले, तो म्हणाला, “आता जा आणि तेल विकून आपले कर्ज फेड. जे शिल्लक राहिलेले आहे त्यावर तुझा आणि तुझ्या मुलांचा निर्वाह कर.”
शूनेम गावच्या स्त्रीचा मृत पुत्र जिवंत केला जातो
8एके दिवशी अलीशा शूनेम येथे गेला आणि तिथे एक प्रतिष्ठित स्त्री राहत होती, तिने त्याला भोजनासाठी आग्रह केला. जेव्हा तो त्या मार्गाने जाई, तेव्हा तेव्हा तो तिच्या घरी भोजनासाठी उतरत असे. 9ती आपल्या पतीला म्हणाली, “मला माहीत आहे की हा मनुष्य जो वरचेवर आपल्या मार्गाने येतो, तो परमेश्वराचा पवित्र मनुष्य आहे. 10तेव्हा त्यांच्यासाठी आपण धाब्यावर एक लहानशी खोली तयार करू. तिथे त्यांच्यासाठी एक खाट, एक मेज, एक खुर्ची व एक दिवा ठेवू. म्हणजे जेव्हा ते येतील तेव्हा इथे राहू शकतील.”
11एके दिवशी अलीशा तिथे आला आणि त्याच्या खोलीत जाऊन विसावा घेतला. 12त्याने आपला सेवक गेहजीला म्हटले, “शूनेमकरीच्या स्त्रीला बोलव.” त्याने तिला बोलाविले आणि ती त्याच्यापुढे उभी राहिली. 13अलीशा गेहजीला म्हणाला, “तिला सांग, ‘तू आमच्यासाठी या सर्व त्रासातून गेली आहेस. आम्ही तुझ्यासाठी काय करू शकतो? राजापुढे किंवा सेनाधिकार्‍यांपुढे तुझ्या वतीने बोलावे काय?’ ”
तिने उत्तर दिले, “मी तर माझ्या लोकांमध्येच राहते.”
14अलीशाने गेहजीला विचारले, “आपण तिच्यासाठी काय करू शकतो?”
गेहजी म्हणाला, “तिला मूल नाही व आता तिचा पती वृद्ध झाला आहे.”
15मग अलीशाने म्हटले, “तिला बोलावून आण.” म्हणून त्याने तिला बोलाविले आणि ती दारातच उभी राहिली. 16अलीशा तिला म्हणाला, “पुढील वर्षी यावेळेस तू आपल्या पुत्रास उराशी धरशील.”
ती म्हणाली, “माझ्या स्वामी, नाही, परमेश्वराच्या मनुष्या, कृपया तुम्ही मला अशी खोटी अाशा देऊ नका!”
17पण अलीशाने तिला सांगितल्याप्रमाणे ती स्त्री गर्भवती झाली आणि पुढच्या वर्षी वसंतॠतूत तिने एका पुत्राला जन्म दिला.
18पुत्र वाढत गेला आणि एके दिवशी आपल्या पित्याकडे गेला, जो कापणी करणार्‍यांसोबत होता. 19तो आपल्या पित्याला म्हणाला, “माझे डोके! माझे डोके!”
त्याच्या पित्याने एका सेवकाला म्हटले, “याला त्याच्या आईकडे घेऊन जा.” 20सेवकाने त्याला उचलले आणि त्याच्या आईजवळ त्याला नेले. तो बालक दुपारपर्यंत त्याच्या आईच्या मांडीवर बसला आणि नंतर तो मरण पावला. 21ती त्याला घेऊन वर गेली आणि परमेश्वराच्या माणसाच्या खाटेवर ठेवले आणि दार बंद करून ती बाहेर गेली.
22तिने आपल्या पतीला हाक मारली आणि म्हटले, “एक सेवक व एक गाढव माझ्याकडे पाठवून द्या, कारण मला ताबडतोब परमेश्वराच्या मनुष्याकडे त्याची भेट घेऊन परत येते.”
23त्याने विचारले, “आजच त्याच्याकडे का जात आहे? आज काही चंद्रदर्शन किंवा शब्बाथ नाही.”
ती म्हणाली, “हा ठीक आहे.”
24मग तिने गाढवावर खोगीर घातले व तिच्या सेवकास म्हणाली, “चल, गाढव त्वरेने हाकलीत ने, मी सांगितल्याशिवाय वेग कमी करू नको.” 25ती निघाली आणि कर्मेल डोंगराजवळ परमेश्वराच्या मनुष्याकडे आली.
जेव्हा त्याने तिला दुरून पहिले, तेव्हा परमेश्वराच्या मनुष्याने आपला सेवक गेहजीला म्हटले, “बघ, ती शूनेमकरीण! 26धावत पुढे जा आणि तिला विचार, ‘तू ठीक आहे काय? तुझे पती ठीक आहेत काय? तुझे लेकरू ठीक आहे काय?’ ”
ती म्हणाली, “होय, सर्वकाही ठीक आहे.”
27जेव्हा ती परमेश्वराच्या मनुष्याच्या डोंगरावर पोहोचली, तेव्हा तिने त्याचे पाय धरले. जेव्हा गेहजी तिला दूर लोटू लागला, पण परमेश्वराच्या मनुष्याने म्हटले, “तिला सोड! ती फार दुःखात आहे, पण याहवेहने त्याचे कारण मला कळविले नाही आणि ते माझ्यापासून गुप्त ठेवले.”
28ती म्हणाली, “माझ्या स्वामी, मी तुमच्याजवळ पुत्र मागितला होता काय? आणि त्यावेळी मी तुम्हाला, ‘मला निरर्थक आशा देऊ नका, असे म्हटले नव्हते का?’ ”
29अलीशा गेहजीला म्हणाला, “कंबर बांध आणि माझी काठी तुझ्या हातात घे आणि धाव. मार्गात तुला कोणी भेटला तर अभिवादन करू नको आणि जर तुला कोणी अभिवादन केले तर त्यांना उत्तर देऊ नकोस. माझी काठी मुलाच्या तोंडावर ठेव.”
30परंतु मुलाची आई म्हणाली, “याहवेहची आणि तुमच्या जीविताची शपथ, मी तुम्हाला सोडणार नाही.” म्हणून तो उठला आणि तिच्यामागून निघाला.
31गेहजी पुढे गेला आणि त्याने त्या मुलाच्या तोंडाला काठीचा स्पर्श केला, पण कोणताच आवाज नाही वा प्रतिसाद मिळाला. म्हणून गेहजी परत अलीशाला भेटण्यास गेला आणि त्याला सांगितले, “मुलगा जागा झाला नाही.”
32अलीशा घरात गेला, तो त्याला मुलगा मृत होऊन त्याच्या खाटेवर पडला आहे असे दिसले, 33तेव्हा अलीशा आत गेला, त्याने दोघांच्या मागे दार बंद करून घेतले, आणि याहवेहची प्रार्थना केली. 34मग अलीशा मुलाच्या शरीरावर, तोंडावर तोंड, डोळ्यांवर डोळे, हातांवर हात, अशाप्रकारे उपडा पडला. त्यामुळे मुलाच्या शरीरात पुन्हा ऊब येऊ लागली. 35मग अलीशा माडीवरून खाली आला व घरात काही वेळ इकडे फेर्‍या मारून पुन्हा माडीवर जाऊन पूर्वीप्रमाणे मुलाच्या शरीरावर उपडा पडला. तेव्हा मुलाने सात वेळा शिंका दिल्या व डोळे उघडले.
36मग अलीशाने गेहजीला बोलावून म्हटले, “शूनेमकरीणीला बोलव.” त्याने तिला बोलविल्यावर, तो तिला म्हणाला, “हा घे, तुझ्या पुत्र!” 37ती आत आली, त्याच्या पायावर पडली आणि जमिनीपर्यंत लवून तिने त्याला नमन केले. मग तिने आपल्या मुलाला घेतले आणि ती बाहेर पडली.
अलीशा अन्नातील विष नाहीसे करतो
38अलीशा गिलगाल येथे परत आला आणि त्या भागात दुष्काळ पडला होता. संदेष्ट्यांचा समूह त्याच्यापुढे बसलेला होता, त्याने आपल्या सेवकास म्हटले, “चुलीवर मोठे भांडे ठेऊन या संदेष्ट्यांसाठी शाकभाजी कर.”
39त्यांच्यातील एकजण शाकभाजी आणावयास एका शेतात गेला आणि त्याला रानटी द्राक्षे दिसली आणि त्याने आपल्या कापडात जितकी फळे त्याला उचलता येतील तितकी त्याने उचलली. जेव्हा तो परत आला तेव्हा त्याने त्याचे तुकडे करून भांड्यात टाकले, परंतु ते काय आहे याची काहीच कल्पना कोणालाही नव्हती. 40शाकभाजी माणसांना वाढण्यात आली, पण जसे त्यांनी खाण्यास सुरुवात केली, ते खाताच ओरडू लागले, “परमेश्वराच्या मनुष्या, या भांड्यामध्ये मृत्यू आहे!” आणि ते भोजन करू शकले नाही.
41तेव्हा अलीशा म्हणाला, “थोडे पीठ आणा.” त्याने ते भांड्यात टाकले आणि म्हणाला, “हे लोकांना खाण्यास वाढा.” आणि भांड्यात काहीही अपायकारक राहिले नाही.
शंभरांना जेवू घालणे
42एके दिवशी बआल-शालीशाह येथून एका मनुष्याने आपल्या प्रथम पिकातील काही धान्य आणि जवाच्या वीस भाकरी एका पिशवीत घालून परमेश्वराच्या मनुष्याकडे आणल्या. तेव्हा तो म्हणाला, “लोकांना खाण्यास दे.”
43त्याच्या सेवकाने म्हटले, “शंभर लोकांपुढे हे भोजन कसे ठेऊ?”
परंतु अलीशाने उत्तर दिले, “हे लोकांना खाण्यास दे. कारण याहवेह असे म्हणतात: ‘ते खातील आणि काही शिल्लक राहील.’ ” 44मग त्याने ते त्यांच्यासमोर वाढले, आणि त्यांनी ते खाल्ले आणि याहवेहच्या वचनानुसार काही शिल्लक देखील उरले.

सध्या निवडलेले:

2 राजे 4: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन