YouVersion लोगो
सर्च आयकॉन

2 राजे 3

3
इस्राएलविरुद्ध मोआबाचे बंड
1यहूदीयाचा राजा यहोशाफाटच्या शासनकाळात अठराव्या वर्षी अहाबाचा पुत्र यहोराम हा शोमरोनात इस्राएलावर राज्य करू लागला. त्याने बारा वर्षे राज्य केले. 2याहवेहच्या दृष्टीत त्याने जे वाईट ते केले, परंतु त्याने आपल्या आई वडिलांसारखे केले नाही. त्याने त्याच्या पित्याने उभारलेला बआलचा मूर्तिस्तंभ पाडून टाकला. 3तरीपण, नेबाटाचा पुत्र यरोबोअमने इस्राएली लोकांना जे पाप करावयाला लावले, त्या पापास तो चिकटून राहिला; त्याने ती पापे सोडली नाही.
4मोआबाचा राजा मेशा हा मेंढरांचे कळप बाळगून होता आणि तो इस्राएली राजास कर म्हणून दरवर्षी एक लाख मेंढरे आणि एक लाख मेंढ्याची लोकर देत असे. 5परंतु अहाबाच्या मृत्यूनंतर मोआबाच्या राजाने इस्राएलविरुद्ध बंड पुकारले. 6तेव्हा यहोराम राजा शोमरोनातून बाहेर निघाला आणि सर्व इस्राएली लोकांना एकत्र केले. 7यहूदीयाचा राजा यहोशाफाटला हा निरोप पाठविला: “मोआबाच्या राजाने माझ्याविरुद्ध बंड पुकारले आहे. तेव्हा त्याच्याविरुद्ध लढण्यास माझ्यासोबत येशील काय?”
यहोशाफाटने उत्तर दिले, “मी तुझ्यासोबत येईन. जसा तू तसा मी, जे माझे लोक ते तुझे लोक, जे माझे घोडे ते तुझे घोडे.”
8यहोशाफाटने विचारले, “आपण कोणत्या मार्गाने हल्ला करावा?”
योरामाने उत्तर दिले, “एदोमाच्या वाळवंटाकडून.”
9त्याप्रमाणे इस्राएलाचा राजा, यहूदीयाचा राजा आणि एदोमाचा राजा यांच्यासोबत निघाला. सात दिवसाच्या फेरीनंतर, सैनिकांजवळ त्यांच्यासाठी आणि त्यांच्यासोबत असलेल्या प्राण्यांसाठी पाणी उरले नाही.
10“हे काय!” इस्राएलाचा राजा म्हणाला. “याहवेहने आम्हा तीन राजांना मोआबाच्या हातात देण्यासाठी एकत्र केले आहे का?”
11परंतु यहोशाफाटने विचारले, “याहवेहचा एखादा संदेष्टा इथे नाही काय, म्हणजे आपण याहवेहला विचारू शकू?”
तेव्हा इस्राएलाच्या राजाच्या अधिकार्‍याने उत्तर दिले, “शाफाटाचा पुत्र अलीशा इथे आहे. जो एलीयाहच्या हातावर पाणी घालत असे.#3:11 म्हणजे तो एलीयाचा वैयक्तिक सेवक होता.
12यहोशाफाटने म्हटले, “याहवेहचे वचन त्याच्यासोबत आहे.” मग इस्राएलाच्या राजा आणि यहोशाफाट व एदोम हे राजे त्याला भेटण्यास गेले.
13अलीशाने इस्राएलाच्या राजाला म्हटले, “तुम्ही माझ्याकडे का आला? तुम्ही तुमच्या वडिलांच्या संदेष्ट्याकडे जा आणि तुमच्या आईच्या संदेष्ट्याकडे जा.”
तेव्हा इस्राएलाच्या राजाने उत्तर दिले, “नाही! कारण याहवेहनेच आमचा पराभव मोआबाच्या राजाच्या हातून व्हावा म्हणून आम्हा तीन राजांना इकडे आणले आहे.”
14अलीशा म्हणाला, “जिवंत याहवेहची शपथ, ज्यांच्या सान्निध्यात मी उभा राहतो, जर मला यहूदीयाचा राजा यहोशाफाट याच्याबद्दल आदर नसता तर मी तुमच्याकडे लक्ष दिले नसते. 15परंतु आता एका वीणावादकाला मजकडे घेऊन या.”
हा वादक वीणा वाजवित असताना याहवेहचा हात अलीशावर आला 16आणि तो म्हणाला, “याहवेह असे म्हणतात: मी या दरीला पाण्याच्या तळ्यांनी भरून टाकीन. 17कारण याहवेह असे म्हणतात: तुम्हाला वारा किंवा पाऊस दिसणार नाही, तरीही ही दरी पाण्याने भरून जाईल आणि तुम्ही, तुमचे गुरे आणि इतर जनावरे ते पाणी पितील. 18हे तर याहवेहच्या दृष्टीने फार सोपे आहे, ते मोआबी लोकांना देखील तुमच्या हातात देतील. 19तुम्ही त्यांची सर्वोत्तम शहरे, तसेच तटबंदी असलेली शहरेही जिंकून घ्याल. प्रत्येक उत्तम झाड तुम्ही कापाल, सर्व झर्‍यांचे पाणी तुम्ही अडवाल आणि दगड पसरून त्यांच्या सुपीक जमिनीची नासाडीही कराल.”
20दुसर्‍या दिवशी सकाळी यज्ञार्पणाच्या वेळी—पाण्याचा लोंढा एदोमाच्या दिशेने वाहत आला व संपूर्ण भूमी पाण्याने भरून गेली.
21राजे त्यांच्याविरुद्ध युद्ध करण्यास येत आहेत हे मोआबातील लोकांना समजले, तेव्हा त्यांनी लगेच प्रत्येक तरुण व वयस्क पुरुषांनाही सैन्यात दाखल करून घेतले आणि सीमेवर आपली छावणी केली. 22जेव्हा ते मोठ्या पहाटेस उठले तेव्हा सूर्य पाण्यावर तळपत होता. ते पाणी मोआबी लोकांना दुरून रक्तासारखे दिसू लागले. 23ते म्हणाले, “हे रक्त आहे! त्या राजांनी एकमेकांसह युद्ध केले असेल आणि त्यांनी एकमेकांना ठार मारले असेल. तेव्हा आता, मोआब्यांनो चला, त्यांचे सर्वकाही लुटून आणू.”
24पण जेव्हा मोआबी लोक इस्राएलांच्या छावणीकडे आले न आले तोच इस्राएलचे सैन्य उठले आणि ते पळेपर्यंत त्यांच्याशी युद्ध केले आणि त्वेषाने तुटून पडले व त्यांचा संहार करू लागले; आणि मोआबाचे सैन्य इस्राएलांपासून पळू लागले. इस्राएलांनी त्यांच्या देशात प्रवेश केला आणि मोआबी लोकांची कत्तल करत गेले. 25त्यांनी मोआबाची शहरे उद्ध्वस्त केली. सर्व सुपीक जमिनीत एकएकाने दगडधोंड फेकून ती भरून टाकली. पाण्याच्या विहिरीतील झरे बुजविले आणि सर्व उत्तम झाडे तोडून टाकली. फक्त कीर-हरेसेथ येथील दगड राहू दिले, परंतु गोफणदारांनी त्याला घेरले आणि त्याच्यावर हल्ला केला.
26आपली सेना हरविली जात आहे हे मोआबाच्या राजाने पाहिले, तेव्हा त्याने अखेरचा प्रयत्न म्हणून आपल्या सातशे धनुर्धाऱ्यांसह शत्रूंची फळी फोडून एदोमाच्या राजाकडे निसटून जाण्याचा प्रयत्न केला; पण त्याचा हा प्रयत्न निष्फळ ठरला. 27म्हणून त्याने आपला ज्येष्ठपुत्र, जो त्याच्यानंतर राजा होणार होता, त्याला धरून ठार मारले व शहराच्या तटावरच त्याचे होमार्पण केले. ही घटना पाहून इस्राएली सैन्यास जबरदस्त धक्का बसला; किळस येऊन ते माघारी आपल्या देशाला परतले.

सध्या निवडलेले:

2 राजे 3: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन