2 इतिहास 7
7
मंदिराचे समर्पण
1शलोमोनाने जेव्हा प्रार्थना करण्याचे संपविले, तेव्हा आकाशातून अग्नी खाली आला आणि त्याने होमार्पणे आणि बलिदाने भस्मसात करून टाकली आणि याहवेहच्या गौरवाने मंदिर भरून गेले. 2याजकगण याहवेहच्या मंदिरात प्रवेश करू शकले नाहीत, कारण याहवेहच्या गौरवाने ते मंदिर भरून गेले होते. 3जेव्हा सर्व इस्राएली लोकांनी पाहिले की, अग्नी खाली उतरत आहे आणि याहवेहचे गौरव मंदिराच्या वर आहे तेव्हा त्यांनी पदपथावर गुडघे टेकून त्यांची मुखे जमिनीकडे केली आणि आराधना केली आणि याहवेहना असे म्हणत धन्यवाद दिला,
“ते चांगले आहेत;
त्यांची प्रीती सर्वकाळ टिकते.”
4नंतर राजा आणि सर्व लोकांनी याहवेहसमोर होमार्पणे केली. 5शलोमोन राजाने बावीस हजार गुरे, एक लाख वीस हजार मेंढरे व बोकडे अर्पण केली. याप्रकारे राजाने व सर्व लोकांनी परमेश्वराच्या मंदिराची प्रतिष्ठापना केली. 6याजकांनी आपआपले स्थान ग्रहण केले, दावीद राजाने याहवेहची स्तुती करण्यासाठी व “त्यांची प्रीती सर्वकाळ टिकून राहते” असे म्हणत आभार मानले होते, तेव्हा जशी संगीतवाद्यांची रचना केली होती आणि त्यांचा उपयोग केला होता, तशाच प्रकारे लेवी लोकांनीही स्थान ग्रहण केले. लेव्यांच्या समोरच्या बाजूला याजकगण त्यांचे रणशिंग वाजवित होते आणि सर्व इस्राएली लोक उभे होते.
7शलोमोनाने याहवेहच्या मंदिरापुढच्या द्वारमंडपाचा मधील भाग पवित्र केला, आणि तिथे त्याने होमार्पणे व शांत्यर्पणाचे मांदे ही अर्पण केली, कारण जी कास्याची वेदी त्याने बनविली होती त्यात होमार्पणे, धान्यार्पणे व मांदे मावत नव्हते.
8तेव्हा शलोमोन आणि सर्व इस्राएली लोकांनी त्याच्याबरोबर सात दिवस सण साजरा केला—एक मोठी मंडळी, म्हणजे लेबो हमाथपासून इजिप्तच्या खाडीपर्यंतचे राहिवासी आले होते. 9आठव्या दिवशी त्यांनी सभा भरविली, कारण त्यांनी सात दिवस वेदीवर समर्पण आणि आणखी सात दिवस उत्सव साजरा केला होता. 10सातव्या महिन्याच्या तेविसाव्या दिवशी त्याने लोकांना त्यांच्या घरी रवाना केले, याहवेहने दावीद आणि शलोमोन आणि त्यांच्या इस्राएली लोकांसाठी जी चांगली कृत्ये केली, त्यासाठी त्यांच्या अंतःकरणात हर्ष आणि आनंद होता.
शलमोनाला याहवेहचे दर्शन
11शलोमोनाने याहवेहचे मंदिर आणि राजमहालाचे काम संपविले आणि याहवेहच्या मंदिरात व आपल्या राजवाड्यात जे काही करावे असे त्याचे मनोरथ होते ते सर्व करण्यात तो यशस्वी झाला. 12रात्रीच्या वेळेस याहवेहने शलोमोनला दर्शन दिले आणि म्हणाले:
“मी तुझी प्रार्थना ऐकली आहे आणि मी स्वतःकरिता हे ठिकाण यज्ञांसाठी मंदिर म्हणून निवडले आहे.
13“जेव्हा मी पाऊस पडू नये म्हणून आकाश बंद करेन किंवा टोळांना भूमी फस्त करण्याची आज्ञा करेन किंवा माझ्या लोकांमध्ये महामारी पाठवेन, 14जर माझे लोक, ज्यांना माझ्या नावाने ओळखले जाते, ते जर स्वतःला नम्र करतील आणि प्रार्थना करतील, माझा शोध घेतील आणि त्यांच्या वाईट मार्गांपासून फिरतील, तेव्हा मी स्वर्गातून ऐकेन आणि त्यांच्या पापांची क्षमा करेन आणि त्यांच्या भूमीला आरोग्य देईन. 15आता मी माझ्या डोळ्यांनी पाहीन आणि माझे कान या ठिकाणी केल्या जाणाऱ्या प्रार्थनांकडे लागलेले असतील. 16मी या मंदिराची निवड करून ते पवित्र केले आहे, जेणेकरून माझे नाव सर्वकाळासाठी तिथे असेल. त्यावर माझी दृष्टी व माझे हृदय सदा राहील.
17“तुझ्या बाबतीत म्हणायचे तर, तू आपला पिता दावीदाप्रमाणे माझ्यासमोर विश्वासूपणे चालशील आणि सर्वकाही मी आज्ञापिल्याप्रमाणे करशील व माझे विधी व नियम पाळशील, 18तर इस्राएलवरचे तुझे राजासन मी सर्वकाळासाठी प्रस्थापित करेन, तुझा पिता दावीदाशी करार करीत म्हटले होते, ‘इस्राएलवर राज्य करण्यास तुझा वारस कधीही खुंटणार नाही.’
19“परंतु जर तुम्ही दूर वळले आणि मी तुला दिलेले विधी आणि आज्ञा पाळल्या नाही आणि जाऊन इतर दैवतांची सेवा करून त्यांची उपासना केली, 20तर मी माझ्या देशातून जो मी त्यांना दिलेला आहे, तिथून मी इस्राएली लोकांना उपटून टाकीन आणि या मंदिराचा, जे मी माझ्या नावासाठी पवित्र केले आहे त्याचा मी धिक्कार करेन. सर्व लोकांमध्ये मी ते थट्टा व निंदेचा विषय करेन. 21हे मंदिर ढेकळ्यांचा ढिगारा होईल. त्याच्या जवळून जाणारे सर्वजण आश्चर्यचकित होऊन म्हणतील, ‘याहवेहने या देशाचे व या मंदिराचे असे का केले आहे?’ 22तेव्हा लोक उत्तर देतील, ‘याहवेह, त्यांच्या पूर्वजांचे परमेश्वर ज्यांनी त्यांना इजिप्त देशातून बाहेर आणले त्या याहवेहला सोडून ते इतर दैवतांची उपासना व सेवा करू लागले आहेत; म्हणून त्यांनी त्यांच्यावर हे अरिष्ट आणले आहे.’ ”
सध्या निवडलेले:
2 इतिहास 7: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.