2 इतिहास 6
6
मंदिराचे समर्पण
1तेव्हा शलोमोन म्हणाला, “याहवेहने म्हटले आहे की ते घनदाट मेघात राहतील; 2मी आपणासाठी एक भव्य मंदिर बांधले आहे, की आपण त्यात सर्वकाळ वस्ती करावी.”
3इस्राएलची सर्व मंडळी तिथे उभी असताना राजाने मागे वळून त्यांना आशीर्वाद दिला. 4मग राजा म्हणाला:
“याहवेह इस्राएलचे परमेश्वर धन्यवादित असोत, कारण त्यांनी माझे वडील दावीदाला आपल्या मुखाने दिलेले वचन आज स्वहस्ते पूर्ण केले आहे. कारण याहवेहने म्हटले होते की, 5‘मी माझ्या लोकांना इजिप्तमधून बाहेर आणले, त्या दिवसापासून इस्राएलातील कोणत्याही गोत्राचे शहर माझ्या नावाने मंदिर तिथे बांधावे म्हणून मी निवडले नाही, ज्यामुळे माझे नाव तिथे असावे किंवा माझ्या इस्राएली लोकांवर राज्य करण्यासाठी मी कोणालाही राज्यकर्ता म्हणून निवडले नाही. 6परंतु आता येथे माझे नाव असावे म्हणून मी यरुशलेमला निवडले आहे आणि माझ्या इस्राएल लोकांवर राज्य करण्यासाठी मी दावीदाची निवड केली आहे.’
7“याहवेह इस्राएलच्या परमेश्वराच्या नावासाठी मंदिर बांधावे असे माझे वडील दावीद यांच्या मनात होते. 8पण याहवेहने माझे पिता दावीदाला म्हटले, ‘माझ्या नावासाठी मंदिर बांधावे अशी आपल्या हृदयात इच्छा बाळगून तू फार चांगले केले. 9तथापि, तू ते मंदिर बांधणार नाहीस, तर तुझा पुत्र, तुझ्या स्वतःच्या हाडामांसाचा; तोच माझ्या नावासाठी मंदिर बांधील.’
10“याहवेहने दिलेले वचन पूर्ण केले आहे: माझे वडील दावीदाचा मी वारस झालो आणि याहवेहने अभिवचन दिल्याप्रमाणे आता इस्राएलच्या राजासनावर मी बसतो आणि याहवेह इस्राएलचे परमेश्वर यांच्यासाठी मी हे मंदिर बांधले आहे. 11तिथे कोशासाठी मी एक स्थान तयार केले आहे, ज्यात इस्राएली लोकांबरोबर याहवेहने केलेला करार आहे.”
शलमोनाची समर्पणाची प्रार्थना
12नंतर इस्राएलच्या सर्व मंडळीदेखत शलोमोन याहवेहच्या वेदीसमोर उभा राहिला, आणि त्याने आपले हात पसरले 13शलोमोनाने आता पाच हात लांब आणि पाच हात रुंद आणि तीन हात उंच#6:13 अंदाजे 2.3 मीटर लांब आणि रुंद आणि 1.4 मीटर उंच असा एक कास्याचा मंच तयार केला होता आणि तो बाहेरील अंगणाच्या मध्यभागी ठेवण्यात आलेला होता. तो त्या मंचावर उभा राहिला आणि त्याने इस्राएलच्या सर्व मंडळीदेखत गुडघे टेकले आणि स्वर्गाकडे आपले हात पसरले. 14तो म्हणाला:
“याहवेह, इस्राएलच्या परमेश्वरा, स्वर्गात किंवा पृथ्वीवर तुमच्यासारखा परमेश्वर नाही; जे आपले सेवक सर्व हृदयाने आपल्या मार्गात चालतात त्यांच्याशी आपण आपल्या प्रीतीच्या कराराची पूर्तता करतात. 15आपला सेवक, माझे पिता दावीदाला दिलेले अभिवचन आपण पाळले आहे; आपण आपल्या मुखाने अभिवचन दिले आणि स्वहस्ते ते आज पूर्ण केले आहे.
16“आता हे याहवेह, इस्राएलच्या परमेश्वरा, आपला सेवक माझे पिता दावीदाला आपण जे वचन दिले होते ते पाळावे. आपण म्हटले होते, ‘जसा तू होतास तसेच तुझे वंशज माझ्यासमोर माझ्या नियमानुसार चालण्यास सावधान राहतील, तर इस्राएलच्या राजासनावर बसण्यास तुझे वारस कधीही कमी पडणार नाही.’ 17तर आता, याहवेह हे इस्राएलच्या परमेश्वरा, आपला सेवक, माझे पिता दावीदाला जे अभिवचन आपण दिले होते ते प्रतितीस येऊ द्यावे.
18“पण परमेश्वर खचितच मानवजातीबरोबर पृथ्वीवर राहतील काय? स्वर्ग, अगदी सर्वोच्च स्वर्गात सुद्धा आपण मावणार नाहीत! मग हे जे मंदिर मी बांधले आहे त्यात आपण कसे मावाल? 19तरीही हे याहवेह, माझ्या परमेश्वरा, आपल्या सेवकाच्या प्रार्थनेकडे व त्याच्या दयेच्या याचनेकडे लक्ष द्यावे. आपला सेवक आपल्याकडे प्रार्थना व धावा करीत आहे त्याकडे कान द्या. 20आपण आपले नाव देणार असे ज्या स्थळाविषयी आपण म्हटले होते, त्या या मंदिराकडे दिवस व रात्र आपली दृष्टी असो; यासाठी की या ठिकाणातून करत असलेली तुमच्या सेवकाची प्रार्थना आपण ऐकावी. 21आपला सेवक व आपले इस्राएली लोक जेव्हा या ठिकाणातून विनंत्या करतील, तेव्हा त्यांच्या प्रार्थना ऐका. स्वर्गातून, आपल्या निवासस्थानातून कान द्या व ती ऐकून त्यांना क्षमा करा.
22“जेव्हा कोणी आपल्या शेजार्याचा अपराध करेल व त्यांना शपथ घ्यावी लागली आणि ते आपल्या वेदीसमोर या मंदिरात शपथ घेतील, 23तेव्हा स्वर्गातून ऐकून त्याप्रमाणे घडू द्या. आपल्या सेवकांचा न्याय करून दोषी व्यक्तीने केलेल्या कृत्यांनुसार त्यांचे शिर खाली झुकवा व निर्दोष्यास त्यांच्या निर्दोषतेनुसार वागणूक देऊन त्यांना न्याय द्यावा.
24“तुमच्याविरुद्ध पाप केल्यामुळे जेव्हा तुमचे इस्राएली लोक त्यांच्या शत्रूद्वारे पराभूत केले जातील आणि जेव्हा ते तुमच्याकडे पुन्हा वळतील व आपल्या नावाची थोरवी गाऊन या मंदिरात तुमच्यापुढे प्रार्थना व विनंती करतील, 25तेव्हा स्वर्गातून ऐकून तुमच्या इस्राएली लोकांच्या पापांची क्षमा करा व जो देश तुम्ही त्यांना व त्यांच्या पूर्वजांना दिला त्यात त्यांना परत आणावे.
26“तुमच्या लोकांनी तुमच्याविरुद्ध केलेल्या पापामुळे जेव्हा आकाश बंद होऊन पाऊस पडणार नाही, आणि जेव्हा ते या ठिकाणातून प्रार्थना करतील, आणि तुमच्या नावाची थोरवी गातील आणि आपण त्यांच्यावर आणलेल्या क्लेशामुळे ते आपल्या पापापासून वळतील, 27तेव्हा त्यांची विनंती ऐकून तुमचे सेवक, इस्राएली लोकांच्या पापांची क्षमा करा. जीवनाचा योग्य मार्ग त्यांना शिकवा, व जो देश तुम्ही तुमच्या लोकांना वतन म्हणून दिला त्यावर पाऊस पाठवावा.
28“जेव्हा देशावर दुष्काळ, किंवा पीडा येते, किंवा पिके करपवून टाकणारा वारा किंवा भेरड, टोळ किंवा नाकतोडे आले किंवा शत्रूंनी त्यांच्या एखाद्या शहराला वेढा घातला, असे कोणतेही अरिष्ट किंवा रोग आला, 29आणि तुमच्या इस्राएली लोकांपैकी कोणी त्यांच्या हृदयाला होत असलेले क्लेश आणि वेदना जाणून प्रार्थना किंवा विनंती करतील आणि त्यांचे हात मंदिराकडे पसरतील; 30तेव्हा स्वर्ग जे तुमचे निवासस्थान आहे तिथून ऐकून त्यांना क्षमा करा व त्यानुसार घडवून आणा; प्रत्येकाच्या सर्व कृत्यांनुसार त्यांच्याशी वागा, कारण तुम्हाला त्यांच्या हृदयाची पारख आहे (कारण केवळ तुम्हीच मानवाचे हृदय जाणणारे आहात), 31यासाठी की जो देश तुम्ही आमच्या पूर्वजांना दिला त्यात जितका काळ ते राहतील, त्यांनी तुमचे भय बाळगावे व तुमच्या आज्ञेत राहावे.
32“असा कोणी परदेशी, जो आपल्या इस्राएली लोकांमधील नाही, परंतु तुमचे महान नाव आणि तुमची पराक्रमी भुजा आणि तुमचा लांबवलेला बाहू यामुळे तिथे दूरवरील देशातून आले व त्यांनी मंदिराकडे वळून प्रार्थना केली, 33तेव्हा स्वर्ग जे तुमचे निवासस्थान आहे, तिथून तुम्ही त्यांची प्रार्थना ऐकावी. त्या परदेशीयाने जे काही तुमच्याकडे मागितले ते आपण त्यांना द्यावे, अशासाठी की पृथ्वीवरील लोकांनी तुमचे नाव ओळखावे व तुमच्या इस्राएली लोकांप्रमाणे तुमचे भय धरावे, व जाणावे की मी बांधलेल्या या घरावर तुमचे नाव आहे.
34“जेव्हा तुमचे लोक तुम्ही जिथे पाठवाल तिथे त्यांच्या शत्रूविरुद्ध युद्धास जातात आणि जेव्हा ते तुम्ही निवडलेल्या नगराकडे आणि तुमच्या नावासाठी मी बांधलेल्या मंदिराकडे तुमची प्रार्थना करतात, 35तेव्हा स्वर्गातून त्यांची प्रार्थना व विनंती ऐकून त्यांच्यावतीने न्याय करावा.
36“जेव्हा ते तुमच्याविरुद्ध पाप करतील; कारण पाप करीत नाही असा कोणीही मनुष्य नाही आणि त्यामुळे रागावून तुम्ही त्यांना त्यांच्या शत्रूच्या हाती दिले, आणि त्यांनी त्यांना गुलाम म्हणून जवळच्या किंवा दूरच्या देशात कैद करून नेले; 37आणि ते कैदेत असता त्यांच्या हृदयाचा पालट झाला व पश्चात्ताप करीत कैद करून नेलेल्या देशात तुमच्याकडे असे म्हणत विनंती केली, ‘आम्ही पाप केले आहे, आम्ही विपरीत वागलो आहोत आणि आम्ही दुष्टतेने वागलो आहोत,’ 38आणि त्यांना कैद करून नेलेल्या देशात ते जर त्यांच्या संपूर्ण हृदयाने व जिवाने तुमच्याकडे वळले आणि त्यांच्या पूर्वजांना दिलेल्या देशाकडे, जे शहर तुम्ही निवडले आणि मी तुमच्या नावासाठी बांधलेल्या या मंदिराकडे वळून प्रार्थना करतील, 39तेव्हा स्वर्ग जे तुमचे निवासस्थान आहे तिथून त्यांची प्रार्थना व विनंत्या ऐकून त्यांच्यावतीने न्याय करावा. आणि ज्या तुमच्या लोकांनी तुमच्याविरुद्ध पाप केले आहे त्यांना क्षमा करा.
40“माझ्या परमेश्वरा, आता तुमचे डोळे उघडे असावेत आणि तुमचे कान या ठिकाणी केल्या जाणार्या प्रार्थनांकडे लागावे.
41“याहवेह परमेश्वरा उठा आणि तुम्ही तुमच्या सामर्थ्याच्या कोशासह,
तुमच्या विश्रामस्थानी या.
याहवेह परमेश्वरा, तुमचे याजक तारणाचे वस्त्र परिधान करतील,
तुमचे विश्वासू लोक तुमच्या चांगुलपणामध्ये आनंद करतील.
42हे याहवेह परमेश्वरा, तुमच्या अभिषिक्ताचा अव्हेर करू नका.
तुमचा सेवक दावीदाला दिलेल्या महान प्रीतीच्या अभिवचनाची आठवण ठेवा.”
सध्या निवडलेले:
2 इतिहास 6: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.