2 इतिहास 8
8
शलमोनाची इतर कार्ये
1शेवटच्या वीस वर्षात शलोमोनने याहवेहचे मंदिर आणि आपला राजमहाल या दोन इमारतींचे बांधकाम केले. 2शलोमोनाने त्याला हीरामकडून#8:2 किंवा हुराम मिळालेली नगरे पुन्हा बांधली आणि त्यामध्ये इस्राएली लोकांची वस्ती केली. 3नंतर शलोमोन हमाथ-सोबाहकडे गेला आणि ते ताब्यात घेतले 4त्याने तदमोर शहरसुद्धा वाळवंटात बांधले आणि भांडारे असलेली सर्व नगरे त्याने हमाथ येथे बांधली. 5त्याने वरचे बेथ-होरोन आणि खालचे बेथ-होरोन ही तटबंदीची शहरे, मोठ्या भिंती आणि प्रवेशद्वारांची धातूंचे गज बसवून पुनर्बांधणी केली, 6त्याचप्रमाणे बालाथ आणि शलोमोनच्या भांडारांची सर्व शहरे त्याचप्रमाणे त्याचे रथ व त्याचे घोडे यांच्यासाठी सर्व शहरे बांधली; यरुशलेमात, लबानोनात आणि ज्या सर्व राज्यांत त्याचे राज्य होते त्या हद्दींमध्ये त्याच्या मनास येईल ते त्याने बांधले.
7हिथी, अमोरी, परिज्जी, हिव्वी आणि यबूसी (हे लोक इस्राएली नव्हते) यांच्यातील आणखी काही लोक बाकी राहिले होते. 8या लोकांचे वंशज जे देशात उरले होते त्यांचीही शलोमोनने सक्तीने गुलाम म्हणून भरती केली; हे ते लोक होते ज्यांना इस्राएल लोकांनी पूर्णपणे नष्ट केले नव्हते, आजवर हे तसेच आहे. 9परंतु इस्राएली लोकांपैकी कोणालाही शलोमोनने आपल्या कामासाठी गुलाम म्हणून लादले नाही; ते त्याचे योद्धे, सेनापती व त्याच्या रथांचे व रथस्वारांचे अधिकारी होते. 10शलोमोन राजाचे ते मुख्य अधिकारीसुद्धा होते, माणसांवर देखरेख ठेवणारे दोनशे पन्नास अधिकारी होते.
11शलोमोनाने फारोच्या मुलीला दावीदाच्या नगरातून तिच्यासाठी बांधलेल्या राजवाड्यात आणले कारण तो म्हणाला, “माझ्या पत्नीने इस्राएलचा राजा दावीदच्या राजवाड्यात राहू नये, कारण ज्या स्थानी याहवेहच्या कोशाचा प्रवेश झाला आहे, ते पवित्र आहे.”
12याहवेहची जी वेदी त्याने द्वारमंडपासमोर बांधली होती, तिथे शलोमोनाने याहवेहसाठी होमार्पणाचे बलिदान केले, 13शब्बाथ, अमावस्या आणि वर्षातून तीन वेळा सण यासाठी मोशेने दिलेल्या आज्ञेप्रमाणे अर्पणे करण्यासाठी रोजच्या गरजेनुसार शलोमोनाने त्यावर याहवेहसाठी होमार्पणाचे बलिदान केले—बेखमीर भाकरीचा सण, आठवड्यांचा सण आणि मंडपांचा सण असे ते तीन सण. 14त्याचा पिता दावीदच्या आदेशानुसार, याजकांची जबाबदारी पार पाडण्यासाठी याजक, आराधनेत नेतृत्व करण्यासाठी व याजकांना दररोजच्या कामात मदत करण्यासाठी लेव्यांचे गट बनविले. परमेश्वराचा मनुष्य दावीदच्या आदेशानुसार विभागून आलेल्या भागातून त्याने वेगवेगळ्या फाटकांसाठी द्वार रक्षकांचीसुद्धा नेमणूक केली. 15राजाने याजकांना किंवा लेवीय यांना दिलेल्या कोणत्याही आज्ञेपासून तसेच भंडाराच्या अंतर्भूत विषयामधील आज्ञेपासून ते विचलित झाले नाहीत.
16ज्या दिवसापासून याहवेहच्या मंदिराची पायाभरणी केली गेली, त्या दिवसापासून ते होईपर्यंत शलोमोनचे सर्व कार्य पूर्ण झाले. याहवेहचे मंदिरही पूर्ण झाले.
17नंतर शलोमोन एदोम या बंदरावर असलेल्या एजिओन-गेबेर आणि एलोथ येथे गेला. 18आणि हीरामाने त्याला आपल्या माणसांबरोबर म्हणजेच त्याच्या अनुभवी खलाश्यांनी चालविलेली जहाजे पाठविली. त्यांनी शलोमोनच्या माणसांबरोबर ओफीरपर्यंत प्रवास करून चारशे पन्नास तालांत सोने परत आणले व ते शलोमोन राजाला दिले.#8:18 अंदाजे 15 मेट्रिक टन
सध्या निवडलेले:
2 इतिहास 8: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.