2 इतिहास 9
9
शेबाच्या राणीची भेट
1जेव्हा शबाच्या राणीने शलोमोनच्या किर्तीविषयी ऐकले, तेव्हा कठीण प्रश्न करून शलोमोनची परीक्षा करावी म्हणून ती यरुशलेमास आली. मोठा तांडा घेऊन; उंटांबरोबर सुगंधी द्रव्ये, पुष्कळ सोने आणि मौल्यवान रत्ने घेऊन ती यरुशलेमास आली; शलोमोनकडे येऊन जे काही तिच्या मनात होते त्याविषयी ती त्याच्याशी बोलली. 2शलोमोनने तिच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली; तिला स्पष्ट करू शकणार नाही असे काहीही त्याच्यासाठी कठीण नव्हते. 3जेव्हा शबाच्या राणीने शलोमोनचे ज्ञान व त्याने बांधलेला राजवाडा पाहिला, 4त्याच्या मेजावरील भोजन, त्याच्या अधिकार्यांची आसने, सेवा करणारे सेवक व त्यांचे अंगरखे, प्यालेदार व याहवेहच्या मंदिरात त्याने केलेली होमार्पणे हे सर्व पाहून ती चकित झाली.
5ती राजाला म्हणाली, “तुमचे ज्ञान व तुमची प्राप्ती याविषयी माझ्या देशात मी जो अहवाल ऐकला तो सत्य आहे. 6परंतु त्यांनी मला जे सांगितले त्यावर मी येथे येऊन या गोष्टी आपल्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहीपर्यंत विश्वास केला नाही. खचितच तुमचे ज्ञान व संपत्ती याबद्दल मला जे सांगितले गेले ते अर्धे देखील नाही; त्यापेक्षा ते कितीतरी अधिक आहे. 7आपले लोक किती सुखी असतील! तुमचे अधिकारी जे तुमच्यासमोर नित्याने उभे राहतात व तुमचे ज्ञान ऐकतात ते किती सुखी असतील! 8याहवेह तुमचे परमेश्वर धन्य असो, ज्यांना तुमच्या ठायी संतोष वाटला व तुम्हाला याहवेह तुमचे परमेश्वरासाठी राजा म्हणून आपल्या राजासनावर अधिकार करण्यास ठेवले. कारण तुमच्या परमेश्वराचे इस्राएलवर असलेले प्रेम आणि त्यांना सर्वकाळ पाठिंबा द्यावा अशी त्यांची इच्छा, यासाठी त्यांनी तुम्हाला त्यांच्यावर राजा केले, यासाठी की न्याय आणि धार्मिकता टिकवून धरावी.”
9नंतर तिने राजाला एकशेवीस तालांत सोने,#9:9 अंदाजे 4 मेट्रिक टन पुष्कळ सुगंधी द्रव्ये व मौल्यवान रत्ने दिली. शबाच्या राणीने शलोमोन राजाला जी सुगंधी द्रव्ये आणली त्यासारखी त्यानंतर परत कधी नव्हती.
10(हीरामच्या सेवकांनी आणि शलोमोनच्या सेवकांनी ओफीर येथून सोने आणले; त्यांनी चंदन#9:10 चंदन मूळ भाषेत अलमद आणि मोलवान रत्ने ही सुद्धा आणली. 11शलोमोनने याहवेहच्या मंदिरात व राजवाड्यात पायर्या बनवण्यासाठी व वादकांसाठी वीणा व सतारी बनविण्यास चंदनाच्या लाकडाचा उपयोग केला. यहूदीयामध्ये त्यासारखे कधीही पाहण्यात आले नव्हते.)
12शबाच्या राणीने शलोमोन राजाकडून ज्या गोष्टींची इच्छा केली व जे काही तिने मागितले ते सर्व राजाने तिला दिल्या, तिने त्याच्यासाठी जितके आणले होते, त्यापेक्षा जास्त त्याने तिला दिले. मग ती तिच्या सेवकांसह आपल्या देशास परत गेली.
शलोमोनचे ऐश्वर्य
13शलोमोनला मिळत जाणारे वार्षिक सोने सहाशे सहासष्ट तालांत#9:13 अंदाजे 23 मेट्रिक टन होते, 14व्यापारी आणि सावकार यांच्यापासून येणारा महसूलचा यात समावेश नाही. तसेच अरब देशाचे सर्व राजे आणि शासनाच्या अंतर्गत प्रदेशाचे राज्यपाल शलोमोनासाठी सोने आणि चांदी आणत होते.
15शलोमोन राजाने ठोकलेल्या सोन्याच्या दोनशे फार मोठ्या ढाली बनविल्या. प्रत्येक ढालीस सहाशे शेकेल#9:15 अंदाजे 6.9 कि.ग्रॅ. ठोकलेले सोने लागले होते. 16तसेच त्याने ठोकलेल्या सोन्याच्या तीनशे लहान ढाली केल्या. प्रत्येक ढालीस तीनशे शेकेल#9:16 अंदाजे 3.5 कि.ग्रॅ. सोने लागले. राजाने त्या लबानोनच्या जंगलातील राजवाड्यात ठेवल्या.
17नंतर राजाने हस्तिदंताने सजविलेले एक भव्य सिंहासन तयार करून त्याला शुद्ध सोन्याचे आवरण दिले. 18त्या सिंहासनाला सहा पायऱ्या होत्या आणि त्याला जोडूनच पाय ठेवण्यासाठी सोन्याचे पायदान होते. आसनाच्या दोन्ही बाजूंना हात होते आणि दोन्ही हातांच्या बाजूंना दोन सिंह उभे केले होते. 19प्रत्येक पायरीवर दोन याप्रमाणे बारा सिंह केलेले होते. याप्रकारचे सिंहासन आणखी इतर राज्यांमध्ये कुठेही नव्हते. 20शलोमोनचे सर्व प्याले सोन्याचे होते. लबानोनच्या वाळवंटातील राजवाड्यात असलेली सर्व पात्रे सुद्धा शुद्ध सोन्याची होती. चांदीचे काहीही बनविले नव्हते, कारण शलोमोनच्या काळात चांदीचे मोल कमी मानले जात असे. 21हीरामच्या सेवकांद्वारे चालविलेल्या गलबतांबरोबर शलोमोन राजाचाही व्यापारी गलबतांचा तांडा होता. तीन वर्षातून एकदा ही गलबते सोने, चांदी, हस्तिदंत, वानरे आणि मोर घेऊन परत येत असत.
22संपत्ती व ज्ञानाने शलोमोन राजा पृथ्वीवरील सर्व राजांपेक्षा अधिक महान होता. 23परमेश्वराने शलोमोनच्या ठायी दिलेले ज्ञान ऐकण्यास जगातील सर्व राजे येत असत. 24आणि जे लोक येत असत ते वर्षानुवर्षे चांदी व सोन्याच्या वस्तू, झगे, शस्त्रे व सुगंधी द्रव्ये व घोडे व खेचरे भेटी म्हणून आणत असत.
25शलोमोनाकडे घोड्यांसाठी आणि रथांसाठी चार हजार तबेले होते आणि बारा हजार घोडे होते, जे त्याने रथाच्या नगरांमध्ये आणि यरुशलेममध्ये राजाने स्वतःजवळ ठेवले होते. 26फरात#9:26 फरात किंवा ज्याला आजच्या काळात युफ्रेटिस या नावाने ओळखले जाते नदीपासून ते पलिष्टी लोकांच्या देशापर्यंत आणि इजिप्तच्या सीमेपर्यंत असलेल्या सर्व राजांवर त्याने राज्य केले. 27राजाने यरुशलेमात चांदीला धोंड्याप्रमाणे व गंधसरू डोंगर तळवटीतील उंबराच्या झाडांप्रमाणे सर्वसाधारण असे केले. 28शलोमोनच्या घोड्यांची आयात इजिप्त आणि इतर सर्व देशातून केलेली होती.
शलोमोनाचा मृत्यू
29शलोमोनच्या राज्यकाळातील इतर घटनांबद्दल, सुरुवातीपासून शेवटपर्यंत, ते नाथान संदेष्ट्याच्या नोंदीमध्ये, शिलोनी अहीयाहच्या भविष्यवाणीमध्ये आणि नेबाटाचा पुत्र यरोबोअमविषयी इद्दो संदेष्ट्याच्या दृष्टान्तात लिहिलेल्या नाहीत का? 30शलोमोनने यरुशलेमात संपूर्ण इस्राएलवर चाळीस वर्षे राज्य केले. 31नंतर शलोमोन त्याच्या पूर्वजांबरोबर विसावा पावला व त्याला त्याचा पिता दावीदाच्या नगरात पुरले गेले. आणि त्याचा वारस रेहोबोअम राजा झाला.
सध्या निवडलेले:
2 इतिहास 9: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.