YouVersion लोगो
सर्च आयकॉन

2 इतिहास 15

15
आसाच्या सुधारणा
1नंतर परमेश्वराचा आत्मा ओदेदाचा पुत्र अजर्‍याहवर आला. 2तो आसाला भेटण्यासाठी गेला आणि त्याला म्हणाला, “आसा आणि सर्व यहूदाह व बिन्यामीन माझे ऐका, याहवेह तुमच्याबरोबर आहेत, जेव्हा तुम्ही त्यांच्याबरोबर राहाल. जर तुम्ही त्यांचा शोध घ्याल, तर ते तुम्हाला सापडतील, परंतु जर तुम्ही त्यांना सोडाल, तर ते तुम्हाला सोडतील. 3आता पुष्कळ काळपर्यंत इस्राएलमध्ये खरे परमेश्वर नव्हते, शिकविण्यासाठी याजक आणि नियम नव्हते. 4तरीपण संकटसमयी ते इस्राएलचे परमेश्वर याहवेहकडे वळले व त्यांनी त्यांचा शोध केला, तेव्हा त्यांनी त्यांची मदत केली. 5त्या दिवसांमध्ये प्रवास करणे सुरक्षित नव्हते, कारण तेथील सर्व रहिवाशांमध्ये मोठा गोंधळ माजला होता. 6एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्राकडून आणि एक शहर दुसऱ्या शहराकडून चिरडले जात होते, कारण परमेश्वर त्यांना सर्वप्रकारच्या संकटांनी त्रास देत होते. 7परंतु तुम्ही तर खंबीर व्हा आणि हार मानू नका, कारण तुम्हाला तुमच्या कामाचे प्रतिफळ मिळेल.”
8जेव्हा आसाने हे शब्द आणि ओदेद संदेष्ट्याचा पुत्र अजऱ्याहची भविष्यवाणी ऐकली तेव्हा त्याला धीर आला. त्याने यहूदाह आणि बिन्यामीनच्या संपूर्ण देशातील आणि त्याने ताब्यात घेतलेल्या एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशातील गावांमधील अमंगळ मूर्ती काढून टाकल्या. त्याने याहवेहच्या मंदिराच्या प्रवेशमंडपासमोर याहवेहची जी वेदी होती, तिची दुरुस्ती केली.
9नंतर त्याने सर्व यहूदीया आणि बिन्यामीन आणि एफ्राईम, मनश्शेह आणि शिमओन येथील लोकांना जमविले, जे त्यांच्यामध्ये स्थायिक झाले होते, कारण त्याचे परमेश्वर याहवेह त्याच्याबरोबर आहेत हे पाहून इस्राएलमधून मोठ्या संख्येने लोक त्याच्याकडे आले होते.
10ते आसाच्या कारकिर्दीच्या पंधराव्या वर्षी तिसऱ्या महिन्यात यरुशलेम येथे जमले. 11त्यावेळेस त्यांनी परत आणलेल्या लुटीतून याहवेहसाठी सातशे गुरे आणि सात हजार मेंढ्या व शेळ्यांचे बलिदान केले. 12त्यांनी त्यांच्या संपूर्ण अंतःकरणाने आणि जिवाने त्यांच्या पूर्वजांचे परमेश्वर याहवेह यांचा शोध घ्यावा, असा करार केला. 13जे इस्राएलचे परमेश्वर याहवेह यांचा शोध घेणार नाहीत, त्या सर्वांना, लहान किंवा मोठे, पुरुष किंवा स्त्रीस जिवे मारण्यात येईल. 14त्यांनी मोठ्याने गर्जना करून, कर्णे व शिंगे वाजवून याहवेहची शपथ घेतली. 15यहूदीया येथील सर्व लोकांनी या शपथेबद्दल आनंद केला, कारण त्यांनी संपूर्ण अंतःकरणापासून ती शपथ घेतली होती. त्यांनी उत्सुकतेने परमेश्वराचा शोध घेतला आणि ते त्यांना सापडले. त्यामुळे याहवेहनी त्यांना सर्व बाजूंनी विश्रांती दिली.
16आसा राजाने आपली आजी माकाह हिला राजमातेच्या पदावरून काढून टाकले, कारण तिने तिरस्करणीय अशी अशेराची उपासना करण्यासाठी एक मूर्ती घडविली होती. आसाने ती तोडून फोडली व किद्रोनच्या खोऱ्याजवळ जाळून टाकली. 17जरी त्याने इस्राएलातील पूजास्थाने मोडून टाकली नाही, तरीही आसाचे हृदय त्याच्या जीवनभरात याहवेहशी समर्पित होते. 18त्याने व त्याच्या पित्याने समर्पित केलेले चांदी व सोन्याचे सामान त्याने परमेश्वराच्या मंदिरात आणले.
19आसा राजाच्या कारकिर्दीच्या पस्तिसाव्या वर्षापर्यंत लढाई झाली नाही.

सध्या निवडलेले:

2 इतिहास 15: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन