YouVersion लोगो
सर्च आयकॉन

2 इतिहास 16

16
आसाची अखेरची वर्षे
1आसाच्या कारकिर्दीच्या छत्तिसाव्या वर्षी यहूदीयाचा राजा आसा याच्या सीमेतून कोणी बाहेर जाऊ नये किंवा आत येऊ नये म्हणून इस्राएलचा राजा बाशा याने यहूदीयावर स्वारी केली आणि रामाह शहराची तटे बांधली.
2त्यानंतर आसाने याहवेहच्या मंदिरातील आणि त्याच्या राजवाड्यातील खजिन्यातून चांदी व सोने काढून घेतले व ते दिमिष्कात राज्य करणारा बेन-हदाद अरामच्या राजाकडे पाठवले. 3आणि म्हटले, “माझ्या व तुझ्या वडिलांमध्ये होता तसा तुझ्या व माझ्यात एक करार असावा. पाहा, मी तुला चांदी व सोने पाठवित आहे. तर आता इस्राएलचा राजा बाशा याच्याशी असलेला तुझा करार मोड म्हणजे तो माझ्यापासून निघून जाईल.”
4बेन-हदाद आसा राजाशी सहमत झाला व आपल्या सैन्याच्या सेनापतींना इस्राएलच्या नगरांवर हल्ला करण्यास पाठवले. त्यांनी इय्योन, दान, आबेल-माईम#16:4 किंवा बेथ-माकाह आणि नफतालीचे सर्व भांडारशहरे ही जिंकून घेतली. 5बाशाने जेव्हा हे ऐकले तेव्हा रामाह बांधण्याचे थांबविले आणि ते अर्धवट टाकून दिले. 6नंतर आसा राजाने यहूदीयातील सर्व पुरुषांना आणले आणि जे दगड आणि लाकूड बाशा वापरत होता, ते त्यांनी रामाह येथून नेऊन त्यांच्यापासून त्याने गेबा आणि मिस्पाह हे बांधले.
7त्याचवेळेस हनानी हा संदेष्टा यहूदीयाचा राजा आसा याच्याकडे आला आणि त्याला म्हणाला, “तुम्ही अरामच्या राजावर भरवसा ठेवला आणि तुमचे परमेश्वर याहवेह यांच्यावर ठेवला नाही, या कारणाने अरामच्या राजाचे सैन्य तुमच्या हातून निसटले आहे. 8कूशी लोक आणि लिबियाचे लोक हे मोठ्या संख्येने रथ आणि घोडेस्वार असलेले बलाढ्य सैन्य नव्हते का? तरीसुद्धा जेव्हा तुम्ही याहवेहवर भरवसा ठेवला, तेव्हा त्यांनी त्यांना तुमच्या हाती दिले. 9कारण ज्यांची अंतःकरणे याहवेह यांच्याबरोबर पूर्णपणे वचनबद्ध आहेत, त्यांना बळ देण्यासाठी त्यांची दृष्टी संपूर्ण पृथ्वीवर व्याप्त आहे. तुम्ही मूर्खपणा केला आहे आणि आतापासून तुम्ही युद्धात असाल.”
10यामुळे आसा संदेष्ट्यावर रागावला; तो इतका संतापला की त्याने त्याला तुरुंगात टाकले. त्याचवेळेस आसाने काही लोकांवर क्रूरपणे अत्याचार केले.
11आसाच्या कारकिर्दीच्या घटना, सुरुवातीपासून शेवटपर्यंत, यहूदीया आणि इस्राएलच्या राजांच्या पुस्तकात नमूद केल्या आहेत. 12त्याच्या कारकिर्दीच्या एकोणचाळिसाव्या वर्षी आसा पायाच्या आजाराने त्रस्त झाला. त्याचा आजार गंभीर स्वरुपाचा होता, तरी त्या आजारपणातही त्याने याहवेहकडून मदत घेतली नाही, परंतु फक्त वैद्यांचीच मदत घेतली. 13नंतर आसा त्याच्या कारकिर्दीच्या एकेचाळीसाव्या वर्षी मरण पावला आणि त्याच्या पूर्वजांबरोबर विसावा पावला. 14त्यांनी त्याला दावीदाच्या नगरात, त्याने स्वतःसाठी तयार केलेल्या कबरेत पुरले. त्यांनी त्याला मसाले आणि विविध मिश्रित अत्तरांनी झाकलेल्या शवपेटीत ठेवले आणि त्याच्या सन्मानार्थ प्रचंड अग्नी पेटविला.

सध्या निवडलेले:

2 इतिहास 16: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन