YouVersion लोगो
सर्च आयकॉन

2 इतिहास 14

14
1मग अबीयाह त्याच्या पूर्वजांबरोबर विसावा पावला आणि त्याला दावीदाच्या नगरात पुरले गेले. आणि त्याचा पुत्र आसा त्याचा वारस म्हणून राजा झाला. त्याच्या कारकिर्दीच्या दहा वर्षे राज्यात शांतता होती.
यहूदीयाचा राजा आसा
2आसाने याहवेह त्याच्या परमेश्वराच्या दृष्टीने जे चांगले आणि योग्य होते ते केले. 3उच्च स्थानावरील परदेशीय दैवतांच्या वेदीचा त्याने नाश केला, पवित्र दगडांचे तुकडे केले आणि अशेरा मूर्तिस्तंभ कापून टाकले. 4त्याने यहूदीयाला त्यांच्या पूर्वजांचे परमेश्वर याहवेहचा आश्रय घेण्याची आणि त्यांचे नियम आणि आज्ञा पाळण्याची आज्ञा दिली. 5त्याने यहूदीयाच्या प्रत्येक नगरातील उच्च स्थाने व धूप जाळण्याची प्रत्येक वेदी उद्ध्वस्त केली आणि त्याच्या काळात राज्यास शांतता लाभली. 6त्याने यहूदीयाची तटबंदी असलेली नगरे बांधली, कारण देशात शांतता होती. त्या वर्षांमध्ये त्याच्याबरोबर युद्ध करणारा कोणी नव्हता, कारण याहवेहनी त्याला विश्रांती दिली होती.
7तो यहूदीयांना म्हणाला, “चला, आपण या गावांची बांधणी करू या आणि त्यांच्याभोवती बुरूज, फाटके आणि गज लावूया. भूमी अजूनही आमची आहे, कारण आम्ही आमचे परमेश्वर याहवेहचा आश्रय घेतला आहे; आम्ही त्यांचा आश्रय घेतला आणि त्यांनी आम्हाला प्रत्येक बाजूंनी विश्रांती दिली आहे.” म्हणून त्यांनी ते बांधले आणि समृद्ध झाले.
8आसाकडे यहूदीयाचे तीन लाख योद्ध्यांचे सैन्य, मोठ्या ढाली आणि भाले घेऊन सुसज्ज होते आणि बिन्यामीन येथील दोन लाख ऐंशी हजार योद्ध्यांचे सैन्य, लहान ढाली आणि धनुष्य घेऊन सुसज्ज होते. हे सर्व शूर लढवय्ये पुरुष होते.
9जेरह कूशी याने हजारोंच्या हजार संख्येने सैन्य आणि तीनशे रथ बरोबर घेऊन त्यांच्याविरुद्ध चढाई केली आणि तो मारेशाहपर्यंत आला. 10आसाने त्याचा सामना करण्यासाठी आगेकूच केले आणि ते मारेशाहजवळ असलेल्या जेफथाह खोऱ्यात युद्धासाठी स्थानबद्ध झाले.
11तेव्हा आसाने त्याचे परमेश्वर याहवेहना हाक मारली आणि म्हणाला, “याहवेह, दुर्बल लोकांना पराक्रमी लोकांविरुद्ध मदत करणारे तुमच्यासारखे कोणी नाही. आमच्या परमेश्वरा, याहवेह आम्हाला मदत करा, कारण आम्ही तुमच्यावर अवलंबून आहोत आणि तुमच्याच नावामध्ये आम्ही या विशाल सैन्याविरुद्ध आलो आहोत. याहवेह, तुम्ही आमचे परमेश्वर आहात; मर्त्य मानवांनी तुमच्यावर विजयी होऊ नये.”
12तेव्हा याहवेहनी आसा आणि यहूदीया यांच्यासमोर कूशी लोकांना तडाखा दिला. कूशी लोक पळून गेले, 13आणि आसा आणि त्याच्या सैन्याने गरारपर्यंत त्यांचा पाठलाग केला. एवढ्या मोठ्या संख्येने कूशी पडले की ते परत स्वतःला उभारू शकले नाहीत; याहवेह आणि त्यांच्या सैन्यासमोर त्यांचा चुराडा झाला. यहूदीयाच्या लोकांनी मोठ्या प्रमाणावर लुटालूट करून नेली. 14गरारच्या सभोवतालची सर्व गावे त्यांनी उद्ध्वस्त केली, कारण याहवेहची दहशत त्यांच्यावर पसरली होती. त्यांनी ही सर्व गावे लुटली, कारण तिथे लुटण्यासारखी पुष्कळ सामुग्री होती. 15त्यांनी गुरांच्या छावण्यांवरही हल्ला केला आणि मेंढ्या, शेळ्या आणि उंटांचे कळप उचलून नेले. नंतर ते यरुशलेमकडे परतले.

सध्या निवडलेले:

2 इतिहास 14: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन