YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यशया 26

26
परमेश्वराच्या संरक्षणासंबंधी भावपूर्ण गीत
1त्या दिवशी यहूदा देशात हे गीत गातील : आमचे नगर तटबंदी केलेले आहे; तारण हेच त्याचे कोट व तट नेमले आहेत.
2वेशी उघडा म्हणजे सत्याचे पालन करणारे नीतिमान राष्ट्र आत येईल.
3ज्याचे मन तुझ्या ठायी स्थिर झाले आहे त्याला तू पूर्ण शांती देतोस, कारण त्याचा भाव तुझ्यावर असतो.
4परमेश्वरावर सर्वकाळ भाव ठेवा, कारण प्रभू परमेश हा सनातन आश्रयदुर्ग आहे.
5उच्च स्थळी राहणार्‍यांना त्याने खाली आणले आहे; त्याने उच्च नगर पाडून टाकले आहे, जमीनदोस्त केले आहे; धुळीस मिळवले आहे.
6ते पायांखाली तुडवतील. गरिबांचे पाय, दीनाची पावलेदेखील ते तुडवतील.”
7नीतिमानाचा मार्ग नीट आहे; तू न्यायपरायण असून नीतिमानाची गती सरळ करतोस.
8हे परमेश्वरा, तुझ्या न्यायमार्गात राहून तुझी आम्ही प्रतीक्षा करीत आहोत; तुझ्या नामाची व तुझ्या स्मरणाची उत्कंठा आमच्या जिवास लागून राहिली आहे.
9रात्री माझ्या जिवास तुझी उत्कंठा लागली; मी अगदी अंत:करणपूर्वक तुझा शोध करीन; कारण तुझी न्यायकृत्ये पृथ्वीवर होतात तेव्हा जगात राहणारे नीतिमत्ता शिकतात.
10दुर्जनांवर कृपा केली तरी तो नीती शिकायचा नाही; सरळांच्या राज्यातदेखील तो अधर्म करील; परमेश्वराचे ऐश्वर्य त्याला दिसायचे नाही.
11हे परमेश्वरा, तुझा हात वर झाला तरी त्यांनी पाहिले नाही. लोकांविषयीची तुझी आस्था पाहून ते फजीत होतील; अग्नी तुझ्या शत्रूंना ग्रासील.
12हे परमेश्वरा, आमच्यासाठी तू शांतता स्थापीत करशील; कारण तू आमच्यासाठी आमची सर्व कार्ये साधली आहेत.
13हे आमच्या देवा, परमेश्वरा, तुझ्याहून अन्य सत्ताधीशांनी आमच्यावर सत्ता चालवली होती, पण तुझ्याच द्वारे आम्ही तुझे नाम स्तवतो.
14मृत जिवंत होत नसतात, प्रेते उठत नसतात; तद्वत तू त्यांची झडती घेऊन त्यांचा विध्वंस केला आहेस व त्यांचे स्मरण अगदी नाहीसे केले आहेस.
15तू राष्ट्रांची वाढ केली आहेस, हे परमेश्वरा, तू राष्ट्रांची वाढ केली आहेस; तू आपला महिमा दाखवला आहेस; तू देशाच्या चतुःसीमा वाढवल्या आहेत.
16हे परमेश्वरा, संकटाच्या वेळी त्यांनी तुझ्याकडे दृष्टी फिरवली; त्यांना तुझ्याकडून शिक्षा झाली तेव्हा त्यांनी मंद स्वराने आपले हृद्‍गत तुला कळवले.
17प्रसूतिकाळ जवळ आलेली गरोदर स्त्री जशी वेणा देते व वेदनांनी ओरडते तसे, हे परमेश्वरा, तुझ्या दृष्टीसमोर आम्ही झालो आहोत.
18आम्ही गरोदर होतो, आम्ही वेणा दिल्या, पण आम्ही जसे काय वारा प्रसवलो; आम्ही देशाचा काही उद्धार केला नाही; देशात वस्ती करण्यास कोणी जन्म पावले नाहीत.
19तुझे मृत जिवंत होतील, माझ्या (लोकांची) प्रेते उठतील. मातीस मिळालेल्यांनो जागृत व्हा, गजर करा; कारण तुझ्यावरील दहिवर, हे प्रभातीचे जीवनदायी दहिवर आहे; भूमी प्रेते बाहेर टाकील.
20चला, माझ्या लोकांनो, आपापल्या खोल्यांत जा, दारे लावून घ्या; क्रोधाचा झपाटा निघून जाईपर्यंत थोडा वेळ लपून राहा.
21कारण पाहा, परमेश्वर पृथ्वीवरील रहिवाशांना त्यांच्या पापास्तव शासन करण्यास आपल्या स्थानाहून निघाला आहे. शोषलेले रक्त पृथ्वी प्रकट करील, वधलेल्यांना ती ह्यापुढे झाकून ठेवणार नाही.

सध्या निवडलेले:

यशया 26: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन