यशया 25
25
परमेश्वराच्या उपकाराबद्दल स्तुतिगीत
1हे परमेश्वरा, तू माझा देव आहेस; मी तुझी थोरवी वर्णीन, तुझ्या नामाचे स्तवन करीन कारण तू आश्चर्यकारक कृत्ये केली आहेस; तू आपले पुरातन संकल्प पूर्ण सत्त्वशीलतेने सिद्धीस नेले आहेत.
2तू शहराला मोडतोडीचा ढीग बनवले आहेस; तटबंदीचा गाव धुळीस मिळवला आहेस; विदेशीयांच्या महालांनी भरलेले शहर नष्ट केले आहेस; त्याचा कधी जीर्णोद्धार होणार नाही.
3ह्यास्तव आडदांड लोक तुझे गौरव करतील, बलात्कारी लोकांची शहरे तुझे भय धरतील.
4कारण निर्दय लोकांचा झपाटा भिंतीवर आदळणार्या वादळाप्रमाणे आहे; पण तू दुर्बलास दुर्ग, लाचारास विपत्काली आश्रय, वादळात निवारा, उन्हात सावली, असा झालास.
5रुक्ष भूमीवरील जसा सूर्याचा ताप शांत व्हावा तसा निर्दय लोकांचा गोंगाट तू शांत करतोस; मेघांच्या छायेने जसा सूर्याचा ताप क्षीण होतो तसे बलात्कार्यांचे जयगीत होते.
6सेनाधीश परमेश्वर ह्या डोंगरावर सर्व राष्ट्रांसाठी मिष्टान्नाची मेजवानी, राखून ठेवलेल्या द्राक्षारसाची मेजवानी करत आहे; उत्कृष्ट मिष्टान्नाची व राखून ठेवल्यावर गाळलेल्या द्राक्षारसाची मेजवानी करीत आहे.
7सर्व लोकांना झाकून टाकणारे झाकण, सर्व राष्ट्रांना आच्छादून टाकणारे आच्छादन, तो ह्या डोंगरावरून उडवून देत आहे.
8तो मृत्यू कायमचा नाहीसा करतो; प्रभू परमेश्वर सर्वांच्या चेहर्यावरील अश्रू पुसतो; तो अखिल पृथ्वीवरून आपल्या लोकांची अप्रतिष्ठा दूर करतो, कारण परमेश्वर हे बोलला आहे.
9त्या दिवशी ते म्हणतील, “पाहा, हा आमचा देव! ह्याची आम्ही आशा धरून राहिलो; तो आमचे तारण करील. हाच परमेश्वर आहे. ह्याची आम्ही आशा धरून राहिलो. त्याने केलेल्या तारणाने आपण उल्हास व हर्ष पावू.”
10परमेश्वराचा हात ह्या डोंगरावर राहील, व जसे शेणाच्या खाईतील रेंद्यात गवत तुडवतात तसे मवाबास जागच्या जागी तुडवतील.
11जसा पोहणारा पोहण्यासाठी झेपा टाकतो तसा तो तिच्यात झेपा टाकील; त्याने आपल्या हाताची करामत कितीही चालवली तरी परमेश्वर त्याचा गर्व दडपून टाकील.
12तो तुझी उंच तटबंदी पाडून कोसळून टाकील, आणि जमीनदोस्त करून धुळीस मिळवील.
सध्या निवडलेले:
यशया 25: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.