यशया 27
27
इस्राएलाची मुक्तता व एकत्रीकरण
1त्या दिवशी परमेश्वर आपल्या दु:खकर, महान व बलवान खड्गाने चपल सर्प लिव्याथान व वक्र सर्प लिव्याथान ह्यांचे पारिपत्य करील; समुद्रातील अजगराला ठार मारील.
2“त्या दिवशी द्राक्षांच्या मळ्याविषयी गीत गा.
3त्याची निगा ठेवणारा मी परमेश्वर; मी त्याला घडोघडी पाणी घालतो; त्याला कोणी उपद्रव करू नये म्हणून मी त्याची रात्रंदिवस राखण करतो.
4माझ्या ठायी राग कसला तो नाहीच; माझ्यापुढे युद्धात काटे व काटेरी झुडपे असती तर ती मी पायाखाली तुडवून सर्व जाळून टाकली असती;
5पण त्याने माझा आश्रय धरावा; त्याने माझ्याबरोबर दोस्ती करावी, माझ्याबरोबर दोस्ती करावी.”
6येणार्या दिवसांत याकोब मूळ धरील; इस्राएल फुलेल व त्याला फळे येतील; ते फळांनी भूपृष्ठ भरतील.
7त्याने जसे दुसर्यांना मारले तसे देवाने त्याला मारले काय? जसे मारेकर्याने इतरांना मारले तसे त्याला मारण्यात आले काय?
8तू तिचा त्याग केला तेव्हा तिला तू बेताचे शासन केलेस; पूर्वेकडील वारा वाहत असता त्याने तिला प्रचंड वार्याने उडवून दिले.
9अशा रीतीने याकोबाच्या दोषांचे क्षालन होईल; त्याचे पाप दूर केल्याचे फळ हेच आहे; तो वेद्यांचे सर्व चिरे फुटलेल्या चुनखड्यासारखे करील तेव्हा अशेरामूर्ती व सूर्यमूर्ती पुन्हा उभारणार नाहीत.
10तटबंदीचे शहर उजाड आहे; ते रानासारखे सोडून दिलेले व टाकलेले वसतिस्थान झाले आहे; तेथे वासरे चरतात, बसतात व तेथल्या फांद्या खाऊन टाकतात.
11त्याच्या डाहळ्या वाळल्या म्हणजे त्या तोडून टाकतील, स्त्रिया येऊन त्या जाळतील; ते लोक ज्ञानशून्य आहेत म्हणून त्यांच्या उत्पन्नकर्त्याला त्यांचा कळवळा येत नाही, त्यांचा निर्माणकर्ता त्यांच्यावर कृपा करीत नाही.
12त्या दिवशी असे होईल की फरात नदाच्या प्रवाहापासून तो मिसरी ओहोळापर्यंत परमेश्वर मळणी करील, आणि इस्राएल लोकांनो, तुम्हांला एकएक असे वेचतील.
13त्या दिवशी असे होईल की एक मोठा कर्णा वाजेल; तेव्हा अश्शूर देशात गडप झालेले व मिसर देशात परागंदा झालेले लोक येतील आणि यरुशलेमेतील पवित्र डोंगरावर परमेश्वराला दंडवत घालतील.
सध्या निवडलेले:
यशया 27: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.