YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यशया 22

22
दृष्टान्ताच्या खोर्‍याविषयी देववाणी
1दृष्टान्ताचे खोरे ह्याविषयीची देववाणी : तुम्ही सर्व धाब्यावर चढला त्या तुम्हांला काय झाले?
2हे गोंगाटाने भरलेल्या, गजबजलेल्या शहरा, उत्सवशब्द करणार्‍या नगरा, तुझ्यातील वध पावलेले तलवारीने वधले नाहीत, युद्धात मारले नाहीत.
3तुझे सर्व सरदार एकत्र मिळून पळाले; धनुष्याला बाण लावल्यावाचून त्यांना बद्ध केले; तुझ्यातून पळून जात होते त्यांपैकी जे हाती लागले त्या सर्वांना एकत्र बांधले.
4ह्यासाठी मी म्हणालो, “माझ्यावरून आपली दृष्टी फिरवा; मी मनस्वी रडणार आहे; माझ्या लोकांच्या कन्येचा नाश झाला आहे; त्याबद्दल माझे सांत्वन करण्याचे श्रम घेऊ नका.”
5कारण दृष्टान्ताच्या खोर्‍यात हा दिवस प्रभू, सेनाधीश परमेश्वर ह्याने गडबडीचा, पायमल्लीचा व घाबरण्याचा असा नेमलेला आहे; ह्या दिवशी भिंती मोडतील आणि डोंगरात आरोळ्यांचा प्रतिध्वनी होईल.
6एलामाने भाता घेतला आहे. पायदळ व घोडेस्वार हेही त्याच्याबरोबर आहेत; कीराने ढालीची गवसणी काढली आहे.
7असे झाले आहे की तुझी उत्कृष्ट खोरी रथांनी भरली आहेत, व वेशीसमोर घोडेस्वार रांग धरून उभे आहेत;
8तेव्हा त्याने यहूदाची झापड दूर केली; त्या दिवशी तू वनगृहातील शस्त्रागाराकडे दृष्टी लावली.
9तुम्ही दाविदाच्या नगरीची भगदाडे पाहिली ती पुष्कळ होती; तेव्हा तुम्ही खालील तळ्यात पाण्याचा संचय केला.
10तुम्ही यरुशलेमेतील घरांची मोजदाद करून तट मजबूत करण्यासाठी घरे पाडली.
11जुन्या तळ्याच्या पाण्यासाठी तुम्ही दोन भिंतींच्या मध्ये हौद केला; पण ज्याने हे सर्व केले त्याच्याकडे तुम्ही लक्ष दिले नाही; ज्याने हे पूर्वीच योजले त्याच्याकडे तुम्ही दृष्टी लावली नाही.
12त्या दिवशी तुम्ही रडावे, शोक करावा, केस तोडावे, गोणपाट नेसावे असे प्रभू, सेनाधीश परमेश्वर ह्याने सांगितले होते;
13पण पाहावे तर आनंद व हर्ष, बैल मारणे व मेंढरे कापणे, मांस खाणे व द्राक्षारस पिणे चालले आहे; “उद्या मरायचे आहे म्हणून खाऊनपिऊन घेऊ या,” असे ते म्हणत आहेत.
14सेनाधीश परमेश्वराने माझ्या कानात सांगितले आहे की, “तुम्ही मरावे ह्याशिवाय ह्या अन्यायाचे दुसरे प्रायश्‍चित्त खरोखर नाही,” असे प्रभू, सेनाधीश परमेश्वर म्हणतो.
शेबनाच्या जागी एल्याकीम येणार
15प्रभू, सेनाधीश परमेश्वर असे म्हणाला की, “जा, राजमहालातील व्यवस्था पाहणारा कारभारी जो शेबना त्याच्याकडे जाऊन असे म्हण :
16येथे तुझे काय आहे? येथे तुझे कोण आहे? तू आपल्यासाठी थडगे खोदवले आहेस; उच्च स्थळी थडगे खोदवले आहेस; खडक कोरून तू आपणासाठी जागा केली आहेस.
17पाहा, परमेश्वर तुला बलवान पुरुषाप्रमाणे झुगारून देणार आहे; तुला मगरमिठीत धरणार आहे.
18तुझी मोट बांधून तुला चेंडूसारखे विस्तृत प्रदेशावर फेकून देणार आहे; अरे स्वामीगृहास कलंक लावणार्‍या, तेथे तुला मरण येईल, तुझे ऐश्वर्याचे रथ तेथेच राहतील.
19मी तुला तुझ्या हुद्द्यावरून काढून टाकीन; तो तुला तुझ्या पदावरून खाली ओढील.
20त्या दिवशी असे होईल की माझा सेवक, हिल्कीयाचा पुत्र एल्याकीम, ह्याला मी बोलावीन;
21त्याला तुझा झगा घालीन, त्याला तुझा कमरबंद कशीन, तुझी सत्ता त्याच्या हाती देईन; तो यरुशलेमकरांचा व यहूदाच्या घराण्याचा पिता होईल.
22दाविदाच्या घराण्याची किल्ली त्याच्या खांद्यांवर ठेवीन; त्याने उघडले तर कोणी बंद करणार नाही; त्याने बंद केले तर कोणी उघडणार नाही.
23मजबूत ठिकाणच्या खुंटीसारखे मी त्याला स्थिर करीन; म्हणजे तो आपल्या पित्याच्या घराण्यास वैभवशाली आसन होईल.
24त्याच्या पित्याच्या घराण्याच्या सर्व शाखा व प्रतिशाखा, पंचपात्रीपासून सुरईपर्यंत सगळी पात्रे, ह्यांचा भार त्याच्यावर लटकून राहील.
25सेनाधीश परमेश्वर म्हणतो, त्या दिवशी मजबूत ठिकाणी बसेलली खुंटी ढळेल; ती कापली जाऊन खाली पडेल व तिच्यावरील भार छेदला जाईल;’ कारण परमेश्वर हे बोलला आहे.”

सध्या निवडलेले:

यशया 22: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन