YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यशया 21

21
समुद्रालगतच्या रानाविषयी देववाणी
1समुद्रालगतच्या रानाविषयीची देव वाणी : दक्षिणेकडून जशा वावटळी झपाट्याने येतात, तसे रानातून, भयानक देशातून अरिष्ट येते.
2मला कष्टप्रद दृष्टान्त झाला आहे; लुटारू लुटत आहे, ठक ठकबाजी करीत आहे. हे एलामा, चढाई कर; हे मादया, वेढा घाल; त्याच्यामुळे लोक टाकत असलेले सर्व उसासे मी थांबवतो.
3हे पाहून माझ्या कंबरेस कळा लागल्या आहेत; प्रसूत होणार्‍या स्त्रीच्या वेदनांप्रमाणे मला वेदना होत आहेत; मी एवढे आळेपिळे देत आहे की मला ऐकू येत नाही; मी इतका घाबरलो आहे की मला दिसत नाही.
4माझे हृदय धडधडते; भीतीने मी त्रस्त झालो आहे; माझी आवडती वेळ संध्याकाळ मला कंपित करणारी झाली आहे.
5ते मेजवानीची तयारी करतात; ते पहारेकरी ठेवतात; खातातपितात; सरदारहो, उठा, ढालीस तेल लावा.
6परमेश्वर मला म्हणाला, “जा, एक टेहळणी करणारा ठेव; त्याच्या नजरेस पडेल ते त्याने कळवावे.”
7रथ, जोडीजोडीने चालणारे घोडेस्वार, गाढवांवर बसलेले स्वार व सांडणीस्वार हे त्याच्या दृष्टीस पडले तेव्हा त्याने अतिशय उत्कंठेने कान लावले.
8तो सिंहनाद करून म्हणाला, “प्रभू, मी दिवसा बुरुजावर एकसारखा उभा असतो, रात्रीच्या रात्री आपल्या चौकीवर काढतो.
9तर पाहा, पायदळ, जोडीजोडीने चालणारे घोडेस्वार येत आहेत; ते उच्च स्वराने म्हणतात, बाबेल पडला हो पडला; त्याच्या देवांच्या सर्व मूर्ती जमिनीवर आपटून फोडल्या.”
10हे माझ्या झोडलेल्या आणि खळ्यातल्या धान्या, इस्राएलाचा देव, सेनाधीश परमेश्वर, ह्याच्याकडून जे मी ऐकले ते मी तुम्हांला कळवले आहे.
दुमाविषयी देववाणी
11दुमाविषयीची देववाणी : सेईराहून मला शब्द ऐकू येतो की, “जागल्या, रात्र किती राहिली? जागल्या, रात्र किती राहिली?”
12जागल्या म्हणाला, “पहाट होत आहे, रात्रही होणार; तुम्हांला काही विचारायचे असेल तर विचारा; परत या.”
अरबस्तानाविषयी देववाणी
13अरबस्तानाविषयीची देववाणी : ददानीच्या काफल्यांनो, तुम्हांला अरबस्तानातील रानात रात्र कंठावी लागेल.
14तान्हेल्यांसाठी पाणी आणा; तेमा देशातील रहिवाशांनो, पळणार्‍यांच्या भेटीस भाकरी घेऊन या.
15तलवारी, उपसलेल्या तलवारी, वाकवलेले धनुष्य व घोर संग्राम ह्यांपासून ते पळत आहेत.
16कारण प्रभूने मला असे सांगितले आहे की, “सालदाराच्या मुदतीप्रमाणे एका वर्षाच्या मुदतीत केदाराचे सर्व वैभव लयास जाईल;
17आणि केदार देशातील धनुर्धारी वीरांची संख्या थोडीच उरेल; कारण परमेश्वर, इस्राएलाचा देव, हे बोलला आहे.”

सध्या निवडलेले:

यशया 21: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन