YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यशया 23

23
सोर व सीदोनाविषयी देववाणी
1सोराविषयीची देववाणी : तार्शीशच्या गलबतांनो, हायहाय करा; त्याचा विध्वंस झाला आहे; तेथे आता घरदार किंवा बंदर राहिले नाही; कित्ती लोकांच्या देशातून त्यांना ही खबर कळली.
2समुद्रतीरींच्या रहिवाशांनो, भीतीने स्तब्ध व्हा; समुद्रपर्यटन करणारे सीदोनी व्यापारी तुला समृद्ध करीत.
3महासागरावरून आलेले शीहोर थडीचे उत्पन्न, नील नदीचे पीक ही त्याची मिळकत होती; ते शहर राष्ट्रांची पेठ झाले होते.
4हे सीदोना, फजीत हो; समुद्र, समुद्रदुर्ग म्हणत आहे : “मी वेणा दिल्या नाहीत, प्रसवलो नाही, तरुणांना वाढवले नाही, कुमारी लहानाच्या मोठ्या केल्या नाहीत.”
5मिसर देशास ही बातमी पोहचेल तेव्हा सोराच्या ह्या वर्तमानाने ते घोरात पडतील.
6तार्शीशास निघून जा; समुद्रतीरीच्या रहिवाशांनो, हायहाय करा.
7हेच का तुमचे आनंदपूर्ण नगर? ते अति प्राचीन काळापासून वसलेले आहे; त्याचे पाय वसाहतीसाठी त्याला दूरदूर घेऊन गेले.
8सोर ही राजमुकुटदात्री; तिचे व्यापारी सरदार, तिचे उदमी जगातले महाजन; तिच्याविरुद्ध हे कोणी योजले?
9सर्व डामडौलास बट्टा लागावा व जगातील सर्व महाजनांची अप्रतिष्ठा व्हावी, म्हणून हे सेनाधीश परमेश्वराने योजले आहे.
10अगे तार्शीशकन्ये, तू नील नदीप्रमाणे आपली भूमी व्यापून टाक, तुला आता अटकाव करणारा कटिबंध राहिला नाही.
11परमेश्वराने आपला हात समुद्रावर उगारला आहे; त्याने राष्ट्रांना थरथर कापवले आहे; त्याने कनानासंबंधाने अशी आज्ञा केली आहे की त्याचे दुर्ग नष्ट करावे.
12तो म्हणाला, “हे कलंक लागलेल्या सीदोनाच्या कुमारिके, तू इतःपर उल्लासणार नाहीस; ऊठ, कित्ती लोकांच्या देशात निघून जा; तेथेही तुला थारा मिळणार नाही.”
13खास्द्यांचा देश पाहा, तो आता राष्ट्र नाही; त्यांची भूमी अश्शूर्‍यांनी वनचरांसाठी सोडली आहे; त्यांनी मोर्चे लावून तिचे महाल जमीनदोस्त करून ती उद्ध्वस्त केली आहे.
14तार्शीशच्या गलबतांनो, हायहाय करा. तुमचा दुर्ग उद्ध्वस्त केला आहे.
15त्या दिवशी असे होईल की एकाच राजाच्या कारकिर्दीच्या इतकी म्हणजे सत्तर वर्षे सोराची विस्मृती पडेल; सत्तर वर्षे संपल्यावर वेश्येच्या ह्या गाण्यात सांगितल्याप्रमाणे सोराचे होईल :
16“स्मरणातून गेलेल्या वेश्ये, हाती किनरी घे, शहरभर भटक, चांगले वाजव, पुष्कळ गा, म्हणजे तुझे स्मरण राहील.”
17ही सत्तर वर्षे गेल्यावर असे होईल की परमेश्वर सोरेचा समाचार घेईल; ती पुन्हा आपल्या कमाईकडे फिरेल; ती भूपृष्ठावरील सर्व राष्ट्रांशी व्यभिचार करील.
18तिच्या व्यापाराची प्राप्ती व तिची कमाई परमेश्वराला समर्पून पवित्र होईल; ती भांडारात ठेवणार नाहीत; तिचा संचय करणार नाहीत; तर जे परमेश्वराच्या सन्निध असतात त्यांना भरपूर खाण्यास मिळावे व त्यांनी उंची वस्त्रे ल्यावीत म्हणून तिच्या व्यापाराची प्राप्ती त्यांच्या कामी लागेल.

सध्या निवडलेले:

यशया 23: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन