YouVersion लोगो
सर्च आयकॉन

१ इतिहास 10

10
शौल व त्याचे मुलगे ह्यांचा मृत्यू
(१ शमु. 31:1-13)
1पलिष्टी इस्राएलाशी लढले तेव्हा इस्राएल लोक पलिष्ट्यांपुढून पळून गेले व गिलबोवा डोंगरात घायाळ होऊन पडले.
2पलिष्ट्यांनी शौलाचा व त्याच्या पुत्रांचा निकराने पाठलाग करून शौलाचे पुत्र योनाथान, अबीनादाब व मलकीशुवा ह्यांचा वध केला.
3शौलाशीही लढाई फार निकराची झाली; तिरंदाजांनी त्याला गाठले व त्याच्यामुळे तो फार हैराण झाला.
4तेव्हा शौल आपल्या शस्त्रवाहकाला म्हणाला, “आपली तलवार उपसून मला भोसक; तसे न केल्यास हे असुंती लोक येऊन माझी विटंबना करतील.” पण त्याचा शस्त्रवाहक तसे करीना, तो फार घाबरला होता; तेव्हा शौल आपली तलवार काढून तिच्यावर पडला.
5शौल मेला हे पाहून त्याचा शस्त्रवाहकही आपल्या तलवारीवर पडून त्याच्याबरोबर मेला.
6ह्याप्रमाणे शौल व त्याचे तिघे पुत्र व त्याच्या घरची माणसे मृत्यू पावली.
7खोर्‍यात असलेल्या सर्व इस्राएल लोकांनी पाहिले की लढवय्ये पळाले आणि शौल व त्याचे पुत्र मरण पावले, तेव्हा तेही आपापली नगरे सोडून पळाले आणि पलिष्टी लोक त्यांत जाऊन राहिले.
8दुसर्‍या दिवशी पलिष्टी लोक वधलेल्यांना लुटायला आले तेव्हा शौल व त्याचे तिघे पुत्र गिलबोवा डोंगरात पडलेले त्यांना आढळले.
9तेव्हा त्यांनी शौलास नागवून त्याचे शिर व चिलखत काढून घेतले आणि ते आपल्या देशात सर्वत्र पाठवून आपल्या मूर्तींना व लोकांना हे वर्तमान कळवले.
10त्यांनी त्याची हत्यारे आपल्या देवळात ठेवली व त्याचे शिर दागोनाच्या देवळात टांगले.
11पलिष्ट्यांनी शौलाचे जे काही केले ते सगळे याबेश गिलादाच्या सर्व रहिवाशांनी ऐकले,
12तेव्हा तेथले सर्व शूर वीर निघाले आणि त्यांनी शौल व त्याचे पुत्र ह्यांची प्रेते याबेश येथे आणली व त्यांच्या अस्थी घेऊन याबेशातील एका वृक्षाखाली पुरल्या आणि सात दिवस उपास केला.
13शौलाने परमेश्वराचा अपराध केला, परमेश्वराचा शब्द मानला नाही आणि परमेश्वराला प्रश्‍न करण्याऐवजी भूतविद्याप्रवीण स्त्रीचा त्याने सल्ला घेतला,
14ह्या सर्वांमुळे तो मेला; परमेश्वराने त्याला मारले आणि इशायाचा पुत्र दावीद ह्याला राज्य बहाल केले.

सध्या निवडलेले:

१ इतिहास 10: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन