YouVersion लोगो
सर्च आयकॉन

१ इतिहास 11

11
इस्राएलाचा राजा म्हणून दाविदाचा अभिषेक
(२ शमु. 5:1-5)
1मग सर्व इस्राएल लोक हेब्रोन येथे दाविदाकडे जमा होऊन म्हणू लागले, “पाहा, आम्ही आपल्या हाडामांसाचे आहोत;
2गतकाळी शौल आमच्यावर राजा असताना इस्राएलाची ने-आण करणारे अग्रणी आपणच होता; आणि आपला देव परमेश्वर आपणाला म्हणाला होता की, ‘माझी प्रजा इस्राएल ह्यांचा मेंढपाळ व अधिपती तूच होशील.”’ 3ह्या प्रकारे इस्राएल लोकांचे सर्व वडील जन हेब्रोनात राजाकडे आले, आणि दाविदाने त्यांच्याशी परमेश्वरासमोर हेब्रोनात करार केला आणि परमेश्वराने शमुवेलाच्या द्वारे सांगितले होते त्या वचनानुसार त्यांनी दाविदाला अभिषेक करून इस्राएलाचा राजा नेमले.
दावीद सीयोन गड घेतो
(२ शमु. 5:6-10)
4नंतर दावीद व सर्व इस्राएल लोक यरुशलेमेस गेले (ह्यालाच यबूस असे म्हणतात); त्या देशाचे रहिवासी यबूसी लोक तेथे राहत असत.
5यबूस येथल्या रहिवाशांनी दाविदाला सांगितले की, “तू येथे येऊ नकोस.” तथापि दाविदाने सीयोन नावाचा गड सर केला; त्यालाच दावीदपूर म्हणतात.
6दावीद म्हणाला, “जो कोणी सर्वांच्या आधी यबूसी लोकांना मार देईल तो मुख्य सेनापती होईल.” सरूवेचा पुत्र यवाब हा प्रथम चढाई करून गेला म्हणून त्याला सेनापती केले.
7दावीद त्या गडात राहू लागला म्हणून त्याचे नाव दावीदपूर पडले.
8त्याने नगराला चोहोकडून म्हणजे मिल्लोपासून सभोवार कोट बांधला आणि यवाबाने बाकीच्या नगराचा जीर्णोद्धार केला.
9दावीद अधिकाधिक थोर होत गेला, कारण सेनाधीश परमेश्वर त्याच्याबरोबर असे.
दाविदाचे योद्धे
(२ शमु. 23:8-39)
10इस्राएलाविषयी परमेश्वर बोलला होता त्यानुसार दाविदाच्या ज्या शूर वीरांनी त्याच्या पक्षाचे होऊन त्याला गादी मिळवून देण्यात साहाय्य केले ते प्रमुख पुरुष हे होत.
11दाविदाकडे असलेल्या शूर वीरांची नावे ही : हखमोन्याचा पुत्र याशबाम हा तिसांचा1 नायक असून त्याने तीनशे लोकांवर भाला चालवून त्यांना एका प्रसंगी मारून टाकले.
12त्याच्या खालोखाल अहोही दोदय ह्याचा पुत्र एलाजार हा होता; तो तिघा महावीरांपैकी एक होता.
13तो पस-दम्मीम2 येथे दाविदाबरोबर होता; तेथे पलिष्ट्यांनी एकत्र होऊन जवाच्या एका शेतात सैन्यव्यूह रचला तेव्हा लोक पलिष्ट्यांसमोरून पळून गेले.
14त्यांनी त्या शेतामध्ये उभे राहून त्याचे रक्षण करून पलिष्ट्यांचा संहार केला; त्या प्रसंगी परमेश्वराने त्यांना मोठा विजय प्राप्त करून देऊन त्यांचा बचाव केला.
15मग त्या तीस नायकांतले तिघे अग्रणी दाविदाकडे अदुल्लाम गुहेत गेले; तेव्हा पलिष्ट्यांचे सैन्य रेफाईम खोर्‍यात छावणी देऊन होते.
16त्या प्रसंगी दावीद गडावर असून बेथलेहेमात पलिष्ट्यांचे ठाणे बसले होते.
17दाविदाला उत्कट इच्छा होऊन तो म्हणाला, “बेथलेहेमाच्या वेशीजवळील विहिरीचे पाणी मला कोणी पाजील तर किती बरे!”
18त्या तिघांनी पलिष्ट्यांच्या छावणीत घुसून बेथलेहेमाच्या वेशीजवळील विहिरीचे पाणी काढून दाविदाकडे आणले; पण तो ते पिईना. त्याने ते परमेश्वराच्या नामाने ओतले.
19तो म्हणाला, “हे माझ्या देवा, असे कृत्य माझ्याकडून न घडो; जे आपल्या प्राणांवर उदार झाले त्यांचे हे रक्त मी प्यावे काय? कारण त्यांनी आपला जीव धोक्यात घालून हे आणले आहे.” म्हणून तो ते पिईना. त्या तिघा वीरांनी हे कृत्य केले.
20यवाबाचा भाऊ अबीशय हा त्या तिघांचा प्रमुख होता; त्याने आपला भाला तीनशे माणसांवर चालवून त्यांना ठार केले; त्या तिघांमध्ये त्याने नाव मिळवले.
21त्या तिघांमध्ये त्याची महती विशेष होती म्हणून तो त्यांचा नायक झाला; तरी तो पहिल्या तिघांच्या योग्यतेस पोहचला नाही.
22कबसेल येथला एक मनुष्य होता; त्याने पुष्कळ पराक्रम केले होते; त्याच्या यहोयादा नावाच्या पुत्राचा बनाया म्हणून एक पुत्र होता, त्याने मवाबी अरीएल ह्याच्या दोघा पुत्रांना ठार मारले आणि बर्फाच्या दिवसांत कूपात उतरून एका सिंहास ठार केले.
23मग त्याने पाच हात उंचीच्या एका धिप्पाड मिसरी पुरुषाला ठार केले; त्या मिसर्‍याच्या हाती साळ्याच्या तुरीसारखा एक भाला होता; पण बनाया केवळ एक काठी घेऊन त्याच्यावर चालून गेला व त्याने त्या मिसर्‍याच्या हातचा भाला हिसकावून घेऊन त्या भाल्याने त्याचा वध केला.
24असे करून यहोयादाचा पुत्र बनाया ह्याने त्या तिघा वीरांमध्ये नाव मिळवले.
25त्या तिसांहून त्याची महती विशेष होती तरी पहिल्या तिघांच्या योग्यतेस तो पोहचला नाही; दाविदाने त्याला आपल्या हुजरातीवर नेमले.
26सैन्यातील वीर हे : यवाबाचा भाऊ असाएल, बेथलेहेमाच्या दोदोचा पुत्र एलहानान,
27शम्मोथ हरोरी, हेलस पलोनी,
28इक्केश तकोई ह्याचा पुत्र ईरा, अबियेजेर, अनाथोथी,
29सिब्बखय हूशाथी, ईलाय अहोही,
30महरय नटोफाथी, बाना नटोफाथी ह्याचा पुत्र हेलेद,
31बन्यामिन्यांच्या गिबातला रीबय ह्याचा पुत्र इत्तय, बनाया पिराथोनी,
32गाशाच्या ओढ्यांजवळचा हूरय अबीएल अर्बाथी,
33अजमावेथ बहरूमी, अलीहबा शालबोनी,
34गिजोनकर हाशेमाचे पुत्र, हरारी शागे ह्याचा पुत्र योनाथान,
35हरारी साखार ह्याचा पुत्र अहीयाम, ऊराचा पुत्र अलीफल,
36हेफेर मखेराथी, अहीया पलोनी,
37हेस्री कर्मेली, एजबयाचा पुत्र नारय,
38नाथानाचा भाऊ योएल, हग्रीचा पुत्र मिभार,
39सेलक अम्मोनी, सरूवेचा पुत्र यवाब ह्याचा शस्त्रवाहक नहरय बैरोथी,
40ईरा इथ्री, गारेब इथ्री,
41उरीया हित्ती, अहलयाचा पुत्र जाबाद,
42रऊबेनी शीजा ह्याचा पुत्र अदीना. हा रऊबेन्यांचा सरदार, त्याच्याबरोबर तीस जण असत,
43माकाचा पुत्र हानान, योशाफाट मिथनी,
44उज्जीया अष्टराथी, होथाम अरोएरी ह्याचे पुत्र शमामा व यहीएल,
45शिम्रीचा पुत्र यदीएल व त्याचा भाऊ योहा तीसी,
46अलिएल महवी व एलानामाचे पुत्र यरीबय व योशव्या, इथ्मा मवाबी,
47अलीएल, ओबेद आणि यासीएल मसोबायी.

सध्या निवडलेले:

१ इतिहास 11: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन