मार्क 9
9
1येशू त्यांना पुढे म्हणाला, “मी तुम्हांला निश्चितपणे सांगतो की, येथे उभे असणाऱ्यांपैकी काही जण असे आहेत की, देवाचे राज्य सामर्थ्यानिशी आलेले पाहिल्याशिवाय त्यांना मरणाचा अनुभव येणार नाही.”
येशूचे रूपांतर
2सहा दिवसांनंतर येशूने पेत्र, याकोब व योहान ह्यांना आपल्याबरोबर एका उंच डोंगरावर एकीकडे नेले व तेथे त्यांच्यादेखत त्याचे रूपांतर झाले. 3त्याची वस्त्रे इतकी चकचकीत व पांढरी शुभ्र झाली की, तितकी पांढरी शुभ्र करणे पृथ्वीवरील कोणत्याही परिटाला शक्य झाले नसते. 4मोशे व एलिया त्यांच्या दृष्टीस पडले. ते येशूबरोबर संभाषण करत होते. 5पेत्र येशूला म्हणाला, “गुरुवर्य, आपण येथे आहोत, हे किती चांगले आहे! आम्ही तीन मंडप उभारतो. आपल्यासाठी एक, मोशेसाठी एक व एलियासाठी एक.” 6काय बोलावे, हे त्याला सुचले नाही कारण ते फारच भयभीत झाले होते.
7तेथे एक मेघ आला व त्याने त्यांच्यावर छाया धरली. मेघातून अशी वाणी झाली, “हा माझा प्रिय पुत्र आहे. ह्याचे तुम्ही ऐका.” 8त्यांनी अकस्मात सभोवती नजर फिरवली तेव्हा त्यांना त्यांच्याजवळ फक्त येशूशिवाय दुसरे कोणी दिसले नाहीत.
9ते डोंगरावरून उतरत असता त्याने त्यांना बजावले की, “तुम्ही जे पाहिले ते मनुष्याचा पुत्र मृतांमधून पुन्हा उठेपर्यंत कोणालाही सांगू नका.”
10त्याचा आदेश त्यांनी मानला परंतु मृतांमधून पुन्हा उठणे म्हणजे काय, ह्याविषयी ते आपसात चर्चा करू लागले. 11त्यांनी त्याला विचारले, “प्रथम एलिया आला पाहिजे, असे शास्त्री का म्हणतात?”
12त्याने त्यांना उत्तर दिले, “एलिया प्रथम येऊन सर्व काही यथास्थित करतो हे खरे आहे, तरीदेखील मनुष्याच्या पुत्राने पुष्कळ दुःखे सोसावीत व त्याचा अव्हेर केला जावा, असे त्याच्याविषयी लिहिले आहे, त्याचा अर्थ काय? 13तरी पण मी तुम्हांला सांगतो, एलिया तर आला आहे आणि लोकांना जसे वाटले तसे त्यांनी त्याचे केले, असे धर्मशास्त्रात लिहिलेले आहे.”
भूतग्रस्ताला आरोग्यदान
14ते इतर शिष्यांजवळ आले, तेव्हा त्यांच्याभोवती लोकसमुदाय आहे व त्यांच्याबरोबर काही शास्त्री वादविवाद करत आहेत, असे त्यांना दिसून आले. 15येशूला पाहताच सर्व लोक अगदी आश्चर्यचकित झाले आणि त्याच्याकडे धावत जाऊन त्यांनी त्याला नमन केले. 16त्याने शिष्यांना विचारले, “ह्यांच्याशी तुमचा कसला वादविवाद चालला आहे?”
17लोकसमुदायातील एकाने उत्तर दिले, “गुरुवर्य, मी माझ्या मुलाला आपल्याकडे घेऊन आलो आहे. ह्याला भुताने पछाडले आहे व हा बोलू शकत नाही. 18जेथे जेथे ते ह्याला धरते, तेथे तेथे ते ह्याला खाली आपटते. मग ह्याच्या तोंडाला फेस येतो आणि हा दात खातो व त्याचे सर्व अंग ताठ होते. ह्याच्यातील भुताला काढावे म्हणून आपल्या शिष्यांना मी विनंती केली, परंतु त्यांना ते काढता आले नाही.”
अधिक प्रार्थनेची गरज
19येशू म्हणाला, “अहो विश्वासहीन लोकांनो, मी कुठवर तुमच्याबरोबर असणार? कोठवर तुम्हांला समजून घेणार? त्याला माझ्याकडे आणा.” 20त्यांनी त्याला त्याच्याकडे आणले. त्या भुताने येशूला पाहताच मुलाला पिळवटून टाकले आणि तो मुलगा जमिनीवर पडून तोंडाला फेस येऊन लोळू लागला. 21येशूने त्याच्या वडिलांना विचारले, “ह्याला असे कधीपासून होत आहे?” ते म्हणाले, “बालपणापासून. 22ह्याचा नाश करावा म्हणून भुताने ह्याला पुष्कळदा अग्नीत व पाण्यात टाकले. आपल्या हातून काही होणे शक्य असेल तर आम्हांवर दया करा व आम्हांला साहाय्य करा.”
23येशू त्यांना म्हणाला, “हो, जर तू स्वतः विश्वास ठेवलास तर. विश्वास बाळगणाऱ्याला सर्व काही शक्य आहे.”
24लगेच मुलाचे वडील मोठ्याने म्हणाले, “माझा विश्वास आहे, पण माझा अविश्वास दूर करण्याकरता मला साहाय्य करा.”
25लोक सभोवती गर्दी करीत आहेत, असे पाहून येशू त्या भुताला म्हणाला, “अरे मुक्याबहिऱ्या भुता, मी तुला आज्ञा करतो, ह्याच्यातून नीघ व पुन्हा कधी ह्याच्यात शिरू नकोस.”
26त्या भुताने किंकाळी फोडली व मुलाला जोरदार झटका देऊन खाली फेकले व ते त्याच्यातून निघाले. तो मुलगा मेल्यासारखा झाला. “तो मेला आहे”, असे सर्व जण म्हणू लागले. 27परंतु येशूने त्याला हात धरून उठवले व तो उभा राहिला.
28येशू घरी गेल्यावर त्याच्या शिष्यांनी त्याला खाजगीत विचारले, “आम्हांला ते का काढता आले नाही?”
29तो त्यांना म्हणाला, “ह्या प्रकारचे भूत केवळ प्रार्थनेने काढणे शक्य असते.”
स्वतःच्या मृत्यूबद्दल येशूने दुसऱ्यांदा केलेले भाकीत
30येशू व त्याचे शिष्य तेथून निघाले व ते गालीलमधून जात आहेत, हे कोणास कळू नये अशी येशूची इच्छा होती; 31तो त्याच्या शिष्यांना शिकवत असे, “मनुष्याचा पुत्र माणसांच्या हाती दिला जाणार आहे. ते त्याला ठार मारतील आणि मृत्यूनंतर तिसऱ्या दिवशी तो पुन्हा उठेल.”
32परंतु ह्या बोलण्याचा अर्थ त्यांना समजला नाही व ते त्याला विचारण्यास धजले नाहीत.
नम्रतेचे महत्त्व
33नंतर ते कफर्णहूमला आले. घरात आल्यावर त्याने त्यांना विचारले, “तुम्ही वाटेत कसली चर्चा करत होता?”
34ते गप्प राहिले, कारण सर्वांत मोठा कोण, ह्याविषयी त्यांची वाटेत चर्चा चालली होती. 35त्याने बसून त्या बारा जणांना बोलावून म्हटले, “जर कोणी पहिला होऊ इच्छीत असेल, तर त्याने सर्वांत शेवटचा व सर्वांचा सेवक झाले पाहिजे.” 36नंतर त्याने एका लहान मुलाला घेऊन समोर उभे केले व त्याला कवटाळून तो त्यांना म्हणाला, 37“जो कोणी माझ्या नावाने अशा बालकांपैकी एकाचा स्वीकार करतो, तो माझा स्वीकार करतो व जो कोणी माझा स्वीकार करतो तो केवळ माझा नव्हे, तर ज्याने मला पाठवले त्याचादेखील स्वीकार करतो.
38योहानने त्याला म्हटले, “गुरुवर्य, कोणा एकाला तुमच्या नावाने भुते काढताना आम्ही पाहिले. त्याला आम्ही मना केले कारण तो आपला अनुयायी नव्हता.”
39येशू म्हणाला, “त्याला मना करू नका कारण माझ्या नामाने अद्भुत कृत्य करील व लगेच माझी निंदा करील असा कोणी नाही. 40जो आपल्या विरूद्ध नाही तो आपल्या बाजूचा आहे. 41तुम्ही माझे आहात म्हणून जो कोणी तुम्हांला पेलाभर पाणी प्यायला देईल तो त्याच्या पारितोषिकाला मुकणार नाही, हे मी तुम्हांला ठामपणे सांगतो.”
इतरांची श्रद्धा विचलित न करण्याविषयी
42विश्वास ठेवणाऱ्या ह्या लहानांतील एकाला जो पापास प्रवृत्त करील, त्याच्या गळ्यात मोठ्या जात्याची तळी बांधून त्याला समुद्रात टाकून द्यावे, हे त्याच्या हिताचे आहे. 43-44तुझा हात तुला पाप करण्यासाठी प्रवृत्त करत असेल, तर तो तोडून टाक. [दोन हात असून नरकात, म्हणजे न विझणाऱ्या अग्नीत जावे ह्यापेक्षा एका हाताविना जीवनात जावे, हे तुझ्या हिताचे आहे.] 45-46तुझा पाय तुला पाप करण्यासाठी प्रवृत्त करत असेल, तर तो तोडून टाक. [दोन पाय असून नरकात टाकले जावे ह्यापेक्षा एका पायाविना जीवनात जावे, हे तुझ्या हिताचे आहे.] 47-48तुझा डोळा तुला पाप करण्यासाठी प्रवृत्त करत असेल तर तो उपटून टाक. दोन डोळे असून जेथे किडा मरत नाही व अग्नी विझत नाही अशा नरकात टाकले जावे, ह्यापेक्षा एका डोळ्याने देवाच्या राज्यात जावे, हे तुझ्या हिताचे आहे.
49प्रत्येक मनुष्य अग्नीने शुद्ध केला जाईल.
50मीठ चांगला पदार्थ आहे, परंतु मिठाचा खारटपणा गेला तर त्याला चव कशाने आणता येईल? तुमच्यात मीठ असू द्या व तुम्ही एकमेकांबरोबर शांतीने राहा.”
اکنون انتخاب شده:
मार्क 9: MACLBSI
هایلایت
به اشتراک گذاشتن
کپی
می خواهید نکات برجسته خود را در همه دستگاه های خود ذخیره کنید؟ برای ورودثبت نام کنید یا اگر ثبت نام کرده اید وارد شوید
Marathi C.L. (NT), पवित्र शास्त्र
Copyright © 2018 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.