मार्क 8

8
चार हजारांना भोजन
1काही दिवसांनी पुन्हा एकदा लोकांचा विशाल समुदाय जमला होता व लोकांजवळ खायला काही नव्हते म्हणून येशूने त्याच्या शिष्यांना बोलावून त्यांना म्हटले, 2“मला ह्या लोकांचा कळवळा येतो. आज तीन दिवस ते माझ्याबरोबर आहेत व आता त्यांच्याजवळ खायला काही नाही. 3मी त्यांना उपाशी घरी पाठवले तर ते वाटेत मूर्च्छित होतील. त्यांतील कित्येक तर दुरून आलेले आहेत.”
4त्याच्या शिष्यांनी विचारले, “येथे अरण्यात हे तृप्त होतील इतक्या भाकरी कुठून आणणार?”
5त्याने त्यांना विचारले, “तुमच्याजवळ किती भाकरी आहेत?” ते म्हणाले, “सात.”
6त्याने लोकांना जमिनीवर बसायला सांगितले, त्या सात भाकरी घेतल्या व आभार मानून त्या मोडल्या व वाढण्याकरता त्याच्या शिष्यांजवळ दिल्या. त्यांनी लोकांना त्या वाढल्या. 7त्यांच्याजवळ थोडे लहान मासे होते. येशूने त्यांच्यावर आशीर्वाद देउन शिष्यांना तेही वाढायला दिले. 8सर्व जण जेवून तृप्त झाले. शिष्यांनी उरलेल्या तुकड्यांच्या सात टोपल्या भरून घेतल्या. 9तेथे सुमारे चार हजार लोक होते. त्यानंतर येशूने लोकांना निरोप दिला 10आणि लगेच तो त्याच्या शिष्यांबरोबर मचव्यात बसून दल्मनुथाच्या भागात गेला.
असमंजस शिष्य
11एकदा काही परुशी येऊन येशूबरोबर वाद घालू लागले आणि त्याची परीक्षा पाहण्याकरता त्यांनी त्याच्याजवळ स्वर्गातून चिन्ह मागितले. 12अंतर्यामी व्यथित होऊन तो म्हणाला, “ही पिढी चिन्ह का मागते? मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो की, ह्या पिढीला कोणतेही चिन्ह दिले जाणार नाही.” 13तो त्यांना सोडून पुन्हा मचव्यात बसून सरोवराच्या पलीकडे जायला निघाला.
14शिष्य भाकरी घ्यायला विसरले होते आणि मचव्यात त्यांच्याजवळ एका भाकरीशिवाय काही नव्हते. 15येशूने त्यांना निक्षून सांगितले, “सांभाळा, परुश्यांचे खमीर व हेरोदचे खमीर ह्यांच्यापासून जपून राहा.”
16तेव्हा आपल्याजवळ भाकरी नाहीत म्हणून तो हे सांगत आहे, अशी ते आपसात चर्चा करू लागले.
17हे ओळखून येशू त्यांना म्हणाला, “तुमच्याजवळ भाकरी नाहीत, ह्याची चर्चा का करता? अजून तुमच्या ध्यानात कसे येत नाही आणि अजून तुम्हांला कसे समजत नाही? तुमचे अंतःकरण कठीण झाले आहे काय? 18डोळे असून तुम्हांला दिसत नाही काय? कान असून तुम्हांला ऐकू येत नाही काय? तुम्हांला आठवत नाही काय? 19मी पाच हजार लोकांना पाच भाकरी मोडून वाटल्या, तेव्हा तुम्ही तुकड्यांच्या किती टोपल्या भरून घेतल्या?” ते त्याला म्हणाले, “बारा.”
20“तसेच चार हजारांसाठी सात भाकरी मोडल्या, तेव्हा तुम्ही तुकड्यांच्या किती टोपल्या भरून घेतल्या?” ते म्हणाले, “सात.”
21तेव्हा त्याने विचारले, “अजून तुम्हांला समजत नाही काय?”
बेथसैदा येथील आंधळ्याला दृष्टी
22येशू व त्याचे शिष्य बेथसैदा येथे आले. तेथे लोकांनी एका आंधळ्याला त्याच्याकडे आणले व त्याने त्याला स्पर्श करावा, अशी विनंती केली. 23त्याने त्या आंधळ्याचा हात धरून त्याला गावाबाहेर नेले आणि त्याच्या डोळ्यांवर थुंकी लावून त्याच्यावर हात ठेवून त्याला विचारले, “तुला काही दिसते काय?”
24तो वर पाहून म्हणाला, “मला माणसे दिसत आहेत, असे वाटते, परंतु ती मला चालत असलेल्या झाडांसारखी दिसत आहेत”,
25त्याने त्याच्या डोळ्यांवर पुन्हा हात ठेवले. त्या माणसाने निरखून पाहिले आणि तो बरा झाला व त्याला सर्व काही स्पष्ट दिसू लागले. 26त्याला त्याच्या घरी पाठवताना येशूने ताकीद दिली, “ह्या गावात पुन्हा पाऊलसुद्धा टाकू नकोस.”
येशू हा ख्रिस्त आहे, अशी पेत्राची कबुली
27येशू व त्याचे शिष्य फिलिप्पै-कैसरियाच्या परिसरातील खेड्यापाड्यांत जायला निघाले. वाटेत त्याने त्याच्या शिष्यांना विचारले, “मी कोण आहे, असे लोक म्हणतात?”
28त्यांनी त्याला उत्तर दिले, “काही लोक बाप्तिस्मा देणारा योहान, कित्येक एलिया, आणखी काही लोक संदेष्ट्यांपैकी एक, असे म्हणतात.”
29तेव्हा त्याने त्यांना विचारले, “मी कोण आहे, असे तुम्ही म्हणता?” पेत्राने उत्तर दिले, “आपण ख्रिस्त आहात.”
30तेव्हा “माझ्याविषयी कोणाला सांगू नका”, अशी त्याने त्यांना ताकीद दिली.
मरण व पुनरुत्थान ह्यांविषयी येशूचे भाकीत
31नंतर येशू त्याच्या शिष्यांना अशी शिकवण देऊ लागला की, मनुष्याच्या पुत्राने पुष्कळ दुःखे भोगावीत, वडीलजन, मुख्य याजक व शास्त्री ह्यांच्याकडून नाकारले जावे, ठार मारले जावे आणि तीन दिवसांनंतर पुन्हा उठावे, ह्याचे अगत्य आहे. 32येशूने उघडपणे हे सर्व सांगितले आणि पेत्र त्याला बाजूला घेऊन त्याची निर्भर्त्सना करू लागला. 33त्याने वळून त्याच्या शिष्यांकडे पाहिले व पेत्राला खडसावले, “अरे सैताना, बाजूला हो!, तुझा दृष्टिकोन देवाचा नव्हे तर मनुष्याचा आहे.”
आत्मत्यागाचे आमंत्रण
34त्याने त्याच्या शिष्यांबरोबर लोकांनाही बोलावून म्हटले, “जर कोणी माझा अनुयायी होऊ पाहत असेल, तर त्याने स्वतःला नाकारावे. स्वतःचा क्रूस उचलून घ्यावा व माझ्यामागे यावे. 35कारण जो कोणी आपला जीव वाचवू पाहील, तो आपल्या जिवाला मुकेल आणि जो कोणी माझ्याकरता व शुभवर्तमानाकरता आपल्या जिवाला मुकेल तो आपला जीव वाचवील. 36कारण मनुष्याने सर्व जग कमावले पण आपला जीव गमावला, तर त्याला काय लाभ? 37किंवा मनुष्य आपल्या जिवाबद्दल काय मोबदला देऊ शकेल? 38ह्या विश्वासहीन व दुष्ट पिढीत ज्या कोणाला माझी व माझ्या वचनांची लाज वाटेल, त्याची लाज मनुष्याच्या पुत्राला तो पवित्र देवदूतांसह त्याच्या पित्याच्या वैभवाने येईल तेव्हा वाटेल.”

اکنون انتخاب شده:

मार्क 8: MACLBSI

های‌لایت

به اشتراک گذاشتن

کپی

None

می خواهید نکات برجسته خود را در همه دستگاه های خود ذخیره کنید؟ برای ورودثبت نام کنید یا اگر ثبت نام کرده اید وارد شوید

ویدیوهایی برای मार्क 8