मार्क 10

10
विवाहबंधनाची ईश्वरनिर्मित दृढता
1येशू तेथून निघून यहुदिया प्रांतात जाऊन यार्देन नदीच्या पलीकडे पोहोचला. पुन्हा लोक घोळक्यांनी त्याच्याकडे आले आणि नेहमीप्रमाणे तो त्यांना प्रबोधन करू लागला.
2काही परुशी त्याच्याकडे आले आणि त्याची परीक्षा पाहण्याच्या उद्देशाने त्यांनी त्याला विचारले, “पतीने पत्नीला सूटपत्र देणे धर्मशास्त्राला धरून आहे काय?”
3उत्तरादाखल तो म्हणाला, “मोशेने तुम्हांला कोणती आज्ञा दिली आहे?”
4ते म्हणाले, “सूटपत्र देऊन तिला सोडून देण्याची मोशेने परवानगी दिली आहे.”
5येशू त्यांना म्हणाला, “तुमच्या अंतःकरणाच्या कठोरपणामुळे त्याने ही आज्ञा तुमच्यासाठी लिहिली. 6परंतु निर्मितीच्या प्रारंभापासून देवाने त्यांना स्त्री व पुरुष असे उत्पन्न केले. 7‘ह्या कारणामुळे पती आपल्या आईवडिलांना सोडून आपल्या पत्नीला जडून राहील 8आणि ती दोघे एकदेह होतील. ती पुढे दोन नव्हेत तर एकदेह आहेत. 9म्हणून देवाने जे जोडले आहे, ते मनुष्याने विभक्त करू नये.’”
10घरी परतल्यावर त्याच्या शिष्यांनी पुन्हा त्याच गोष्टीविषयी त्याला विचारले, 11तेव्हा तो त्यांना म्हणाला, “जो कोणी आपल्या पत्नीला सूटपत्र देतो व दुसरे लग्न करतो तो तिच्याविरुद्ध व्यभिचार करतो, 12तसेच जी स्त्री आपल्या पतीला सूटपत्र देते व दुसरे लग्न करते तीही व्यभिचार करते.”
लहान मुलांना आशीर्वाद
13येशूने लहान मुलांना स्पर्श करावा म्हणून लोकांनी त्यांना त्याच्याकडे आणले परंतु आणणाऱ्यांना शिष्यांनी दटावले. 14ते पाहून येशूला राग आला. तो त्यांना म्हणाला, “लहान मुलांना माझ्याजवळ येऊ द्या. त्यांना अडवू नका कारण देवाचे राज्य त्यांच्यासारख्यांचे आहे. 15मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, जो कोणी लहान मुलासारखा होऊन देवाच्या राज्याचा स्वीकार करणार नाही, त्याला तेथे मुळीच प्रवेश मिळणार नाही.” 16त्याने त्यांना कवटाळून व त्यांच्यावर हात ठेवून त्यांना आशीर्वाद दिला.
शाश्वत जीवनप्राप्तीविषयी प्रश्न
17तो बाहेर पडून रस्त्याने पुढे गेल्यावर एकाने धावत येऊन व त्याच्यापुढे गुडघे टेकून त्याला विचारले, “गुरुवर्य, आपण किती चांगले आहात! शाश्वत जीवनाचे वतन मिळवता यावे म्हणून मी काय केले पाहिजे?”
18येशू त्याला म्हणाला, “मला चांगला का म्हणतोस? एकट्या परमेश्वराशिवाय कोणीही चांगला नाही. 19तुला आज्ञा ठाऊक आहेत:खून करू नकोस; व्यभिचार करू नकोस; चोरी करू नकोस; खोटी साक्ष देऊ नकोस; फसवू नकोस; आपले वडील व आपली आई ह्यांचा मान राख.”
20त्याने त्याला उत्तर दिले, “गुरुवर्य, मी माझ्या तरुणपणापासून ह्या सगळ्या आज्ञा पाळत आलो आहे.”
21येशूने त्याच्याकडे प्रेमपूर्वक नजरेने पाहिले व त्याला म्हटले, “तुझ्यात एका गोष्टीची उणीव आहे. जा, तुझे जे काही असेल ते विकून जे मिळेल ते गोरगरिबांना देऊन टाक म्हणजे तुला स्वर्गात संपत्ती मिळेल. नंतर येऊन माझा शिष्य हो.” 22परंतु हे शब्द ऐकून त्याचा चेहरा उतरला व खिन्न होऊन तो निघून गेला; कारण तो फार श्रीमंत होता.
संपत्तीची आडकाठी
23येशू सभोवार आपल्या शिष्यांकडे पाहून म्हणाला, “देवाच्या राज्यात श्रीमंतांचा प्रवेश होणे किती कठीण असेल!”
24शिष्य त्याच्या बोलण्याने थक्क झाले. तरीही येशू त्यांना पुढे म्हणाला, “माझ्या मुलांनो, देवाच्या राज्यात प्रवेश होणे कितीतरी कठीण आहे! 25धनवानाने देवाच्या राज्यात जाणे ह्यापेक्षा, उंटाने सुईच्या नेढ्यातून जाणे सोपे आहे.”
26ते अत्यंत विस्मित होऊन एकमेकांना म्हणू लागले, “तर मग कोणाचे तारण होणे शक्य आहे?”
27येशूने त्यांच्याकडे निरखून पाहून म्हटले, “माणसाला हे अशक्य आहे परंतु देवाला नाही, देवाला सर्व काही शक्य आहे.”
28तेव्हा पेत्र त्याला म्हणाला, “आम्ही सर्व काही सोडून आपल्या मागे आलो आहोत.”
29येशूने उत्तर दिले, “मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, ज्याने ज्याने माझ्याकरता व शुभवर्तमानाकरता घरदार, बहीणभाऊ, आईवडील, मुलेबाळे किंवा शेतीवाडी सोडली आहे, 30अशा प्रत्येकाला आताच्या काळात छळवणुकीबरोबर शंभरपटीने घरे, भाऊ, बहिणी, माता, मुले, शेते आणि येणाऱ्या युगात शाश्वत जीवन हे सारे मिळेल. 31तरी आता जे पहिले आहेत त्यांच्यापैकी पुष्कळ शेवटचे व आता जे शेवटचे आहेत त्यांच्यापैकी पुष्कळ पहिले होतील.”
स्वतःच्या मृत्यूबद्दल येशूने तिसऱ्यांदा केलेले भाकीत
32येशू आणि त्याचे शिष्य यरुशलेमकडे जात असताना येशू शिष्यांच्यापुढे चालत होता. शिष्य विस्मित झाले होते आणि मागोमाग येणारे लोक घाबरले होते. तो पुन्हा त्या बारा जणांना जवळ बोलावून आपल्या बाबतीत काय होणार,ते त्यांना सांगू लागला, 33“ऐका, आपण यरुशलेमला जात आहोत, तेथे मनुष्याच्या पुत्राला मुख्य याजक व शास्त्री ह्यांच्या स्वाधीन करण्यात येईल. ते त्याला देहान्ताची शिक्षा देतील आणि नंतर परराष्ट्रीयांच्या स्वाधीन करतील. 34ते त्याची अवहेलना करतील. त्याच्यावर थुंकतील. त्याला फटके मारतील. त्याला ठार मारतील परंतु तीन दिवसांनी तो पुन्हा उठेल.”
याकोब व योहान ह्यांची महत्त्वाकांक्षा
35जब्दीचे दोन्ही मुलगे याकोब व योहान त्याच्याकडे येऊन त्याला म्हणाले, “गुरुवर्य, आम्ही आपल्याकडे जे काही मागू, ते आपण आमच्यासाठी करावे, अशी आमची इच्छा आहे.”
36तो त्यांना म्हणाला, “मी तुमच्यासाठी काय करावे अशी तुमची इच्छा आहे?”
37ते त्याला म्हणाले, “आपल्या वैभवात आमच्यापैकी एकाला आपल्या उजवीकडे व दुसऱ्याला डावीकडे बसू द्यावे.”
38येशूने त्यांना म्हटले, “तुम्ही काय मागत आहात, हे तुम्हांला समजत नाही. जो प्याला मला प्राशन केला पाहिजे तो तुम्ही पिऊ शकाल का? जो बाप्तिस्मा मला घेतला पाहिजे तो तुम्ही घेऊ शकाल का?”
39ते त्याला म्हणाले, “आम्ही तसे करू शकू.” येशूने त्यांना म्हटले, “जो प्याला मला प्राशन केला पाहिजे तो तुम्ही प्याल व जो बाप्तिस्मा मला घेतला पाहिजे तो तुम्ही घ्याल, हे खरे, 40पण तुम्हांला माझ्या उजवीकडे व डावीकडे बसू देणे माझ्या हाती नाही. त्या जागा ज्यांच्यासाठी सिद्ध केल्या आहेत, त्यांना मिळतील.”
खरा मोठेपणा
41हे ऐकून बाकीचे दहा जण याकोब व योहान ह्यांच्यावर संतापले. 42हे पाहून येशूने सर्वांना जवळ बोलावून म्हटले, “परराष्ट्रीयांत सत्ताधारी म्हणून जे मानलेले आहेत, ते लोकांवर सत्ता चालवतात व त्यांचे वरिष्ठ लोक त्यांच्यावर अधिकार गाजवतात, हे तुम्हांला ठाऊक आहे. 43परंतु तुमचे तसे नसावे. उलट, जो तुमच्यामध्ये मोठा होऊ पाहतो त्याने तुमचा सेवक झाले पाहिजे 44आणि जो कोणी तुमच्यामध्ये पहिला होऊ पाहतो, त्याने तुमचा सेवक झाले पाहिजे. 45कारण मनुष्याचा पुत्रही सेवा करून घ्यायला नव्हे तर सेवा करायला व पुष्कळांच्या मुक्‍तीसाठी आपला प्राण खंडणी म्हणून अर्पण करायला आला आहे.”
आंधळ्या बार्तिमयला दृष्टिदान
46ते यरिहो येथे आले. येशू, त्याचे शिष्य व मोठा लोकसमुदाय यरिहो सोडून जात असता, तिमयचा मुलगा बार्तिमय हा आंधळा भिकारी रस्त्याच्या कडेला बसला होता. 47हा नासरेथकर येशू आहे, हे ऐकून तो मोठ्याने ओरडू लागला, “अहो दावीदपुत्र येशू, माझ्यावर दया करा.”
48त्याने गप्प राहावे म्हणून अनेकांनी त्याला दटावले, पण तो अधिकच ओरडू लागला, “अहो दावीदपुत्र, माझ्यावर दया करा.”
49येशू थांबून म्हणाला, “त्याला बोलवा.” ते त्या आंधळ्याला बोलावून म्हणाले, “धीर धर, ऊठ, येशू तुला बोलावत आहे.”
50तो आपल्या अंगावरचे पांघरुण टाकून उठला व येशूकडे आला.
51येशू त्याला म्हणाला, “मी तुझ्यासाठी काय करावे, अशी तुझी इच्छा आहे?” आंधळा त्याला म्हणाला, “गुरुवर्य, मला पुन्हा दिसावे.”
52येशू त्याला म्हणाला, “जा, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे.” तत्काळ त्याला दिसू लागले आणि तो येशूच्या मागे चालू लागला.

اکنون انتخاب شده:

मार्क 10: MACLBSI

های‌لایت

به اشتراک گذاشتن

کپی

None

می خواهید نکات برجسته خود را در همه دستگاه های خود ذخیره کنید؟ برای ورودثبت نام کنید یا اگر ثبت نام کرده اید وارد شوید